मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५२०१ ते ५२१०

बोधपर अभंग - ५२०१ ते ५२१०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५२०१॥
केलें पुनीत सर्वासी । संग आपुलीया देशीं ॥१॥
कोण पाहे तयाकडे । वीर विठ्ठलाचे गाढे ॥२॥
अशुभ त्यापुढें । होय शुभ ठाके पुढें ॥३॥
प्रेम सुखाचिया राशी । पाप नाहीं ओखदासी ॥४॥
तुका ह्मणे त्यांनीं । केली वैकुंठीं मेदिनी ॥५॥

॥५२०२॥
भक्ति आम्हां कांहीं सांगा । कृपाळू व्हा पांडुरंगा ॥१॥
बैसे ठोकत बाहेर । भक्ता बाहाती निर्धार ॥२॥
ज्ञानाचा आधार । काय पहावा साचार ॥३॥
तुका ह्मणे ध्यान । कृपा करी नारायण ॥४॥

॥५२०३॥
न सरे भांडार । भरे वेचिता अपार ॥१॥
पोटमवी त्याचे भरें । पुढें पुढीलासी उरें ॥२॥
कारणा पुरता । लाहो आपुलाल्या हिता ॥३॥
तुका म्हणे देवा । पुढें केला चाला हेवा ॥४॥

॥५२०४॥
हरी अंतरीं बाहेरी । हरी घरीं कोंडिलें ॥१॥
हरी कामा घाली चिरा । वित्त वरा मुकवी ॥२॥
हरी केली जिवेंसांटी । पाडी तुटी सकळां ॥३॥
तुका वेगळें तें नव्हे । हरी भवे भोंवता ॥४॥

॥५२०५॥
असे सकळां वेगळा । खेळे कळा चोरुनी ॥१॥
खाब सूत्राचिये परी । देव दोरी हालवी ॥२॥
राहे आपण निराळा । कैसी कळा नाचवी ॥३॥
जेव्हां आसुडितो दोरी । भुमीवरी पडेना ॥४॥
तुका ह्मणे तो जाणावा । सखा व्हावा आपुला ॥५॥

॥५२०६॥
शुद्ध चंदन सुमन । सदा गुणसंपन्न ॥१॥
धन्य वेधलिया जाती । भाग्यें होती सन्मुख ॥२॥
सदा परिसा सद्गुण । ते बाणोन राहिले ॥३॥
तुका ह्मणे कैंचि खंती । सुजाती ते ठाकणी ॥४॥

॥५२०७॥
हरीकीर्तनाचे अंतीं । नाम अखंड ह्मणती ॥१॥
तेंचि सुकृताचें फळ । वाचा श्रीराम निरबळ ॥२॥
बैसोनियां कीर्तनासी । होय सावध चित्तासी ॥३॥
तुका ह्मणे त्याचा जन्म । मुक्त झाला भवभ्रम ॥४॥

॥५२०८॥
चित्तापासुनी संकल्प । नव्हे तेव्हां जाय पाप ॥१॥
तरी देव कृपा करी । दयाळुवा माझा हरी ॥२॥
सांडी धुवोनियां मळ । कामक्रोधादि विटाळ ॥३॥
तुका ह्मणे पाणी गंगा । देह दोष नुरे अंगा ॥४॥

॥५२०९॥
सांडुनियां भक्तिमार्ग । जातें जग आडराना ॥१॥
मला पाहतां नवल । देखें डोळां आश्चर्य ॥२॥
थोडयासाठीं दंभ किजे । जाणें भोजे नर्कासी ॥३॥
तुका ह्मणे बुद्धि । सांडी शुद्धी देहाची ॥४॥

॥५२१०॥
गळां लाउनी चर्‍हाट । हिंडवितां ते मर्कट ॥१॥
ते संसार सांकळी । मोहें बांधलासे जाळीं ॥२॥
नेणें स्वहीत तें काय । नाम विसरोनी जाय ॥३॥
तुका ह्मणे कर्मभाव । न सुटे हा धर्मचि स्व ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP