भक्तिवांचुनी मुक्ति मिळेना खचित रे जाण० ।
श्रीहरी भक्तिवांचुनी साधन उगाच तो शीण ॥ध०॥
भक्तिवांचुनी झालें जरी हो त्रिकाळ तें ज्ञान० ।
भक्तिविणें जडेल अंगीं व्यर्थची अभिमान ।
अखंड भक्ति करुनी हरीचे पदीं व्हावें लीन० ।
मुक्त होण्याला हो हेंची मुख्य साधन । भक्तिवांचुनी० ॥१॥
भक्तिवांचुनी केलें जरी हो जपतप साधन० ।
गोडी नसे त्या जैसें पकविलें लवणाविण अन्न ।
लवणाविणें गोडी येईना जरी ती सुगरीण० ।
भक्तिवांचुनी तेसें त्याचें फुकट हो ज्ञान ।भक्तिवांचुनी० ॥२॥
ऐशा श्रेष्ठ भक्तीने हो तरले तरी कोण ।
प्रल्हाद, ध्रुव, नारद आणि सनकसनंदन ।
ऐसा हरीचा भक्तिमहिमा असे हो अगम्य० ।
वारी म्हणे हो मज वर्णायाला नाहीं तें ज्ञान । भक्तिवांचुनी० ॥३॥