बोधपर अभंग - ५०४१ ते ५०५०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५०४१॥
अभिमानी पांडुरंग । गोवा काशाचा हो मग ॥१॥
अनुसरा लवलाहीं । नका विचार करुं कांहीं ॥२॥
कोठें राहतील पापें । झालिया हो अनुताप ॥३॥
तुका ह्मणे येचि घडी । उभ्या पाववील थडी ॥४॥
॥५०४२॥
अनुतापें दोष । जाय न लगतां निमिष ॥१॥
परि तो राहे विसावला । आदीं अवसानीं भला ॥२॥
हेंचि प्रायश्चित्त । अनुतापीं न्हाय चित्त ॥३॥
तुका ह्मणे पापा । शिवों नये अनुतापा ॥४॥
॥५०४३॥
ऐसे सांडुनियां धुरे । किविलवाणी दिसां कां रे ॥
कामें उर भरे । हातीं नुरे मृत्तिका ॥१॥
उदार हा जगदानी । पांडुरंग अभिमानी ॥
तुळसीदळ पाणी । चिंतनाचा भुकेला ॥२॥
न लगे पुसावी चाकरी । कोणी वकील ये घरीं ॥
त्याचा तोचि करी । पारपत्य सकळ ॥३॥
नाहीं आडकाटी । तुका ह्मणे जातां भेटी ॥
न बोलतां मिठी । उगीच पायीं घालावी ॥४॥
॥५०४४॥
शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघेंची दु:ख ॥१॥
ह्मणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥२॥
खवळलिया कामक्रोधीं । अंगीं भरती आधिव्याधी ॥३॥
तुका म्हणे त्रिविध ताप । जाती मग आपेंआप ॥४॥
॥५०४५॥
धीर तो कारण साह्य होतो नारायण । नेदी होऊं सीण वाहों चिंता दासांसी ॥१॥
सुखें करावें कीर्तन हर्षे गावे हरिचे गुण । वारी सुदर्शन आपणचि कळिकाळ ॥२॥
जीव वेची माता बाळा जडभारी होतां । तो तों नव्हे दाता प्राकृतां यां सारिखा ॥३॥
हें तों माझ्या अनुभवें अनुभवा आलें जीवें । तुका ह्मणे सत्य व्हावें आहाच नये कारणा ॥४॥
॥५०४६॥
आलिया भोगासी असावें सादर । देवावरी भार घालूं नये ॥१॥
मग तो कृपासिंधु निवारी सांकडें । येर तें बापुडे काय रंक ॥२॥
भयाचिया पोटीं दु:खाचिया रासी । शरण देवासी जातां भलें ॥३॥
तुका ह्मणे नव्हे काय त्या करितां । चिंतावा तो आतां विश्वंभर ॥४॥
॥५०४७॥
सत्य सत्यें देतें फळ । नाहीं लागतचि बळ ॥१॥
ध्यावे देवाचे ते पाय । धीर सकळ उपाय ॥२॥
करावी च चिंता । नाहीं लागत तत्वता ॥३॥
तुका ह्मणे भावें । शरण ह्मणवितां बरवें ॥४॥
॥५०४८॥
शूरत्वासी मोल । नये कामा फिके बोल ॥१॥
केला न संडी कैवाड । जीवेंसाटीं तों हे होड ॥२॥
धीर तो कारण । साह्य होतो नारायण ॥३॥
तुका ह्मणे हरि । दासां रक्षितो निर्धारीं ॥४॥
॥५०४९॥
लय लक्षूनियां झालों ह्मणती देव । तो ही नव्हे भाव सत्य जाणा ॥१॥
झालों बहुश्रुत न लगे आतां कांहीं । नको राहूं ते ही निश्चितीनें ॥२॥
तपें दानें काय मानिसी विश्वास । बीज फळ त्यास आहे पुढें ॥३॥
कर्म आचरण यातीचा स्वगुण । विशेष तो गुण काय तेथें ॥४॥
तुका ह्मणे जरी होईल निष्काम । तरि च होय राम देखे डोळां ॥५॥
॥५०५०॥
आहारनिद्रे नलगे आदर । आपण सादर तेचि होय ॥१॥
परिमितीविणें बोलणें तें वायां । फार थोडें काय पिंडा पीडी ॥२॥
समाधान त्याचें तोचि एक जाणे । आपुलिये खुणे पावोनियां ॥३॥
तुका म्हणे होय पीडा तें न करीं । मग राहें परी भलतिये ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 03, 2019
TOP