तू मायेमाजी, का तुझ्यात गुंतली माया
तू कायेमाजी, का तुझ्यात गुंतली काया
माया रे माया देवा, अवघी ही माया ॥ध्रृ॥
घरामाजी प्रांगण, का घर प्रांगणात
दोन असती घरं का तुझ्या नयनात
दृष्टी ज्ञानात, का ज्ञान दाटले दृष्टीत
ज्ञान, दृष्टी तुझ्यात साकार कृष्णराया
माया रे माया देवा, अवघी ही माया ॥१॥
गोड ती साखर, का गोडीमाजी साखर
जिव्हेत सामावली, गोडी आणि साखर
जिव्हा मनावर, का मन जिव्हेवर
मन जिव्हा तूच, देवा पंढरीराया
माया रे माया देवा, अवघी ही माया ॥२॥
फूल गंधामाजी, का गंध फूलामाजी
शब्द गंधामाजी, का गंध शब्दामाजी
शब्द, गंध, फूल का देवा तुझ्यामाजी
तूची जाणे ही माया, आदिकेशवराया
माया रे माया देवा, अवघी ही माया ॥३॥