मन हें हरिपदीं रमलें । ते विषय मुळी न गमलें ॥धृ०॥
ते गातां हरीचे गुण । तन्मय होई हें मन ।
हृदयीं प्रगटें श्रीकृष्ण । पाहतां मन शांत झालें । मन हें० ॥१॥
चित्ताला आली शांती । स्यानंदीत झाली वृत्ती ।
नच उरली द्वैतभीती । नीजस्वरुपींच राहीलें । मन हें० ॥२॥
नामाची लागली गोडी । विषयाची झाली नावडी ।
तें नाम न रसना सोडी । हृदयीं वारीने धरिलें । मन हें० ॥३॥