३३३
देवा तुज नेणतांना कांहीं न सांभाळितां
नाना याति धरुनि धांविन्नलों ।
धांवतां धांवतां पुढेण सुनाट देखिलें
त्याचि पाउलीं मागुतां मुरुडलोंजी सुंदरा ॥१॥
आलों भक्तिशाळें अतौता तेथें काहींएक
गौरव गमलें ।
जेणें वेषें आहे तेणें तुजजोगें नव्हे
मग ऐसें कांहीं एक गुंथावें केलेंजी सुंदरा ॥२॥
असो येणें औटहातें काई होईल म्हणौनि
एकचि वेळा उगविलें ।
आब्रह्म सकळैक जग आपणापें
तुज एकालागीं आणियेलें हो सुंदरा ॥३॥
आतां अवघा तुज डोळां पाहेन दातारा तुज
आलिंगीन अवघांचि बाहीं ।
अवघा मुखीं तुजसी बोलत आहे न
ध्याईजे मा चालिली अवघाचि पायींजी सुंदरा ॥४॥
आतां अवघा वेळु अवघेपणें तुज
अवघीयातें गिळूनि ठेलों ।
तुझिये भक्तीची चवी जों लागली
तंव अवघेपणा उबगलोंजी सुंदरा ॥५॥
पाहतां दर्पण परता नेलिया
दुजेपण रिघे पाहाते भागीं ।
ऐसे आदि मध्य अवसान जाणोनि
अवचितां जडिनलों तुमच्या अंगीं हो सुंदरा ॥६॥
आतां तुज पावेन कवणे दशे
नातळसी दुजेपण केलाहो तूंपण नाहीं ।
तेथें मीपण कैचें होतेंनि मिळणें
ते गेलें ठाईच्या ठाईजीं सुंदरा ॥७॥
ऐसा न जेविलाचि जेविला कीं जेविलाचि
भुकेला तृप्तातृप्त दोन्ही नाहीं ।
बापरखुमादेविवरविठ्ठला वरपडा जालों
ऐसियासी कीजे काईजी सुंदरा ॥८॥
३३४
आदि पुरुषा जय विश्वंभरिता
नानापरि तुझा खेळू ।
जया ब्रह्मगोळु कल्पकोडी घडी
मोडिता नलगे वेळु ।
वेदपुराणें मत्सरें भांडती बहुतें
करित होती कोल्हाळु ।
होय नव्हे ऐसी भ्रांतिसी गुंतली
तयासि तूं आकळु गा ॥१॥
तुझें नाम बरवें तुझें नाम बरवें ।
हरि वोळगों आपुल्या साच भावें ॥ध्रु०॥
गायत्री पासाव वोळलें क्षीर करणी
पासाव विस्तारु ।
दूध दही ताक नवनीत
आगळे चहूंचा वेगळा परिभरु ।
जो ज्याविषयें पढिये तोचि
मानिती थोरु ।
सांठवण करिंता एकवट नव्हे
तैसा नव्हे भक्तिआचारु ॥३॥
कवणा एका राया बहुत पैं सेवक
त्यासि दिधला वेगळा व्यापार ।
आपलाले म्हणिये सुचित राहटतां
मान करील अपार ।
समर्थाचा मोहो जाणुनि वेगळा
करुं नये तयासि मत्सर ।
साभिलाषपणें वर्ततां देखेल शिक
लाविल हा निर्धार ॥४॥
कव्हणा एका राया बहुत पै लेंकुरें
आळविती नाना परी ।
ऐकें पाठीचीं एकें पोटीचीं एकें
वडिलें एकें धारि सेखीं
सारिखाचि मोहो करी ।
द्वैतभेदु जया नव्हे संवादु सेखीं
तयासि तो निर्धारु गा ॥५॥
सागरींचे तरंग आनेआन उमटती
तेतुले अवतार होती ।
शिव केशव उंच नीच आगळे
कासियानें मानावी भक्ति ।
परमात्मया सौरसें तेचि हे
मानली विश्वमूर्ति ।
बापरखुमादेविवरा विठ्ठला परियेसी
ज्ञानदेवो करिताहे विनंति गा ॥६॥
३३५
आल्हादपण काय सांगशी देवा ।
मन बैसें भावा तैसें करी ॥१॥
हा घोडा हा राऊत करुनि दाखवा ।
मग पदीं बैसवा ब्रह्माचिये ॥२॥
मी डोलेन आनंदे तुमचेनि प्रसादें ।
रत्न जेंवि अंधें देखियेले ॥३॥
करा तत्त्वीं सौरसु म्हणे निवृत्तिदासु ।
जेथें रात्री दिवसु अथिचिना ॥४॥
३३६
तुझे पवाडे सांगतां तुजपुढें ।
मुक्तीची कवाडे उघडती ॥१॥
नाहीं जातिकुळ म्यां तुज पुसिलें ।
पन मावळलें देखिनिया ॥२॥
तुझें तुज पुसतां लाजिरवाणें ।
तरि हांसति पिसुणें प्रपंचाचीं ॥३॥
उगवितां भलें कीं नुगवितां सांपडलें ।
ज्ञानदेवो बोले निवृत्तीसी ॥४॥
३३७
फळाचें बीज कीं फळ ।
म्हणौनि पत्र पुष्प मूळ चोजवेना ॥१॥
ऐसि हे रचना नकळे गा देवा ।
सिध्दांतु अनुभव साक्ष देतो ॥२॥
मृत्तिकेची पृथ्वी कीं पृथ्वीची मृत्तिका ।
या गति अनेका चोजवेना ॥३॥
बापरखुमादेविवरु निरंतरी ।
बाह्यअभ्यंतरी नांदतुसे ॥४॥