बोलूं नको मजसी कान्हा । राग तुझा आला ॥धृ०॥
गाई माझ्या वना नेशी । आडमार्गीं सोडुनी देशी ।
कुंजवनीं कां न येसी । सांग तूं मला ।
बोलूं नको मजसी कान्हा० ॥१॥
लहान माझी गाय कृष्णा । चुकविली तूं वरल्या राना ।
आणुनी सोडी माझ्या सदना । शिणवुं नको मजला ।
बोलूं नको मजसी कान्हा० ॥२॥
लहान माझीं गोप बाळें । तुझीया संगें खेळ खेळे ।
कालिया डोहीं विशाल जळें । लोठुनी कां पळाला ।
बोलूं नको मजसी कान्हा० ॥३॥
गोड गोड साखर लोणी । खाण्याला देतें आणुनी ।
तरी तुं जाशी कृष्णा पळुनी । चकविसी कां वारीला ।
बोलूं नको मजसी कान्हा० ॥४॥