लाडकी बहीणाई आज निघाली सासरी
कृष्ण करी उपदेश, तिज परोपरी ॥ध्रृ॥
श्रेष्ठ नरजन्म, त्यात नारी महान
नको कलंक, उरी असू दे भान
घरी वडिलधारी, तू समज लहान
उणे बोलले काही, नको राग तयावरी
कृष्ण करी उपदेश, तिज परोपरी ॥१॥
लज्जा नारी धर्म, त्याचे करावे पालन
अंगभर वस्त्र, नको अंगप्रदर्शन
जनामाजी हंसू नको, दात दाखवून
होवून निलाजरी, नको फिरु हाटबाजारी
कृष्ण करी उपदेश, तिज परोपरी ॥२॥
पति-पत्नी, तन-मन, एक तान
सत्य शिवसुंदर नाही याहून
नारी चतुर, त्यांचे वर्म जाणून
सासर माहेर ते, तूच उध्दरी
कृष्णा करी उपदेश, तिज परोपरी ॥३॥
अर्थ, धर्म, काम तो वसा घेवून
आर्य धर्म आपुला, पति ईश्वर जाण
शास्त्र सांगती, जगी माता महान
हाती पाळण्याची दोरी, जग उध्दरी
कृष्णा करी उपदेश, तिज परोपरी ॥४॥
जननी जन्मभूमी, हेची स्वर्ग समान
काया वाचा मन ठेवी अभिमान
करुन जनहीत, फेड तयाचे ऋण
श्रेष्ठ तू पुरंदर विठ्ठल सहोदरी
कृष्णा करी उपदेश, तिज परोपरी ॥५॥