म्हणे उद्धव देवा गोड भक्तिरस किती ।
अज्ञान जिवाला देईल नित्य तृप्ती ॥धृ०॥
हे नऊ रसांचें भरलें असें सरोवर ।
त्यामधे असती हे जीव चार प्रकार ।
एक बद्ध मुमुक्ष साधक आणि सिद्ध ।
या चहु जणांसी भक्ति देई आनंद ॥चाल॥
अज्ञान भक्ति सरोवरीं राहती । मुमुक्ष थोडा रस सेविती ।
साधक त्यांत ते बुडी मारिती ॥चा.पू०॥
ते भक्तराज मग तृप्त होवुनी वर येती ।
ते अज्ञ जनांना भक्तिरस पाजिती । म्हणे उद्धव० ॥१॥
या भक्तिरसामधे एक असें विचित्र ।
हा सेवन करितां देह होय पवित्र ।
त्या नाम रसाने चित्त होय तें शुद्ध ।
मग वृत्ती पालटुनी मुमुक्ष होईल सिद्ध ॥चाल॥
ती भक्ति करी मुमुक्षा साधक ।
ना भक्ताला जगीं कांही बाधक ।
हें तत्त्व भक्तिमधे आहे अधिक ॥चा.पू.॥
या भक्तिरसाचें वर्णन करुं मी किती ।
ही सर्व जनांना अंतीं देईल मुक्ति ।
म्हणे उद्धव देवा गोड भक्तिरस किती० ॥२॥
या भक्तिमाजीं एक गुह्य तें आहे ।
ही भक्ति करितां ज्ञान आंतुनी होये ।
तें द्वैत जावुनी शत्रुमित्र एक पाहे ।
सर्वांभूतीं भगवत् भाव धरुनीं राहे ॥चाल॥
तें मीं -तूंपण सर्व जातसें । त्या भक्ताहृदयीं हरी वसतसे ।
म्हणुनीया अंतरीं शांती ती असे ॥चा.पू.॥
ऐसे हे भक्त प्राणाहुनी तुज आवडती ।
त्यांवांचुनि तुजला प्रिय कोणी ना जगतीं ।म्हणे उद्धव० ॥३॥
या भक्तिरसामधे मोठी आहे देवा मौज ।
तूं प्रगट होउनी भक्ता सांगसी गूज ।
अंतरीं मनामधे कांही येतां किलमिष ।
काढुनी बाहेरी शुद्ध करी भक्तास ॥चाल॥
उपकार किती मी मानुं मानसीं । इंद्रीयां सुख देउनी पाळसी ।
भक्ताचा योगक्षेम वाहसी ॥चा.पू.॥
उपकार फेडाया करुं चौथी हरीभक्ति ।
म्हणे वारी मुरवूं भक्तिरसांतची वृत्ती ।म्हणे उद्धव० ॥४॥