कलियुगांत ऋषीकुळांत दत्त प्रगटले ।
अत्री अनुसूये गृहीं बाळ जाहले ॥धृ०॥
मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा हो बुधदिनीं ।
प्रगट झाले जड मूढ ताराया जनीं ।
अवतार धरी युगायुगीं भक्ताकरणीं ॥चाल॥
दीनासी मायबाप गुरुराज जाहले ।कलियुगांत० ॥१॥
त्रिगुण सगुण पूर्णब्रह्म हें तरी असें ।
रुप मनोहर बहू सुंदर दिसे ।
वर्णाया गुण समर्थ वेदही नसे ॥चाल॥
काळासी दंडाया दंड धरीयले । कलियुगांत० ॥२॥
दत्त नाम घेतां पाप ताप जातसे ।
भक्तासी रक्षाया जवळ उभा असे ।
वारीच्या चित्तीं अखंड बैसला असे ॥चाल॥
अक्षयीं या चरणीं मन लीन जाहलें । कलियुगांत० ॥३॥