पुरंदरायण - माझे पाखरु गेले
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
सोडून पिंजरा पाखरु गेले
रामा हो रामा पांखरु गेले ॥ध्रृ॥
ताई तुझ्यासाठी मी पांखरु आणिले
प्रेमाने पाळूनी त्यासी वाढविले
बोल विठू विठू तया शिकविले
हाय घात झाला मांजराने नेले
रामा हो रामा पांखरु गेले ॥१॥
आगळे पांखरु रंग तो आगळा
त्याची चिवचिव लावितसे लळा
किती जपला मी जिवाचा तो ठेवा
वीज कोसळली अघटीत झाले
रामा हो रामा पांखरु गेले ॥२॥
राम राम म्हणे ते माझे पांखरु
बालबुध्दिमंत ते माझे पाखरु
इवले इवले ते माझे पाखरु
माझ्या नशिबी नव्हते सोडूनी गेले
रामा हो रामा पांखरु गेले ॥३॥
ऐसे त्याचे घर त्यासी नवद्वार
सारी अडगळ आत भाराभार
खांब कोसळून कोसळले घर
जाणे पुरंदर विठ्ठल काय झाले
रामा हो रामा पांखरु गेले ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP