बोधपर अभंग - ४९११ ते ४९२०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥४९११॥
देव तीर्थ येर दिसे जया ओस । तोचि तया दोष जाणतिया ॥१॥
तया बरें फावे देवा चुकवितां । संचिताची सत्ता अंतराय ॥२॥
शुद्धाशुद्ध ठाव पापपुण्यबिज । पाववील दुजे फळभोग ॥३॥
तुका म्हणे विश्वंभर । ऐसें वर्म । चुकलिया धर्म अवघें मिथ्या ॥४॥
॥४९१२॥
काय करुं सांगतांहीं न कळे वर्म । उपस्थित भ्रम उपजवितो ॥१॥
मन आधीं ज्याचें आलें होईल हातां । तयावरी सत्ता केली चाले ॥२॥
अभुकेचे अंगीं चवी ना सवाद । मिथ्या ऐसा वाद दुराग्रह ॥३॥
तुका ह्मणे आप राखावें आपणा । संकोचोंचि कोणा नये आतां ॥४॥
॥४९१३॥
अमृत अव्हेरें उचळलें जातां । विष आर्तभूतां आवश्यक ॥१॥
आदरासी मोल नये लावूं केजें । धीर शुद्धबीजें गोमटा तो ॥२॥
खर्याचिये अंगीं आपणचि चाली । लावणी लादिली काय लागे ॥३॥
तुका ह्मणे चाडे करा वेवसाव । आह्मांसी तो वाव धीर आहे ॥४
॥४९१४॥
फोडिलें भांडारें । माप घेऊनियां खरें ॥१॥
केली हरि नामाची वरी । मागितलें आतां सरो ॥२॥
देशांत सुकाळ । झाला हारपला काळ ॥३॥
घ्यावें धणीवरी । तुका ह्मणे लाहान थोरीं ॥४॥
॥४९१५॥
पात्र शुद्ध चित्त ग्वाही । न लगे कांहीं सांगणें ॥१॥
शूर तरी सत्य चि व्हावें । सांडी जीवें करुनी ॥२॥
अमुप च सुखमान । स्वामी जन मानावें ॥३॥
तुका ह्मणे जैसी वाणी । तैसे मनीं परिपाक ॥४॥
॥४९१६॥
किती रांडवंडे । घालूनि व्हाल रे बापुडे ॥
संसाराचें भिडे । कासावीस झालेती ॥१॥
माझ्या स्वामी शरण रिघा । कृपाळुवा पांडुरंगा ॥
ठेवी अंगसंगा । विश्वासियां जवळीं ॥२॥
कांहीं न मागतां भलें । होईल तें चि काम केलें ॥
नसावें आथिलें । कांहीं एका संकल्पे ॥३॥
तुका ह्मणे भाव । पाववील ठायाठाव ॥
एकविध जीव । ठेविलिया सेवेसी ॥४॥
॥४९१७॥
चंचळीं चंचळ निश्चळीं निश्चळ । वाजवी खळाळ उदकासी ॥१॥
सोपें वर्म परि मन नाहीं हातीं । हा हा भूत चित्तीं भ्रम गाढा ॥२॥
रविबिंब नाहीं तुटत उदका । छायेची ते नका सरी धरुं ॥३॥
तुका ह्मणे भय धरी रज्जूसाठीं । नाहीं साच पोटीं कळलें तों ॥४॥
॥४९१८॥
गर्जत जावें नामावळी । प्रेमें टाळी वाहोनि ॥१॥
येणें सुखें पुढती धांवें । भेटी सर्वें गोपाळा ॥२॥
लोटांगण घाला तळीं । वंदा धुळी संताची ॥३॥
तुका ह्मणे विठ्ठल लाहो । ऐसा बाहो उभारा ॥४॥
॥४९१९॥
मायबाप सवें नये धनवित्त । करावें संचित भोगावें तें ॥१॥
ह्मणऊनि लाभ काय तो विचारीं ! नको चालीवरी चित्त ठेवूं ॥२॥
आयुष्य सेवटीं सांडूनि जाणार । नव्हेचि साचार शरीर हें ॥३॥
तुका ह्मणे काळें लावियलें माप । जमा धरी पापपुण्याची ही ॥४॥
॥४९२०॥
मोटलें हाटीं सोडिल्या गांठी । विकल्या घातले कण ॥
ज्याचे भाग त्यासी देऊन वारिलें । सारुनि लिगाड दान ॥
खरें माप हातीं घेऊनी बैसलों । मानिती ते चौघेजण ॥
खरें वित्त तेथें आले चोजवित । गिराईक संतजन ॥१॥
झाडिला पालव केला हाट वेच । झाली सकाळींच आराणूक ॥
याल तरि तुह्मी करा लगबग । आमचे ते कोणी लोक ॥२॥
एक ते उत्तम मध्यम कनिष्ठ । वित्ताचे प्रकार तीन ॥
बहुतां जनाचे बहुत प्रकार । वेगळाले वाण ॥
लाभ हाणि कोणा मुदल झालें । कोणासी पडिलें खाण ॥
अर्धमर्ध कोणीं गुंतोनि राहिले । थोडे तैसे बहु जन ॥३॥
एके सांते आले एके गांवीहून । येकामे चि नव्हे जाणें ॥
येतां जातां रुजू नाहीं दिवाणा । काळतोंडीं एकें तेणें ॥
लाग भाग एकी एकानीं गोविलें । मागील पुढिलां ऋणें ॥
तुका म्हणे आतां पाहूं नये वास । साधावें आपुलें पेणें ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 02, 2019
TOP