मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५०८१ ते ५०९०

बोधपर अभंग - ५०८१ ते ५०९०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५०८१॥
चहुं आश्रमांचे धर्म । न राखतां जोडे कर्म ॥१॥
तैसी नव्हे भोळी सेवा । एक भावचि कारण देवा ॥२॥
तपें इंद्रियां आघात । क्षणें एका वाताहात ॥३॥
मंत्र चळे थोडा । तरि धडचि होय वेडा ॥४॥
व्रतें करितां सांग । तरी एक चुकतां भंग ॥५॥
धर्म सत्वचि कारण । नाहीं तरी केला सिण ॥६॥
भूतदयेसि आघात । उंचनीच वाताहात ॥७॥
तुका ह्मणे दुजें । विधिनिषेधाचें ओझें ॥८॥

॥५०८२॥
ओन्याम्याच्या काळें । खडे मांडविले बळें ॥१॥
तेंचि पुढें पुढें काई । मग लागलिया सोई ॥२॥
रज्जु सर्प होता । तोंवरीचि न कळतां ॥३॥
तुका ह्मणे साचें । भय नाहीं बागुलाचें ॥४॥

॥५०८३॥
अक्षयी तें झालें । आतां न मोडे रचिलें ॥१॥
पाया पडिला खोले ठायीं । तेथें पुढें चाली नाहीं ॥२॥
होतें विखुरलें । ताळा जमे झडती आलें ॥३॥
तुका ह्मणे बोली । पुढें कुंटितचि झाली ॥४॥

॥५०८४॥
पोटीं जन्मती रोग । तरि कां ह्मणावें आप्तवर्ग ॥१॥
रानीं वसती औषधी । तरि कां ह्मणाव्या निपराधी ॥२॥
तैसें शरीराचें नातें । तुका म्हणे सर्व आप्तें ॥३॥

॥५०८५॥
एकांचीं उत्तरें । गोड अमृत मधुरें ॥१॥
ऐशा देवाच्या विभूती । भिन्न प्रारब्धाची गती ॥२॥
एकांचीं वचनें । कडु अत्यंत तीक्षणें ॥३॥
प्रकाराचें तीन । तुका ह्मणे केलें जन ॥४॥

॥५०८६॥
वचनें ही नाड । न बोले तें मुकें खोड ॥१॥
दोहीं वेगळें तें हित । बोली अबोलणी नीत ॥२॥
अंधार प्रकाशी । जाय दिवस पावे निशी ॥३॥
बीज पृथिवीच्या पोटीं । तुका ह्मणे दावी दृष्टी ॥४॥

॥५०८७॥
विचारा वांचून । न पवीजे समाधान ॥१॥
देह त्रिगुणांचा बांधा । माजी नाहीं गुण सुदा ॥२॥
देवाचिये चाडे । देवा द्यावें जें जें घडे ॥३॥
तुका ह्मणे होतें । बहु गोमटें उचितें ॥४॥

॥५०८८॥
एका बीजा केला नास । मग भोगलें कणीस ॥१॥
कळे सकळां हा भाव । लहानथोरांवरी जीव ॥२॥
लाभ नाहीं फुकासाठीं । केल्याविण जीवासाटीं ॥३॥
तुका ह्मणे रणीं । जीव देतां लाभ दुणी ॥४॥

॥५०८९॥
सांटविले वाण । पैस घातला दुकान ॥१॥
जें ज्या पाहिजे जे काळीं । आहे सिद्ध चि जवळी ॥२॥
निवडिलें साचें । उत्तम मध्यमकनिष्ठाचें ॥३॥
तुका बैसला दुकानीं । दावी मोला ऐसी वाणी ॥४॥

॥५०९०॥
अवगुण तों कोणीं नाहीं प्रतिष्ठिले । मागें होत आले शिष्टाचार ॥१॥
दुर्बळाच्या नांवें पिटावा डांगोरा । हा तों नव्हे बरा सत्यवाद ॥२॥
मद्य आणि मधु एकरासी नांवें । तरि कां तें खावें आधारें त्या ॥३॥
तुका ह्मणे माझा उच्छिष्ट प्रसाद । निवडी भेदाभेद वृष्टि न्यायें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP