बोधपर अभंग - ४८११ ते ४८२०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥४८११॥
सत्तावर्त्ते मन । पाळी विठ्ठलाची आन ॥१॥
आज्ञा वाहोनियां शिरीं । सांगितलें तेंचि करीं ॥२॥
सरलीसे धांव नलगे वाढवावी हांव ॥३॥
आहे नाहीं त्याचें । तुका ह्मणे कळे साचें ॥४॥
॥४८१२॥
संचितचि खावें । पुढें कोणाचें न घ्यावें ॥१॥
आतां पुरे हे चाकरी । राहों बैसोनियां घरीं ॥२॥
नाहीं काम हातीं । आराणूक दिवसराती ॥३॥
तुका ह्मणे सत्ता । पुरे पराधीन आतां ॥४॥
॥४८१३॥
ज्याचे गांवी केला वास । त्यासी नसावें उदास ॥१॥
तरीच जोडिलें तें भोगे । कांहीं आघात नलगे ॥२॥
वाढवावी थोरी । मुखें ह्मणे तुझे हरी ॥३॥
तुका ह्मणे हे गोमटी । दासा न घालावी तुटी ॥४॥
॥४८१४॥
भक्तिभाव आम्ही बांधिलासे गांठी । सादावितों हाठ्ठीं घ्या रे कोणी ॥१॥
सुखाचिया पेंठे घातलें दुकान । मांडियेलें वान रामनाम ॥२॥
सुखाचें फुकाचें सकलांचें सार । तरावया पार भवसिंधु ॥३॥
मागें भाग्यवंत झाले थोर थोर । तिहीं केला फार हाचि सांठा ॥४॥
खोटें कुडें तेथें नाहीं घातपात । तुका ह्मणे चित्त शुद्ध करीं ॥५॥
॥४८१५॥
एक शेरा अन्ना चाड । येर वाउगी बडबड ॥१॥
कां रे तृष्णा वाढविसी । बांधवूनि मोहपाशीं ॥२॥
औट हात तुझा जागा । येर सिणसीं वाउगा ॥३॥
तुका ह्मणे श्रम । एक विसरतां राम ॥४॥
॥४८१६॥
आलें धरायाचें पेंठे । पुढें मागुतें न भेटे ॥१॥
होसी फजीती वरपडा । लक्ष चौर्यासीचे वेढां ॥२॥
नाहीं कोणांचा सांगात । दु:ख भोगितां आघात ॥३॥
एका पाउलाची वाट । कोणां सांगावा बोभाट ॥४॥
जुंतिजेसी घाणां । नाहीं मारित्या करूणा ॥५॥
तुका ह्मणे हित पाहें । जोंवरि हें हातीं आहे ॥६॥
॥४८१७॥
सिंचन करितां मूळ । वृक्ष ओलावे सकळ ॥१॥
नको पृथकाचे भरी । पडों एक मूळ धरीं ॥२॥
पाणचोर्याचे दार । वरिल दाटावें तें थोर ॥३॥
वश झाला राजा । मग आपुल्या त्या प्रजा ॥४॥
एक चिंतामणी । फिटे सर्व सुखधणी ॥५॥
तुका ह्मणे धांवा । आहे पंढरी विसांवा ॥६॥
॥४८१८॥
काळ जवळीं उभा नेणां । घाली झांपडी खुंटी काना ॥१॥
कैसा हुशार सावध राही । आपुला तूं आपले ठायीं ॥२॥
काळ जवळींच उभा पाही । नेदी कोणासी देऊं कांहीं ॥३॥
काळें पुरविली पाठी । वरुषें झालीं साठी ॥४॥
काळ भोंवताला भोंवे । राम येऊ नेदी जिव्हे ॥५॥
तुका ह्मणे काळा । कर्म मिळतें तें जाळा ॥६॥
॥४८१९॥
दुष्ट भूषण सज्जनाचें । अलभ्यलाभ पुण्य त्याचें ॥१॥
धन्य ऐसा परउपकारी । जाय नरका आणिकां वारी ॥२॥
मळ खाये संवदणी । करी आणिकांची उजळणी ॥३॥
तुका ह्मणे त्याचा । प्रीति आदर करा साचा ॥४॥
॥४८२०॥
साहोनियां टांकीघाये । पाषाण देवचि झाला पाहें ॥१॥
तरा रीती दृढ मन । करीं साधाया कारण ॥२॥
वाण शस्त्र साहे गोळी । शूरां ठाव उंच स्थळीं ॥३॥
तुका ह्मणे सती । अग्न न देखे ज्यारीती ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 01, 2019
TOP