कन्हैय्या जाऊं दे माझी वाट धरुं नको ।
किती मी सांगुं तुला ॥कन्हैय्या० ॥ किती मी सांगुं तुला० ॥धृ॥
यमुनेसी जातां अवचित येवुनी । घट ते फोडिसी खडे मारुनी ।
धरितोसी आमुचे हाताला ॥कन्हैय्या०।
धरितोसी आमुचे हाताला । कन्हैय्या० ॥१॥
सासू ही माझी वाईट भारी । धाक असे रे तिचा अंतरीं ।
सोडी जाऊं दे मजला ॥कन्हैय्या०॥सोडी जाऊं दे मजला ॥कन्हैय्या०॥२॥
तान्हें बालक रडेल घरींरे । जाऊं दे कृष्णा मजला त्वरे रे ।
उशीर फारच झाला ॥कन्हैय्या ॥ उशीर फारच झाला। कन्हैय्या०॥३॥
गौळणी आम्हीं स्त्रियांरे घरती । मस्करी कृष्णा करुं नको भलती ।
कशी नाही लाज तुला ॥कन्हैय्या०॥
कशी नाही लाज तुला।कन्हैय्या०॥४॥
श्रीकृष्ण चरणीं गोपी रमल्या । ते पद वारीने हृदयीं धरिला ।
मुक्तची हो होण्याला ॥हरीरे॥ मुक्तची हो होण्याला । कन्हैय्या०॥५॥