देवाच्या नावे का बांधिले मंगळसूत्र
मुढे वेसवा होशील, दे फेकून सूत्र ॥ध्रृ॥
कसला नवस, म्हणे लग्न देवासी
देवाच्या नावे तू गं, होशी देवदासी
अंगी किडे तुझ्या, नरकात जाशी
देवी जगाची आई, तू भक्तीण अपात्र
मुढे वेसवा होशील, दे फेकून सूत्र ॥१॥
अभक्ष खाण्यासाठी, का करेवाची अवस
निंब नेसून तू, नागवी का पुनवेस
सोडून लाजलज्जा, तू भलतेच करतेस
यमास का रोखतील, तुझे मंत्रतंत्र
मुढे वेसवा होशील, दे फेकून सूत्र ॥२॥
कसले पूजन, दगडा शेंदूर फासून
देवून शिशुबळी, जाई का वांझपण
अंगारे धुपारे आणि मृत्तिका मसण
तुज रौरव नरक, तुझे हे जारणमंत्र
मुढे वेसवा होशील, दे फेकून सूत्र ॥३॥
मांस, मदिरेसाठी तुझीच ही खोडी
देवी मागते का कधी बकरी कोंबडी
देवाच्या नावावरी भक्त करीतो लबाडी
नाही भक्ती आत्मज्ञान, रक्ताने भरले पात्र
मुढे वेसवा होशील, दे फेकून सूत्र ॥४॥
बुवा दांभिक, त्याच्याभोवती बाया
काम कोपला, भ्रष्ट करितो काया
अवघे अगम्य, ही अविद्या माया
कसला परमार्थ विटाळिसी काषाय वस्त्र
मुढे वेसवा होशील, दे फेकून सूत्र ॥५॥
गीतासार, चार वेद, शास्त्रपुराण
सांगती अनादी अनंत नारायण
श्रेष्ठ भक्तिमार्ग, मुक्तीचे तेच साधन
पुरंदर विठ्ठल पुरे, नको तंत्र अपवित्र
मुढे वेसवा होशील, दे फेकून सूत्र ॥६॥