आनंदाचा कंद हरी हा । हृदय मंदिरीं पाहिला ॥
अस्ति भाती प्रिय जो आत्मा । सद्गुरुनी मज दाविला ॥धृ०॥
स्थूल सूक्ष्म कारण टाकुनी । माहाकारणी राहिला ।
सद्गुरुकृपें अंजन लेवुनी । स्वयंप्रकाशीत देखीला । आनंदाचा कंद० ॥१॥
पंचकोशांतीत असुनी । अंतर बाह्य व्यापला ।
भक्ताचीया प्रेमासाठी । सगुण सुंदर तो झाला । आनंदाचा कंद० ॥२॥
सत्चित सुखमय अखंड अद्वय । वेद श्रुतीने गायीला ।
सद्गुरुकृपें वारी म्हणे मी । अखंड हृदयीं ध्यायीला । आनंदाचा कंद० ॥३॥