मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५१६१ ते ५१७०

बोधपर अभंग - ५१६१ ते ५१७०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५१६१॥
अंतरीं निर्मत्सर । सबाह्य कोमळ जिव्हार ॥१॥
नाहीं द्वेष जया चित्तीं । समता ती सर्वा भूतीं ॥२॥
निर्मळ अंतर । शुद्ध सत्वाचा आगर ॥३॥
तुका ह्मणे ऐसे । ते ते विठोबासरिसे ॥४॥

॥५१६२॥
सत्वधीरापाशीं । राहे जतन जिवेंसी ॥१॥
तरी पुण्य पडे गांठीं । उभा जवळी जगजेठी ॥२॥
आवडे हे प्रीती । पाहे छळुनियां चित्तीं ॥३॥
तुका ह्मणे दृढ मन । अंगीं देव तो आपण ॥४॥

॥५१६३॥
जिवा जिव साक्ष असे । मधें वसे अहंता ॥१॥
नाडियेले ऐसे लोक । किती एक सांगावें ॥२॥
वासनेची नघे तुटी । जिवा आणि करी नेटीं ॥३॥
तुका ह्मणे सांडी संग । करा लाग स्मरणीं ॥४॥

॥५१६४॥
पिंड पोसावे हें अधमाचें ज्ञान । विलास मिष्टान्न करुनियां ॥१॥
शरीर रक्षावें हा धर्म बोलती । काय असे हातीं तयाचिया ॥२॥
क्षणभंगुर हें जाय न कळतां । ग्रास गिळी सत्ता नाहीं हातीं ॥३॥
कर्वतिलीं देहें कापियेलें मांस । गेले वनवासा शुकादिक ॥४॥
तुका म्हणे राज्य करितां जनक । अग्नीमाजी एक पाय जळे ॥५॥

॥५१६५॥
बीजीं फळाचा भरंवसा । जतन सिंचनासरिसा ॥
चाविलिया आसा । काकुलती ते नाड ॥१॥
हा तो गडसंदिचा ठाव । पिके पिकविला भाव ॥
संकचोनि जीव । दशा केली जतन ॥२॥
माती घाली धनावरी । रांडा रोटा वरीवरी ॥
सुखाचे शेजारीं । दु:ख भ्रमें भोगितसे ॥३॥
तुका ह्मणे दिशा भुली । झाल्या उफराटी चाली ॥
निवाडाची बोली । अनुभवें साक्षीसी ॥४॥

॥५१६६॥
नष्ट त्यागुनी संगती । घात होती बहुतां ॥१॥
काय मागावें कोणासी । मुख्य ऐसी स्वनिष्ठा ॥२॥
संग लटिक्याचा दुरी । लाग करी चित्तानें ॥३॥
तुका ह्मणे गुणी ऐसा । देव तैसा वंदितो ॥४॥

॥५१६७॥
स्वरुपाचे ठायीं चित्त तें बैसेना । जाणावें वासना गेली नाहीं ॥१॥
काया वाचा चित्त जडे भगवंतीं । तेव्हां होय शांति वासनेची ॥२॥
तुका ह्मणे रामनामाचा हो घोष । तेणें वासनेस क्षय होय ॥३॥

॥५१६८॥
जगीं धन्य ते माउली । मानी भ्रताराची बोली ॥१॥
तिचें होतां दरुशन । मिळे पोटभरी अन्न ॥२॥
नेणें व्रत उपोषण । एका भ्रतारावांचून ॥३॥
पाळी अतीत अभ्यागता । जैसी बाळालागीं माता ॥४॥
तिसी उपमा काय द्यावी । शिव शक्ति ते मानावी ॥५॥
परपुरुष मानी पिता । तुका ह्मणे धन्य माता ॥६॥

॥५१६९॥
इंद्रियासी लाड देणेंचि ओंगळ । घातक केवळ परमार्थासी ॥१॥
व्याघ्रासी संसर्ग सर्पासी खेळणें । इंद्रियां पाळणें तैशापरी ॥२॥
म्हणोनी भल्यानें दमोनी चालावें । लोलुप्य न व्हावें इंद्रियांसी ॥३॥
तुका ह्मणे धोका चौर्‍याशीचा घ्यावा । विषयाच्या भावा आतळीतां ॥४॥

॥५१७०॥
असोन सांगावें हित ब्रह्मज्ञान । तरी यां पठण उपकार ॥१॥
सर्वदा जो करी सदा सावधान । परम पावन तोचि एक ॥२॥
पर उपकार मानी परजनां । समान करुणा सर्वाभूतीं ॥३॥
तुका ह्मणे ऐसें जो का ब्रह्मज्ञान । वदे तो सज्जन समदृष्टी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP