मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
४९७१ ते ४९८०

बोधपर अभंग - ४९७१ ते ४९८०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥४९७१॥
संसारा आलिया एक सुख आहे । आठवावे पाये विठोबाचे ॥१॥
येणें होय सर्व संसार सुखाचा । नलगे दु:खाचा लेश कांहीं ॥२॥
घेतील तयांसी सोपें आहे सुख । बोलियेलें मुखें नारायण ॥३॥
सांगितली सोय करूणासागरें । तुम्हां कां हो बरें न वाटे तें ॥४॥
तुका म्हणे तेणें उपकार केला । भोळ्याभाविकाला तरावया ॥५॥

॥४९७२॥
चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलवितें हरीविण ॥१॥
देखवी ऐकवी एक नारायण । तयाचें भजन चुकों नका ॥२॥
मानसाची देव चालवी अहंता । मीचि एक कर्ता म्हणोनियां ॥३॥
वृक्षाचेंही पान हाले त्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठें ॥४॥
तुका म्हणे विठो भरला सबाहीं । तया उणें कांहीं चराचरीं ॥५॥

॥४९७३॥
आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥
देह हें देवाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचें काय आहे ॥२॥
देता देवविता नेता नेवविता । येथें याची सत्ता काय आहे ॥३॥
निमित्याचा धनी केला असे प्राणी । माझें माझें ह्मणोनि व्यर्थ गेला ॥४॥
तुका ह्मणे कां रे नाशवंतासाठीं । देवासमें आटी पाडितोसी ॥५॥

॥४९७४॥
सर्वस्वाची साटी । तरि च देवासवें गांठी ॥१॥
नाहीं तरी जया तैसा । भोग भोगवील इच्छा ॥२॥
द्यावें तें चि घ्यावें । ह्मणउनि जीवें जावें ॥३॥
तुका ह्मणे उरी । मागें नुरविता बरी ॥४॥

॥४९७५॥
ओले मातीचा भरंवसा । कां रे धरिशी मानसा ॥१॥
डोळे चिरींव चांगले । वृद्धपणीं सरक्या झाले ॥२॥
नाक सरळ चांगलें । येउन हनवटी लागलें ॥३॥
तुका ह्मणे आलें नाहीं । तंव हरिला भज रे कांहीं ॥४॥

॥४९७६॥
हे तों टाळाटाळी । परि भोंवता हा कळी ॥१॥
बरें नव्हेल शेवटीं । भय असों द्यावें पोटीं ॥२॥
मुरगाळिल कान । गोसमाळी सावधान ॥३॥
धन्य ह्मणे आतां । येथें नुधवा माथां ॥४॥
अबोलणा तुका । ऐसें कांहीं लेखूं नका ॥५॥

॥४९७७॥
किती लाजिरवाणा । मरे उपजोनि शाहाणा ॥१॥
एका घाई न करीं तुटी । न निघें देवासोई भेटी ॥२॥
सोसूनि आबाळी । घायाळ तें ढुंग चोळी ॥३॥
सावध करी तुका । ह्मणे निजले हो आइका ॥४॥

॥४९७८॥
सोईरे धाइरे दिल्या घेतल्याचे । अंत हें काळींचें नाहीं कोणी ॥१॥
सख्या गोत्रबहिणी सुखाचे सांगाती । मोकलुनी देती अंत काळीं ॥२॥
आपुलें शरीर आपणा पारिखें । परावीं होतील नवल कायी ॥३॥
तुका ह्मणे आतां सोड यांची आस । धरीं रे या कास पांडुरंगा ॥४॥

॥४९७९॥
क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति काय करी ॥१॥
तृण नाहीं तेथें पडिला दावाग्नि । जाय तो विझोनि आपसया ॥२॥
तुका म्हणे क्षमा सर्वाचें स्वहित । धरा अखंडित सुखरुप ॥३॥

॥४९८०॥
पानें खाईल जो बैसोनि कथेसी । घडेल तयासी गोहत्या ॥१॥
तमाखु ओढोनि काढला जो धूर । बुडेल तें घर तेणें पापें ॥२॥
कीर्तनी बडबड करील जो कोणी । बेडूक होऊनी येईल जन्मा ॥३॥
जयाचिये मनी कथेचा कंटाळा । होती त्या चांडाळा बहु जाच ॥४॥
जाच होती पाठी उडती यमदंड । त्याचें काळें तोंड तुका ह्मणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP