२९८
बावनाचे संगती द्रुम भावें रातलें ।
सेखीं आपुलिया मुकलें जातीकुळा ॥१॥
लोहाचे सायास परिसेंसी फ़िटलें ।
तैसें मज केलें गोवळ्यानें ॥२॥
मेघजळ वोळे मिळें सिंधूचिया जळा ।
तैसा नव्हे तो वेगळा एक होऊनि ठेला ॥३॥
बापरखुमादेवीवरविठ्ठल नुरेचि कांहीं ।
उत्तम मध्यम ठाई व्यापुनि असे ॥४॥
२९९
जे ब्रम्हीं पाहतां मन न सिरे कोठें ।
ऐसियाचे पेठें मज उभे केलें ॥१॥
नावाडा श्रीरंगु जाहाला हाळुवारु ।
तेणें पावविला पारु ब्रह्मविद्येचा ॥२॥
श्रीगुरुविण सर्व शून्य हेंचि मी जाणें ।
तेथिचिये खुणें निवृत्तिराजु ॥३॥
बापरखुमादेविवरी विठ्ठलीं अनुसंधान ।
रात्रिदिन लीन ब्रह्मस्थिति ॥४॥
३००
नवांची खाणी दहाव्यानें शोकिली ।
अकराव्यानें जाली देशधडी ॥१॥
तें ब्रम्हपंथीं माखलें ।
मरोनि जागृत ते जालें
मन गे माये ॥२॥
अवघे अंबर माझें तिंबलें ।
ब्रह्मरसें पिळिलें वो रंग नव्हे ॥३॥
सार वियोगें माझें कर्म बुडालें ।
निष्कर्म जाले म्हणौनि नातळे ॥४॥
जागृति स्वप्न सुषुप्ति बुडाली ।
रखुमादेविवरें सहित गिळीली ॥५॥
३०१
ब्रह्माची पुतळी मीचि पै जालों ।
ब्रह्माचि लेईलो अंजनगे माय ॥१॥
ब्रह्मचि सुख ब्रह्मपदीं पावलों ।
ब्रह्मसुखीं निवालों निजींनिज देखा ॥२॥
बापरखुमादेविवरु ब्रह्मपदीं सामावला ।
मजसहित घेऊनि गेला निजपुटीं ॥३॥
३०२
सिध्द सांडूनि निजबोधा गेलें ।
निजबोधु भुललें ब्रह्मभुली ॥१॥
आठवेना माझें पूर्वजन्मग्राम ।
अवघाचि श्रम माझा हिरोनि नेला ॥२॥
बापरखुमादेविवरविठ्ठलें वेडावलें ।
आपणासहित मज ब्रह्मीं बुडविलें ॥३॥
३०३
मन हें राम जालें मन हें राम जालें ।
प्रवृत्ति ग्रासुनि कैसें निवृत्तीसी आलें ॥१॥
श्रवण कीर्तन पादसेवन कैसें विष्णुस्मरण केलें ।
अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केलें ॥२॥
यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिले ।
ध्यान धारणा आसन मुद्रा कैसे समाधीसी आले ॥३॥
बोधीं बोधलें बोधितां नये ऐसें जालें ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलें माझें मीपण हारपलें ॥४॥
३०४
देखावया लागी जव अनौतें पाहिलें ।
तव तनु मनु त्रिभुवनीं व्यापिलेंगे माये ॥१॥
नवलावो जालें जग हरिच होऊनि ठेलें ।
आठऊं विसरलें काय करुं ॥२॥
बापरखुमादेविवरविठ्ठलें साच केलें ।
लोह परिसेंसि झगटलें तैसें जालेंगे माये ॥३॥
३०५
नेणते ठायीं मन पाहों गेलें ।
तंव मरणचि पावले जागृतीगे माये ॥१॥
जागृती अंतीं स्वप्न देखिलें ।
जागृतीं स्वप्न दोन्ही हारपलें ॥२॥
रखुमादेविवरु मरणधरणा भ्याला ।
तेणें मज दाविला तेजोमय ॥३॥
३०६
मन मारुनियां मुक्त पैं केलें ॥
मीपण माझें नेलें हिरोनियां ॥१॥
मज लाविले चाळा लाविले चाळा ।
विठ्ठलुचि डोळां बैसलासे ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु लाघवी भला ।
आपरुपीं मज केला सौरसु ॥३॥
३०७
अगाधपण माझें अंगी बाणलें वरपडें
देखिलें मृत्तिका लिंग ॥१॥
त्यासि चैतन्य नाहीं गुण नाहीं ।
चळण नाहीं गुण रुप नाहीं ॥२॥
माझ्या शरीरीं ज्योतिर्लिंग उगवलें ।
अगाध कळविलें हस्तेंविण ॥३॥
बापरखुमादेविवरु ज्योतिर्लिंग विश्वनाथ ।
तेणें माझा मनोरथ पुरविलागे माये ॥४॥
३०८
अकरावरी सातवें होतें ।
सातवें कोठें मावळलेंगे माये ॥१॥
सहस्त्राची भरोवरी जालीगे माये ।
लय लक्षीं पाहे तंव चोजवेना ॥२॥
रखुमादेविवरु दोन्ही घेतलीं ।
विरुनि टाकिलीं ब्रह्मडोहीं ॥३॥
३०९
नेत्र लाउनि मनासीं जंव पुसों जाय ।
तंव देवें नवल केलेंगे बाईये ॥१॥
देवें नवल केलें देवें नवल केलें ।
शेखी सांगतां लाजिरवाणें ॥२॥
बापरखुमादेविवर विठ्ठलें ।
माझें बाह्यअभ्यंतर व्यापिलें ॥३॥
३१०
चैतन्य चोरुनि नेलें चित्त माझें सवें गेलें ।
पाहे तंव तंव तन्मय जालें गे माय ॥१॥
देवें नवल केलें मन माझें मोहिलें ।
विसरु तो आठऊ जालागे माये ॥२॥
यासी जाणावयालागी अनुउते पाहे ।
तंव त्रिभुवन तन्मय जालेंगे माये ॥३॥
बापरखुमादेविवरें विठ्ठलरायें ।
माझें सबाह्यभ्यंतर व्यापिलेंगे माय ॥४॥