बोधपर अभंग - ५२११ ते ५२२०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५२११॥
भाग्यवंत तोचि एक । नाम वदे ज्याचें मुख ॥१॥
येर मनु धोंडया ऐसे । लोळे गोखडीस तैसे ॥२॥
शांती विरक्ति न जाणे । श्रेष्ठ श्रेष्ठाचें वचन ॥३॥
तुका ह्मणे एक देख । करी आळस तो मुर्ख ॥४॥
॥५२१२॥
छंद बरवा बरवा । बैसे वाचेसी माधवा ॥१॥
बहु साधनाची आटी । बुडूं नको होसी कष्टी ॥२॥
बुद्धि साहे तरी । बोलामाजि जोडे हरी ॥३॥
तुका ह्मणे बळ । नाहीं तात्काळची फळ ॥४॥
॥५२१३॥
ओढी भविष्य ते माथां । भक्ति न करी सर्वथा ॥१॥
जो जो आला आंगा भोग । भोग सहसा तो रोग ॥२॥
भार असावें निमित्य ॥ माथां एकचि या सत्य ॥३॥
तुका म्हणे बहु काळें । करी कुढावा गोपाळ ॥४॥
॥५२१४॥
मार्गण सांडी लागला । एका घायें जीव गेला ॥१॥
हरीनामासवें उडी । मारी देहभाव सांडी ॥२॥
माती घाली तोंडीं । करी आळसाची धडी ॥३॥
तुका ह्मणे माप । चुके चवर्यांयशी खेप ॥४॥
॥५२१५॥
कांहीं न घेतां कोणाचें । यथाशक्ति करी साचें ॥१॥
तया पुण्या नाहीं जोडा । परोपकार नाहीं थोडा ॥२॥
करी कन्यादान । तीर्थ घेऊन वंदन ॥३॥
तुका ह्मणे हात । जोडोनियां प्रणिपात ॥४॥
॥५२१६॥
श्रेष्ठ ह्मणावें तयासी । जाणे वर्म कळा ऐशी ॥१॥
नेणे दुजा भाव मनीं । चाले शास्त्र विवंचुनी ॥२॥
तोचि प्राणी ह्मणों भला । सदा चिंतितो विठ्ठला ॥३॥
तुका ह्मणे ऐसा । तोचि देवापें सरिसा ॥४॥
॥५२१७॥
शत्रु अवघड । शरण ह्मणवितें तोंड ॥१॥
असे अनुज्ञाचि आण । तुह्मा विचारावें पुण्य ॥२॥
काकुलती शिर । सत्या निमित्य विचार ॥३॥
तरी अंतर तें दुजें । हें न पाहिलें पाहिजे ॥४॥
तुका ह्मणे जोडे यश । पुढें वाढे कीर्तिघोष ॥५॥
॥५२१८॥
आशा नांव वेष । जोडे परदु:खा नाश ॥१॥
सांटी सर्वस्वाची जोडी । वरी उपकार प्रौढी ॥२॥
नेणे मानामान । गेलियाची आठवण ॥३॥
तुका ह्मणे ऐसा । यश कीर्तनें सरिसा ॥४॥
॥५२१९॥
अंगीं अयाचित वृत्ति । भार देवावरी प्रीति ॥१॥
नेणे नाशवंत । अर्थ जोडी न शाश्वत ॥२॥
शुद्ध परमार्था । वाहे उपकार चिंता ॥३॥
तुका ह्मणे पांडुरंग । राहे धरुन त्या अंग ॥४॥
॥५२२०॥
चाकरीवेगळें । खातां तोंडें तें वेगळें ॥१॥
काढी हिशोब ते धणी । लाभ दंड पूजास्थानीं ॥२॥
रहावें तें सेवे रुजु । तेव्हां पृथ्वी होय उजु ॥३॥
तुका ह्मणे कोणी । राखे नाहींसा मेदिनी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 03, 2019
TOP