देवा सांगरे मजला । काय आवडतें तुजला । देवा० ॥धृ०॥
देऊं का सायसाखर । का देऊं लोणी भाकर ।
तें सांग सख्या सत्वर । यांतूनि काय हवें तुला ।देवा० ॥१॥
घालूं का पुष्पहार । तुळशी वाहूं का चरणावर ।
वैजयंती हिरवीगार । गुंफोनी देऊं का तूला । देवा० ॥२॥
करुं कपडे का सुंदर । भरजरि तो पीतांबर ।
मुगूट मस्तकावर । घालोनि नटवूं का तुला । देवा० ॥३॥
हें करून मी भक्तिभावें । पुसतें तूं मज सांगावें ।
प्रेमाने तुज अर्पावें । वाटतें ऐसे वारीला । देवा० ॥४॥