मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५१२१ ते ५१३०

बोधपर अभंग - ५१२१ ते ५१३०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५१२१॥
सर्व धर्मातें टांकोन । मातें शरण येई पूर्ण ॥१॥
मोक्ष इच्छा आहे तुज । तरी शरण यावें मज ॥२॥
अहंता हें पाप थोर । तुवां जाणावें निर्धार ॥३॥
तुका ह्मणे माये करुन । बोले गीतेंत हे खुण ॥४॥

॥५१२२॥
देहबुद्धि असे लोभ जयां चित्तीं । आपुलें जाणती परावें जे ॥१॥
तयासि चालतां पाहिजे सिदोरी । दु:ख पावे करी असत्य तो ॥२॥
तुका ह्मणे धर्म रक्षाया कारणें । छाया इच्छी उन्हें तापला तो ॥३॥

॥५१२३॥
यम सांगे दूतां तुह्मां नाहीं तेथें सत्ता । जेथें होय कथा सदा घोष नामाचा ॥१॥
नका जाऊं तया गांवां नामधारकाच्या शिवां । सुदर्शन यावा घरटी फिरे भोंवती ॥२॥
चक्र गदां घेऊनि हरि उभा असे त्यांचे द्वारीं । लक्मी कामारी रिद्धीसिद्धीसहित ॥३॥
ते बळिया शिरोमणी हरिभक्त ये मेदिनी । तुका ह्मणे कानीं यम सांगे दुतांचे ॥४॥

॥५१२४॥
करितां तडातोडी । वत्सा माते सोई ओढी ॥१॥
करित्याचा आग्रह उरे । एक एकासाटीं झुरे ॥२॥
भुके इच्छी अन्न । तेंहि त्यासाठीं निर्माण ॥३॥
तुका ह्मणे जाती । एक एकाचिये चित्तीं ॥४॥

॥५१२५॥
पायांचें भूषण तीर्थाटण जाण । वांकिया पैंजण जाळावीं कां ॥१॥
हस्ताचें भूषण अभय सेवा दान । सोन्यांचीं कंकणें जाळावीं कां ॥२॥
कंठाचें भूषण सुस्वर कीर्तन । कंठाचीं भरणें जाळावीं कां ॥३॥
पोटाचें भूषण संतपोटीं जन । पापाचें संतान जाळावीं कां ॥४॥
नेत्रांचें भूषण सद्भावें देखणें । नाना दिव्यांजनें जाळावीं कां ॥५॥
जिव्हेचें भूषण ह्मणे रामकृष्ण । कल्माचें बोलणें जाळावें कां ॥६॥
तुका ह्मणे नरदेह मुख्य जाण । पशुयोनी पूर्ण जाळावी कां ॥७॥

॥५१२६॥
आड वाटे जातां लावी नीट सोय । धर्मनीती आहे ऐशी जगीं ॥१॥
नाईकतां सूखें करावें ताडण । पाप नाहीं पुण्य ऐसें घडे ॥२॥
जन्म व्याधी फार चुकतील दु:खें । खडी वाहा सुखें वास त्याचा ॥३॥
तुका म्हणे निवेदिलीयावांचून । अंतरीचा शीण निघे कैसा ॥४॥

॥५१२७॥
कोण दिवस येईल कैसा । नाहीं देहाचा भरंवसा ॥१॥
चौदा चौकडया लंकापती । त्याची कोण झाली गती ॥२॥
लंकेसारिखें भुवन । त्याचें त्यास पारखें जाण ॥३॥
तेहतीस कोटी बंदवडी । राज्य जातां नलगें घडी ॥४॥
ऐसे अहंतें नाडले । तुका म्हणे वांयां गेले ॥५॥

॥५१२८॥
परिसाचे अंगें सोनें झाला विळा । वाकणें या कळा हीन नव्हे ॥१॥
अंतरीं पालट घडला कारण । मग समाधान तेंचि गोड ॥२॥
पिकली हें सेंद पूर्वकर्मा नये । अव्हेरु तो काये घडे मग ॥३॥
तुका ह्मणे आणा पंगती सुरण । पृथक ते गुण केलें पाकें ॥४॥

॥५१२९॥
पंडित तोचि एक भला । नित्य भजे जो विठ्ठला ॥१॥
अवघें ब्रह्म पाहे । सर्वा भूतीं विठ्ठल आहे ॥२॥
रिता नाहीं कोणी ठाव । सर्वा भूतीं वासुदेव ॥३॥
तुका ह्मणे तोचि दास । त्या देखिल्या जाती दोष ॥४॥

॥५१३०॥
आत्म अनुभवें चोखाळिल्या वाटा । त्याचे माथां जटा असो नसो ॥१॥
वाचेचा रसाळ अंतरीं निर्मळ । त्याचे गळां माळ असो नसो ॥२॥
परस्त्रीचे ठायीं जो कां नपूंसक । त्याचे आंगा राख असो नसो ॥३॥
परद्रव्याचा त्याग परनिंदेसी मुका । तोचि सदां देखा तुका ह्मणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP