मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
४९९१ ते ५०००

बोधपर अभंग - ४९९१ ते ५०००

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥४९९१॥
अनंत लक्षणें वाणितां अपार । संतांचें तें घर सांपडेना ॥१॥
जये घरीं संत राहती आपण । तें तुह्मां ठिकाण आतुडेना ॥२॥
ठिकाण धरुनी पाहावे ते संत । उगाच आकांत करुं नये ॥३॥
संत होऊनिया संतांसीं पाहावें । तरिच तुका ह्मणे ॥४॥

॥४९९२॥
देखीचें तें ज्ञान करावें तें काई । अनुभव नाहीं आपणासी ॥१॥
इंद्रियाचें गोडी ठकलीं बहुतें । सोडितां मागुतें आवरेना ॥२॥
युक्तीचा आहार नीतीचा वेव्हार । वैराग्य तें सार तरावया ॥३॥
नाव रेवाळितां घाला घाली वारा । तैसा तो पसारा अहंतेचा ॥४॥
तुका ह्मणे बुद्धि आपुले अधीन । करी नारायण आतुडे तों ॥५॥

॥४९९३॥
बोलिलों उत्कर्षे । प्रेमरस दासत्वें ॥१॥
साच करिता नारायण । जया शरण गेलों तो ॥२॥
समर्थ तो आहे ऐसा । धरिली इच्छा पुरवी ॥३॥
तुका ह्मणे लडिवाळाचें । द्यावें साचें करुनियां ॥४॥

॥४९९४॥
विचा केला ठोबा । ह्मणोनि नांव तो विठोबा ॥१॥
कां रे नेणां त्याचें नांव । काय वेदासि नाहीं ठाव ॥२॥
शेष स्तुती प्रवर्तला । जिव्हा चिरुनि पलंग झाला ॥३॥
तुका ह्मणे सत्ता । ज्याची काळाचिये माथा ॥४॥

॥४९९५॥
मथनासाठीं धर्माधर्म । त्याचें वर्म नवनीत ॥१॥
तें चि तें घाटूं नये । आलें जाय नासूनि ॥२॥
सांभाळावें वरावर । वर्म दूर न वजावें ॥३॥
तुका ह्मणे धालें पोट । मग बोटचाटणी ॥४॥

॥४९९६॥
साच हा विठ्ठल साच हें करणें । संत जें वचनें बोलियेले ॥१॥
साच तें स्वहित साच ते प्रचित । साच वेद नीत सांगतील ॥२॥
तुका ह्मणे घेती साच साच भावें । लटिकें वर्म ठावें नाहीं त्यांसी ॥३॥

॥४९९७॥  
जागा घरटी फिरे तस्कराची दिवसाराती । नीदसुरें नाडिलीं असो ऐसीं मागें किती ॥१॥
हाट करी सकळ जन । वस्तु करा रे जतन ॥२॥
हुशार ठायीं । निज निजेलिया पाहीं ॥३॥
सावचित्त असे खरा । लाभ घेउन जाय घरा ॥४॥
तराळ बोंबे उतराई । राखा आपुलिया भाई ॥५॥
हरिच्या नामीं घालूं जागा । तुका ह्मणे हुशार गा ॥६॥

॥४९९८॥
वैभव तें राज्य संपत्ती टाकावी । उदरार्थ मागावी माधोकरी ॥१॥
आपुलें तें आधीं करावें स्वहित । ऐसी आहे नीत स्वधर्माची ॥२॥
वर्ण कुळ जाति याचा अभिमान । त्यजावा सन्मान लौकिकाचा ॥३॥
तुका ह्मणे राहे एकाकी नि:शंक । देऊनियां हाक कंठीं काळ ॥४॥

॥४९९९॥
बसतां चोरापाशीं तैसी होय बुद्धि । देखतांचि चिंधी मन धांवे ॥१॥
व्यभिचार्‍यापासीं बैसतां क्षणभरी । देखतांचि नारी मन धांवे ॥२॥
प्रपंचाचा छंद टांकुनियां गोवा । धरावें केशवा हृदयांत ॥३॥
सांडुनियां देई संसाराची बेडी । कीर्तनाची गोडी धरावीगा ॥४॥
तुका ह्मणे तुला सांगतों मी एक । रुक्मिणीनायक मुखीं गावा ॥५॥

॥५०००॥
संतांपायीं विन्मुख झाला । तो जरी संगति मागों आला ॥१॥
तरी त्याहुनि दुरी जावें । सुखें एकांतीं बैसावें ॥२॥
आत्मचर्चा नाहीं जेथें । अगी लावुनि द्यावी तेथें ॥३॥
तुका ह्मणे नाहीं । चित्ता समाधान कांहीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP