भजन करा तुम्हिं भजन करा । निशिदिनिं हरिचें भजन करा ।
चुकवा चौर्यांशीचा फेरा । निशिदिनीं ॥धृ०॥
रामकृष्ण वाचें उच्चारा । हाच भक्तीचा मार्ग बरा ।
प्रेमें हृदयीं हरिसी स्मरा । दूर करोनी संसारा । भजन करा० ॥१॥
हरिभजनाची करुनी त्वरा । निद्रा आळस दूर करा ।
नित्य नवें हो प्रेम धरा । हरिनामाचा गजर करा । भजन करा० ॥२॥
नामचि नौका धरुनी तरा । भवसिंधू हा पार करा ।
काम क्रोध हे दूर करा । क्षमा शांतिसी मनीं धरा । भजन करा० ॥३॥
सर्व सुखाचा हाचि झरा । श्रीहरीचे नित चरण धरा ।
वारि म्हणे हो भक्ति करा । हाचि उत्तम मार्ग नरा ।
श्रीहरीचें तुम्हि भजन करा । भजन करा० ॥४॥