(मक्काकालीन, वचने ४३)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
अलिफ, लाऽऽम, मीऽऽम, रा ही ईश्वरी ग्रंथाची वचने आहेत, आणि जे काही तुमच्या पालनकर्त्याकडून तुम्हांवर अवतरले गेले आहे ते सत्य आहे, पण (तुमच्या लोकांपैकी) बहुतेक लोक मानीत नाहीत. (१)
तो अल्लाहच आहे ज्यने आकाशांना अशा आधाराविना स्थापित केले जे तुम्हाला दिसत आहे, मग तो आपल्या राजसिंहासनावर विराजमान झाला आणि त्याने सूर्य व चंद्राला एका कायद्याच्या आधीने केले, या सार्या व्यवस्थेतील प्रत्येक वस्तू एका ठरलेल्या वेळेसाठी चाललेली आहे आणि अल्लाहच या सर्व कार्याची तजवीज करीत आहे. तो संकेत उघड करून करून देतो कदाचित तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या भेटीचा विश्वास बाळगाल, आणि तोच आहे ज्याने ही पृथ्वी विस्तृत केली आहे, हिच्यात पर्वतांच्या मेखा रोवाल्या आहेत आणि नद्या प्रवाहित केल्या. त्यानेच प्रत्येक प्रकारच्या फळांच्या जोडया निर्माण केल्या आणि तोच दिवसावर रात्र आच्छादित करीत असतो. या सर्व वस्तुमध्ये मोठे संकेत आहेत त्या लोकांसाठी जे गंभीरपणे विचार करतात. (२-३)
आणि पहा! पृथ्वीवर वेगवेगळे भू-भाग आढळतात जे एकमेकांशी संलग्न असलेले आहेत. द्राक्षांच्या बागा आहेत, शेते आहेत. खजुरींची झाडे आहेत ज्यांच्यापैकी काही एकेरी आहेत आणि काही दुहेरी, सर्वांना एकच पाणी सिंचित करतो, परंतु चवीत आम्ही काहींना उत्तम बनवितो तर काहींना कनिष्ठ. या सर्व वस्तुंमध्ये पुष्कळसे संकेत आहेत त्या लोकांसाठी जे बुद्धिचा उपयोग करतात. (४)
आता जर तुम्हाला आश्चर्य करावयाचे असेल तर आश्चर्य करण्यास योग्य लोकांचे हे कथन आहे. “जेव्हा आम्ही मरून माती होऊ तेव्हा काय आम्ही नव्याने निर्माण केले जाऊ?” हे ते लोक आहेत ज्यांनी आपल्या पालनकर्त्याशी द्रोह केला आहे. हे ते लोक आहेत. ज्यांच्या मानेत जोखड’ अडकलेले आहेत. हे नरकवासी आहेत आणि नरकामध्ये सदैव राहतील. (५)
हे लोक भल्यापूर्वी वाईटाकरिता घाई करीत आहेत वस्तुत: यांच्यापूर्वी (ज्या लोकांचे असे वर्तन राहिले आहे त्यांच्यावर अल्लाहच्या प्रकोपाची) धडा शिकविणारी उदाहरणे घडलेली आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की तुझा पालनकर्ता लोकांचा अत्याचार असताना देखील त्यांच्या बाबतीत डोळेझांक करतो. आणि हेही सत्य आहे की तुझा पालनकर्ता कठोर शिक्षाही देणारा आहे. (६)
हे लोक ज्यांनी तुमचे म्हणणे ऐकण्यास इन्कार केला आहे. म्हणतात की, “या व्यक्तीवर याच्या पालनकर्त्याकडून एखादा संकेत का अवतरला नाही?” तुम्ही तर केवळ सावध करणारे आहात, आणि प्रत्येक जनसमूहासाठी एक मार्गदर्शक आहे. (७)
अल्लाह प्रत्येक गर्भवतीच्या गर्भाशयाबद्दल जाणतो. जे काही त्याच्यात तयार होते त्यालाही जाणतो आणि जे काही त्यात कमी जास्त होते त्याचीही त्याला माहिती असते. प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्यापाशी एक प्रमाण निश्चित आहे. तो गुप्त आणि प्रकट प्रत्येक गोष्टीचा विज्ञाता आहे, तो महान आहे आणि प्रत्येक स्थितीत उच्चतर राहणारा आहे. तुम्हापैकी कोणीही मग तो मोठयाने बोलो अथवा हळू आणि कोणी रात्रीच्या अंध:कारात लपलेला असो अथवा दिवसाच्या प्रकाशात चालत असो त्याच्यासाठी सर्व एकसारखेच आहे. प्रत्येक माणसाच्या पुढे आणि मागे त्याने नियुक्त केलेले निरीक्षक लागून आहेत जे अल्लाहच्या आज्ञेने त्याच्यावर देखरेख करीत आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह कोणत्याही जनसमूहाच्या स्थितीत परिवर्तन करीत नाही जोपर्यंत तो स्वत: आपल्या गुणांना बदलत नाही आणि जेव्हा अल्लाहने एखाद्या जनसमूहावर अरिष्ट आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते कोणाच्याही टाळल्याने टळू शकत नाही, आणि अल्लाहच्या विरोधात अशा जनसमूहाचा कोणी संरक्षक व मदतगारही असू शकत नाही. (८-११)
तोच आहे जो तुमच्यासमोर विजा चमकवितो ज्यांना पाहून तुम्हाला भयही वाटू लागते आणि आशाही पल्लावतात. तोच आहे जो पाण्याने भरलेले ढग उठवितो. मेघगर्जना त्याच्या स्तुतीबरोबर त्याचे पावित्र्यगान करते आणि दूत त्याच्या धास्तीने थरथर कापत त्याचे पावित्र्य वर्णन करतात. तो. कडकडणार्या विजांना पाठवितो (आणि कित्येक वेळ) यांना ज्यावर इच्छितो अगदी तशा स्थितीत कोसळवितो जेव्हा लोक अल्लाहच्या बाबतीत वाद घालीत असतात. खरोखर त्याची किमया मोठी जबरदस्त आहे, त्याचाच धावा करणे सत्याधिष्ठित आहे. उरले ते ज्यांचा धावा हे लोक त्याला सोडून करतात, ते त्यांच्या प्रार्थनेला काहीच प्रतिसाद देऊ शकत नाहीत. त्यांचा धावा करणे तर असे आहे असे एखाद्या मनुष्याने पाण्याकडे हात पसरून त्याला विनंती करावी की तू माझ्या तोंडापर्यंत पोहोच. वस्तुत: पाणी त्याच्यापर्यंत पोहचणार नाही, बस्स अशाच प्रकारे अश्रद्धावंतांच्या प्रार्थनादेखील काहीच नाही परंतु एक लक्षहीन बाण. तो तर अल्लाहचे आहे ज्याला आकाश आणि पृथ्वीतील प्रत्येक वस्तू स्वखुशीने वा लाचारीने नतमस्तक होत आहे. आणि सर्व वस्तूंच्या सावल्या सकाळ संध्याकाळ त्याच्या समोर झुकतात. (१२-१५)
यांना विचारा आकाश व पृथ्वीचा पालनकर्ता कोण आहे? सांगा, अल्लाह, मग यांना सांगा की जर वस्तुस्थिती अशी आहे तर तुम्ही त्याला सोडून अशा उपास्यांना आपले कार्यसाधक ठविले आहे का जे स्वत: आपल्याकरितादेखील कसल्याही फायद्या-तोटयाचे अधिकार बाळगत नाहीत? सांगा, काय आंधळा आणि डोळस समान असतात? काय प्रकाश व अंध:कार समान असतात? आणि जर असे नाही तर काय यांनी ठरविलेल्या भार्गादारांनी देखील अल्लाहसारखे काही निर्माण केले आहे की जेणेकरून यांच्यासाठी सृजनाची बाब संदिग्ध बनली आहे? सांगा, प्रत्येक वस्तूचा सृजनकर्ता केवळ अल्लाह आहे आणि तो एकमेव आहे, सर्वांवर प्रभुत्वसंपन्न! (१६)
अल्लाहने आकाशातून पाण्याचा वर्षाव केला आणि प्रत्येक नदी आणि नाला आपल्या पात्रानुसार ते घेऊन निघाला. मग जेव्हा पूर आला तेव्हा पृष्ठभागावर फेसदेखील आला, आणि असेच फेस त्या धातूवरदेखील येत असतात ज्यांना दागिने व भांडी इत्यादी बनविण्यासाठी लोक वितळवीत असतात. याच उदाहरणाद्वारे अल्लाह सत्य आणि असत्याच्या बाबींना स्पष्ट करतो. जो फेस आहे तो नाहीसा होतो आणि जी वस्तू माणसाच्या फायद्याची आहे ती पृथ्वीत स्थिरावते. अशा प्रकारे अल्लाह उदाहरणांनी आपली गोष्ट समजावितो. (१७)
ज्या लोकांनी आपल्या पालनकर्ताचे आमंत्रण स्वीकारले त्यांच्यासाठी भलाई आहे आणि ज्यांनी त्याला स्वीकारले नाही ते जर पृथ्वीच्या सर्व संपत्तीचे जरी मालक असले व तितकीच आणखी संपत्ती त्यांनी मिळविली तरी ते अल्लाहच्या पकडीतून वाचण्यासाठी ती सर्व मोबदल्यात देऊन टाकण्यास तयार होतील. हे ते लोक आहेत ज्यांच्याकडून वाईट प्रकारे हिशेब घेतला जाईल आणि यांचे ठिकाण नरक आहे, अत्यंत वाईट ठिकाण.
बरे हे कसे शक्य आहे की तो मनुष्य जो तुमच्या पालनकर्त्याच्या या ग्रंथाला जो त्याने तुम्हावर अवतरला आहे, सत्य मानतो, आणि तो मनुष्य जो या वस्तुस्थितीशी आंधळा आहे, दोघे समान आहेत? उपदेश तर बुद्धीमान लोकच स्वीकारीत असतात. आणि त्यांचे वर्तन असे असते की अल्लाहशी केलेल्या आपल्या वचनांची ते पूर्तता करतात आणि त्याची भक्कम बांधीलकीनंतर सोडून टाकत नाहीत. त्यांचे वर्तन असे असते की अल्लाहने ज्या ज्या संबंधांना कायम राखण्याची आज्ञा दिली आहे त्यांना कायम ठेवतात. आपल्या पालनकर्त्याला भितात आणि या गोष्टीचे भय बाळगतात की एखादे वेळी त्यांच्याकडून वाईट प्रकारे हिशेब घेतला जाऊ नये. त्यांची अवस्था अशी असते की आपल्या पालनकर्त्याच्या प्रसन्नतेकरिता संयमाने वागतात, नमाज कायम करतात, आमच्या दिलेल्या उपजीविकेतून उघड व गुप्तपणे खर्च करतात आणि वाईटाला भलाईने नाहीसे करतात, परलोकाचे घर त्याच लोकांसाठी आहे. अर्थात अशी उद्याने जी त्यांची चिरकालीन निवासस्थाने असतील. ते स्वत:देखील त्यांच्यात प्रवेश करतील व त्यांचे वाडवडील व त्यांच्या पत्नीं आणि त्यांच्या संततीपैकी जे जे सदाचारी आहेत तेदेखील त्यांच्या समवेत तेथे जातील. दूत चोहोंबाजूनी त्यांच्या स्वागताकरिता येतील. आणि त्यांना सांगतील. “तुम्हावर कृपा आहे. तुम्ही जगात ज्याप्रकारे संयम पाळला त्यामुळे आज तुम्ही याचे हक्कदार ठरला आहात.” तर किती छान आहे हे परलोकाचे घर! उरले ते लोक जे अल्लाहच्या वचनाशी बांधीलकी पक्की केल्यानंतर तोडून टाकतात जे त्या संबंधांना तोडतात ज्यांना अल्लाहने जोडण्याची आज्ञा दिली आहे आणि जे पृथ्वीवर उपद्रव माजवितात, ते धिक्कारास पात्र आहेत. त्यांच्यासाठी परलोकात अत्यंत वाईट ठिकाण आहे. (१८-२५)
अल्लाह ज्याला इच्छितो विपुल उपजीविका प्रदान करतो आणि ज्याला इच्छितो त्याला मोजकी उपजीविका देतो. हे लोक ऐहिक जीवनात मग्न आहेत. खरे पाहता ऐहिक जीवन परलोकाच्या तुलनेत एका अल्पशा सामुग्री व्यतिरिक्त काहीच नाही. (२६)
हे लोक ज्यांनी (मुहम्मद (स.) च्या प्रेषितत्वाला मानण्यास) नकार दिला आहे. सांगतात. “या व्यक्तीवर याच्या पालनकर्त्याकडून एखादी निशाणी का उतरली नाही?” सांगा, अल्लाह ज्याला इच्छितो मार्गभ्रष्ट करतो आणि तो आपल्याकडे येण्याचा मार्ग त्यालाच दाखवितो जो त्याच्याकडे रुजू होतो. असलेच लोक आहेत ते ज्यांनी (या पैगंबराचे आवाहन) मानले आहे आणि त्यांच्या ह्रदयांना अल्लाहच्या स्मरणाने समाधान प्राप्त होते. जाणून असा! अल्लाहचे स्मरणच ती गोष्ट आहे ज्याने ह्रदयाला समाधान लाभत असते. मग ज्या लोकांनी सत्य आवहनास मानले आणि सत्कमें केली, ते सुदैवी आहेत आणि त्यांच्यासाठी चांगला शेवट आहे. (२७-२९)
हे पैगंबर (स.), याच वैभवाने आम्ही तुम्हाला प्रेषित बनवून पाठविले आहे एका अशा जनसमूहात ज्याच्यापूर्वी अनेक जनसमूह होऊन गेले आहेत, जेणेकरून तुम्ही या लोकांना तो संदेश ऐकवावा जो आम्ही तुमच्यावर अवतरला आहे, अशा स्थितीत की हे आपल्या अत्यंत मेहरबान अल्लाहचे द्रोही बनले आहेत. यांना सांगा की तोच माझा पालनकर्ता आहे, त्याच्याशिवाय कोणीही ईश्वर नाही, त्याच्यावरच मी भरोसा केला व तोच माझे आश्रयस्थान आहे. (३०)
आणि काय झाले असते जर एखादा असा कुरआन अवतरला गेला असता ज्याच्या शक्तीने पर्वत चालू लागले असते अथवा जमीन दुभंगली असती अथवा मृतलोक कबरीतून निघून बोलू लागले असते? (अशा प्रकारचे संकेत दाखविणे काही कठीण नाही.)किंबहुना सर्वाधिकारच अल्लाहच्या अखत्यारीत आहे. मग काय श्रद्धावंत (आतापर्यंत अश्रद्धावंतांच्या मागणीच्या उत्तरात एखादा संकेत प्रकट होण्याची आशा लावून बसले आहेत आणि ते हे समजून) निराश झाले नाहीत की जर अल्लाहने इच्छिले असते तर सर्व मानवांना बोध केला असता? ज्या लोकांनी अल्लाहशी द्रोहाची वर्तणूक अवलंबिली आहे त्यांच्यावर त्यांच्या कृत्यामुळे कोणती ना कोणती आपत्ती येतच असते अथवा त्यांच्या घराजवळ एखाद्या जागी आपली कोसळत असते. हा क्रम चालू राहील येथपावेतोकी अल्लाहचे वचन पूर्ण होईल. नि:संशय अल्लाह आपल्या वचनाविरूद्ध जात नाही. तुमच्यापूर्वी देखील कित्येक प्रेषितांची चेष्टा केली गेली आहे. परंतु मी सदैव इन्कार करणार्यांना ढील दिली आणि सरतेशेवटी त्यांना पकडले. मग पहा. माझी शिक्षा किती कठोर होती. (३१-३२)
मग काय तो जो एक एक जीवाच्या कमाईवर नजर ठेवतो (त्याच्या विरोधात हे दु:साहस केले जात आहे की) लोकांनी त्याचे काही भागीदार ठरविले आहेत? हे पैगंबर (स.) यांना सांगा (जर खरोखर ते अल्लाहने स्वत: बनविलेले भागीदार आहेत तर) जरा त्यांची नावे घ्या की ते कोण आहेत? काय तुम्ही अल्लाहला एका नव्या गोष्टीची माहिती देत आहात जिला तो आपल्या पृथ्वीत जाणत नाही? अथवा तुम्ही लोक असेच तोंडात जे काही येते ते सांगता? वस्तुस्थिती अशी आहे की ज्या लोकांनी सत्याच्या आवाहनास स्वीकारण्यास नकार दिला आहे त्यांच्याकरिता त्यांच्या कुटिलतेंना आकर्षक बनविले गेले आहे. आणि ते सरळमार्गापासून रोखले गेले आहेत, मग ज्याला अल्लाह पथभ्रष्टतेत राहू देतो त्याला कोणी मार्ग दाखविणारा नाही. असल्या लोकांसाठी जगातील जीवनातच यातना आहेत आणि परलोकांतील यातना याहूनही कठोर आहेत. कोणीही असा नाही की जो त्यांना अल्लाहपासून वाचविणारा असेल, ईशपरायण माणसांसाठी ज्या स्वर्गाचे वचन दिले गेले आहे त्याचे वैभव असे आहे की त्याच्या खालून कालवे वाहत आहेत, त्याची फळे चिरंतन आहेत, आणि त्याची सावली अनश्वर. हा शेवट आहे पापभीरु लोकांचा आणि सत्याचा इन्कार करणार्यांचा शेवट असा आहे की त्याच्याकरिता नरकाग्नी आहे. (३३-३५)
हे पैगंबर (स.)! ज्या लोकांना आम्ही पूर्वी ग्रंथ दिला होता ते या ग्रंथावर जो आम्ही तुमच्यावर अवतरला आहे, खुश आहेत आणि विविध गटांत काही लोक असेदेखील आहेत जे या ग्रंथाच्या काही गोष्टी मानत नाहीत. तुम्ही स्पष्टपणे सांगून टाका की, “मला तर केवळ अल्लाहच्या भक्तीची आज्ञा दिली गेली आहे आणि यापासून मनाई केली गेली आहे की एखाद्याला त्याच्याबरोबर मी भागीदार ठरवावे, म्हणून मी त्याच्याकडे निमंत्रित करीत आहे आणि त्याच्याकडे मी रूजू होत आहे.” याच आदेशानिशी आम्ही हे अरबी फर्मान तुमच्यावर अवतरले आहे. आता जे ज्ञान तुमच्यापाशी आलेले आहे ते असतानादेखील तुम्ही जर लोकांच्या इच्छेच्या मागे चाललात तर अल्लाहविरूद्ध तुमचा कोणी संरक्षक व मदतगारही नाही व त्याच्या पकडीतून तुम्हाला कोणी वाचवूही शकत नाही. (३६-३७)
तुमच्यापूर्वीदेखील आम्ही अनेक पैगंबर पाठविले आहेत आणि त्यांना आम्ही पत्नी व मुलेबाळे असलेलेच बनविले होते. आणि कोणत्याही पैगंबराचे हे सामर्थ्य नव्हते की अल्लाहच्या आज्ञेशिवाय एखादा संकेत त्याने स्वत:च आणून दाखविला असता. प्रत्येक युगासाठी एक ग्रंथ आहे.
अल्लाह ज्याला इच्छितो त्याला नष्ट करतो आणि ज्या गोष्टीला इच्छितो तिला कायम ठेवतो. उम्मूलकिताब (मूल ग्रंथ) त्याच्यापाशीच आहे. (३८-३९)
आणि हे पैगंबर (स.), ज्या वाईट शेवटाची धमकी आम्ही या लोकांना देत आहोत मग याचा काही भाग आम्ही तुमच्या जिवंतपणीच दाखवू किंवा तो प्रत्यक्षात येण्यापूर्वीच आम्ही तुम्हाला उचलून घेवू. कोणत्याही परिस्थितीत तुमचे काम फक्त संदेश पोहचविणेच होय आणि हिशेब घेणे आमचे काम होय. हे लोक पाहात नाहीत की आम्ही या भूमीवर चालून येत आहोत आणि हिचे वेटोळे सर्व बाजूंनी आवळत येत आहोत? अल्लाह राज्य करीत आहे, कोणी त्याच्या निर्णयावर पुनर्दष्टी करणारा नाही आणि त्याला हिशेब घेण्यास काही विलंब लागत नाही. यांच्यापूर्वी जे लोक होऊन गेले आहेत त्यांनीदेखील मोठमोठाले डावपेच लढविले होते, परंतु खरा निर्णय तर पूर्णपणे अल्लाहच्याच हातात आहे. तो जाणतो की कोण काय कमवीत आहे, आणि लवकरच हे सत्याचा इन्कार करणारे पाहतील की कोणाचा शेवट चांगला होतो. (४०-४२)
हे इन्कार करणारे म्हणतात की तुम्हाला अल्लाहकडून पाठविलेले नाही, सांगा, “माझ्या व तुमच्या दरम्यान अल्लाहची ग्वाही पुरेशी आहे तसेच त्या व्यक्तीची साक्ष ज्याला ग्रंथाचे ज्ञान आहे.” (४३)