बोधपर अभंग - ४९४१ ते ४९५०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥४९४१॥
हित नाहें ठावें जननीजनका । दाविला लौकिकाचार तिंहीं ॥१॥
अंधळ्याचे काठी लागले अंधळें । घात एका वेळे पुढेंमागें ॥२॥
न धरावी चाली करावा विचार । वरील आहार गळी लावी ॥३॥
तुका ह्मणे केला निवाडा रोकडा । राउत हा घोडा हातोहातीं ॥४॥
॥४९४२॥
जेथें पाहें तेथें कांडिती भूस । चिपाडें चोखूनि पाहाती रस ॥१॥
काय सांगों देवा भुलले जीव । बहु यांची कींव ॥२॥
वेटीचें मोटळें लटिकेंचि फुगे । पेणिया जाऊनि भिक्षा मागे ॥३॥
तुका ह्मणे कां उगे चि खोल । जवळी दाखवी आपणां बोल ॥४॥
॥४९४३॥
खोल ओले पडे तें पीक उत्तम । उथळाचा श्रम वांयां जाय ॥१॥
लटिक्याचे आह्मी नव्हों सांटेकरी । थीतें घाली भरी पदरीचें ॥२॥
कोणा इहलोकीं पाहिजे पसारा । दंभ पोट भरायाचे चाडे ॥३॥
तुका ह्मणे कसीं अंगीं जें उतरे । तेंचि येथें सरे जातिशुद्ध ॥४॥
॥४९४४॥
गोमटया बीजाचीं फळें ही गोमटीं । बाहे तेंचि पोटीं समतुक ॥१॥
जातीच्या संतोषें चित्तासी विश्रांति । परतोनि मागुती फिरों नेणें ॥२॥
खर्याचे पारखीं येत नाहीं तोटा । निवडे तो खोटा ढाळें दुरी ॥३॥
तुका ह्मणे मज सत्यचि आवडी । करितां तांतडी येत नाहीं ॥४॥
॥४९४५॥
पडिली हे रुढि जगा परिचार । चालविती वेव्हार सत्य म्हूण ॥१॥
मरणाची कांरे नाहीं आठवण । संचिताचा धन लोभ हेवा ॥२॥
देहाचें भय तें काळाचें भातुकें । ग्रासूनी तें एकें ठेविलेंसे ॥३॥
तुका ह्मणे कांहीं उघडारे डोळे । जाणोनि अंधळे होऊं नका ॥४॥
॥४९४६॥
काळाच सारिखीं वाहाती क्षेत्रें । करितां दुसरें फळ नाहीं ॥१॥
ऐसें करत्यानें ठेविलें करुन । भरिलें भरुन माप नेमें ॥२॥
शित उष्णकाळीं मेघ वरुषावे । वरुषता वाव होय शीण ॥३॥
तुका ह्मणे विष अमृताचें किडे । पालट न घेडे जीणें तया ॥४॥
॥४९४७॥
आधीं सोज्वळ करावा मारग । चालतां तें मग गोवी नाहीं ॥१॥
ऐसा चालोनियां आला शिष्टाचार । गोवीचा वेव्हार पापपुण्य ॥२॥
पळणें तों पळा सांडुनि कांबळें । उपाधीच्या मुळें लाग पावे ॥३॥
तुका ह्मणे येथें शूर तो निवडे । पडिले बापुडे कालचक्रीं ॥४॥
॥४९४८॥
उद्धत त्या जाती । द्रवें रंगल्या उद्धती ॥१॥
ह्मणऊनि बहु फार । त्यांसी असावें अंतर ॥२॥
कैंचें पाठी पोट । गोडविषासी सेवट ॥३॥
तुका म्हणे सापा । नकळे कुरवाळिलें बापा ॥४॥
॥४९४९॥
क्षोभ आणि कृपा मातेची समान । विभाग जतन करुनि ठेवी ॥१॥
क्षणभंगुर ते उपजली चिंता । खरी अखंडता आवडीची ॥२॥
सिकवूं जाणे ते गोमटियासाठीं । लोभें नाहीं तुटी निश्चयेंसी ॥३॥
अवघें चि मिथ्या समया आरतें । देता तो उचितें काळ जाणे ॥४॥
नकरी वेव्हार नेदी गांजूं कोणा । भेडसावी तान्हें हाऊ आला ॥५॥
तुका म्हणे करी जिवाची जतन । दचकूनी मन जवळी आणी ॥६॥
॥४९५०॥
करीं ऐसी धांवाधांवी । चित्त लावीं चरणापें ॥१॥
मग तो माझा मायबाप । घेइल ताप हरुनी ॥२॥
बहुतांच्या मतें गोवा । होऊं जीवा नेदावा ॥३॥
तुका म्हणे करूणाबोलें । धीर विठ्ठलें निघेना ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 03, 2019
TOP