भक्ति करावी । श्रीहरिपदीं वृत्ति विरावी ॥धृ०॥
भक्तीचा तो असे सुखसोहळा । सगुण श्रीहरि पाहावा डोळा ।
घ्यावें चुंबन वेळोवेळां । धरुनी जीवी । श्रीहरिपदीं० ॥१॥
पाहातां नंदाच्या त्या बाळा । येतो प्रेमाचा उमाळा ।
अंतरीं प्रगटें तो जिव्हाळा । गीतें गावीं ।श्रीहरिपदीं० ॥२॥
ऐसा भक्तीचा तो महिमा । अखंड घेतां श्रीहरीनामा ।
येतो अंतरीं फारच प्रेमा । वारी तोषवी ।श्रीहरिपदीं० ॥३॥