(मक्काकालीन, वचने १८२)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
रांगारांगांनी कतारबद्ध होणार्यांची शपथ, मग त्यांची शपथ जे दमदाटी करणारे आहेत, मग त्यांची शपथ जे उपदेश-वचन ऐकविणारे आहेत, तुमचा खरा ईश्वर फक्त एकच आहे, तो जो पृथ्वी आणि आकाशांचा, आणि त्या सर्व वस्तूंचा मालक आहे ज्या पृथ्वी आणि आकाशांत आहेत, आणि सर्व पूर्वांचा मालक. (१-५)
आम्ही अनंत आकाशाला नक्षत्रांच्या शृंगाराने सुशोभित केले आहे आणि प्रत्येक शिरजोर शैतानापासून त्याला सुरक्षित केलेल आहे. हे शैतान दूतलोकीच्या गोष्टी ऐकू शकत नाहीत, सर्व बाजूंनी मारले आणि पिटाळले जातात व त्यांच्यासाठी निरंतर प्रकोप आहे. तथापि जर त्यांच्यापैकी एखाद्याने काही हेरलेच तर एक प्रखर ज्वाला त्याचा पाठलाग करते. आता यांना विचारा, यांची निर्मिती अधिक कठीण आहे अथवा ज्या वस्तूंची ज्या आम्ही निर्माण करून ठेवल्या आहेत? यांना तर आम्ही चिवट मातीपासून निर्माण केले आहे. तुम्ही अल्लाहच्या सामर्थ्याच्या चमत्कारावर चकित आहात आणि हे त्याचा उपहास करीत आहेत. समजावून दिले जाते तर समजून घेत नाहीत. एखादा संकेत पाहिला तर त्याचा उपहास करतात आणि म्हणतात, “ही तर उघड जादू आहे, बरे असे कधी होऊ शकते काय की मृत्यूनंतर आमची माती होऊन (केवळ) हाडांचा सांगाडा उरत असेल, तद्नंतर आम्हाला पुनरुज्जीवित केले जाईल? आणि आमच्या पूर्वजांचे (सुद्धा) पुनरुत्थान होईल.” आता सांगा, “होय.” आणि तुम्ही (अल्लाहसमोर) असहाय्य असाल. (६-१८)
केवळ एकच दटावणी असेल आणि अकस्मात हे आपल्या डोळ्यांनी (ते सर्वकाही ज्याची माहिती दिली जात आहे) पहात असतील.” त्यावेळी हे सांगतील, “किती आमचे दुर्दैव! हा तर मोबदल्याचा दिवस आहे”-हा तोच निर्णयाचा दिवस आहे ज्याला तुम्ही खोटे ठरवीत होता, (आज्ञा होईल) “घेरून आणा सर्व अत्याचार्यांना आणि त्यांच्या साथीदारांना व त्या उपास्यांना ज्यांची ते अल्लाहला सोडून भक्ती करीत होते, मग या सर्वांना नरकाचा रस्ता दाखवा. आणि थोडे थांबवा यांना, काही विचारावयाचे आहे यांना, काय झाले तुम्हाला? आता का एकमेकाला मदत करीत नाहीत? आज तर हे आपल्या स्वत:ला (आणि एकमेकाला) हवाली करून टाकीत आहेत!” यानंतर हे एकमेकांकडे वळतील. (अनुकरण क्रणारे आपल्या नेत्यांना) म्हणतील, “तुम्ही आमच्याजवळ उजव्या बाजूने येत होता.” ते उत्तर देतील. “नाही, किंबहुना तुम्ही स्वत: श्रद्धा ठेवणारे नव्हता. आमचा तुमच्यावर काही जोर नव्हता, तुम्ही स्वत:च दुर्वर्तनी होतात. सरतेशेवटी आम्ही आपल्या पालनकर्त्याच्या या फर्मानाला पात्र ठरलो की आम्ही यातनेची चव चाखणार आहोत. तेव्हा आम्ही तुम्हाला बहकाविले, आम्ही स्वत: देखील बहकलेले होते.” (१९-३२)
अशाप्रकारे ते सर्व त्या दिवशी प्रकोपात भागीदार असतील. आम्ही गुन्हेगारांशी असेच काही करीत असतो. हे ते लोक होते की जेव्हा यांना म्हटले जात असे, “अल्लाहशिवाय कोणी खरा उपास्य नाही.” तर ते घमेंडीत येत असत आणि म्हणत असत. “आम्ही एका वेडया कवीसाठी आमच्या उपास्यांना सोडून द्यावे?” वस्तुत: तो सत्यनिशी आला होता आणि त्याने प्रेषितांची सत्यता प्रमाणित केली होती. (आता यांना सांगितले जाईल की) तुम्ही खचितच यातनादायक शिक्षेचा आस्वाद घेणारे आहात आणि तुम्हाला जो काही बदला दिला जात आहे तो त्याच कृत्यांचा दिला जात आहे जी तुम्ही करीत होता. (३३-३९)
पण अल्लाहचे निवडक दास (या वाईट शेवटापासून) सुरक्षित असतील. त्यांच्यासाठी ज्ञात उपजीविका आहे. हरतर्हेचे स्वादिष्ट पदार्थ आणि ऐश्वर्यसंपन्न स्वर्गामध्ये ते सन्मानपूर्वक राहतील. तख्तांवर समोरासमोर बसतील. पेयाचे पात्र भरून भरून त्यांच्या दरम्यान फिरविले जातील. चकाकणारे पेय जे पिणार्यांसाठी स्वादिष्ट असेल. त्यांच्या शरीरालाही त्यापासून काही अपाय होणार नाही व त्यांची बुद्धीदेखील भ्रष्ट होणार नाही. आणि त्यांच्यापाशी नजरा जपणार्या सुंदर नेत्रांच्या स्त्रिया असतील, अशा नाजुक जणूकाही अंडयाच्या आतील पापुद्रा? (४०-४९)
मग ते एकमेकाकडे वळून हाल-अहवाल विचारतील. त्यांच्यापैकी एक म्हणेल, “जगात माझा एक सहवासी होता जो मला म्हणत असे, काय तुम्हीदेखील खरे मानणार्यांपैकी आहात, काय खरोखरच जेव्हा आम्ही मरणोत्तर माती झालेले असू, आणि हाडांचा सांगाडा बनून राहू, तेव्हा आम्हाला शिक्षा व मोबदला दिला जाईल? आता काय आपण पाहू इच्छिता की ते महाशय कोठे आहेत?” असे म्हणून ज्याक्षणी तो झुकेल तेव्हा नरकात खोलवर तो त्याला दिसेल आणि त्याला संबोधून म्हणेल. “अल्लाह शपथ. तू तर माझा नाशच करून टाकणारा होतास. माझ्या पालनकर्त्याची कृपा माझ्यावर नसती तर आज मीदेखील त्या लोकांसमवेत असतो जे पकडून आणले गेले आहेत. बरे तर आता आम्ही मरणार नाही काय? मृत्यू जो आम्हाला येणार होता तो केवळ पूर्वीच येऊन गेला काय? आता आम्हाला काही यातना होणार नाही ना?” (५०-५९)
खरेखर हेच वैभवसंपन्न यश आहे. अशाच यशाकरिता कर्म करणार्यांनी कर्म केले पाहिजे. सांगा, हा पाहुणचार चांगला आहे की ‘जक्कूम’चे झाड? आम्ही त्या झाडाला अत्याचारी लोकांसाठी उपद्रव बनविलेले आहे. ते एक झाड आहे जे नरकाच्या तळातून निघते. त्याच्या कळ्या अशा आहेत जणूकाही शैतानाची डोकी. नरकाचे लोक ते खातील आणि त्यानेच पोट भरतील, मग त्यावर त्यांना पिण्यासाठी उकळते पाणी मिळेल. आणि त्यानंतर त्यांची रवानगी त्याच नरकाग्नीकडे होईल. हे ते लोक होत ज्यांना आपले पूर्वज मार्गभ्रष्ट आढळले, आणि त्यांच्यच पदचिन्हांवर धावले. वस्तुस्थिती अशी होती की यांच्यापूर्वी बरेचसे लोक मार्गभ्रष्ट झालेले होते. आणि त्यांच्यामध्ये आम्ही ताकीद देणारे प्रेषित पाठविले होते. आता पहा त्या ताकीद दिलेल्या लोकांचा शेवट कसा झाला. या वाईट शेवटापासून अल्लाहचे केवळ तेच दास वाचले आहेत, ज्यांना त्याने आपल्यासाठी विशेष म्हणून ठेवले आहे. (६०-७४)
आम्हाला (या पूर्वी) नूह (अ.) ने पुकारले होते. तर पहा की आम्ही कसे छान उत्तर देणारे होतो, आम्ही त्याला व त्याच्या कुटुंबियांना भयंकर यातनेतून वाचविले आणि त्याच्याच वंशाला बाकी ठेवले, व नंतरच्या पिढयात त्याची स्तुती व गुणगान राहू दिले. सलाम आहे नूह (अ.) ला सर्व जगवासियांमध्ये. आम्ही नेकी करणार्यांना असाच मोबदला देत असतो. वास्तविकपणे तो आमच्या श्रद्धावंत दासांपैकी होता. मग प्रतिपक्षाला आम्ही बुडवून टाकले. (७५-८२)
आणि नूह (अ.) च्याच रीतीप्रमाणे चालणारा इब्राहीच (अ.) होता. जेव्हा तो आपल्या पालनकर्त्याच्या हुजुरांत शुद्ध मनाने आला, जेव्हा त्याने आपल्या पित्याला व आपल्या लोकसमुदायाला सांगितले, “या काय वस्तू आहेत ज्यांची तुम्ही उपासना करीत आहात? काय अल्लाहला सोडून मिथ्या उपास्य तुम्ही इच्छिता? बरे सकल जगांच्या पालनकर्त्यासंबंधी तुमची काय कल्पना आहे?” (८३-८७)
मग त्याने नक्षत्रांवर एक नजर टाकली. आणि म्हणाला, माझी तब्येत बरी नाही. म्हणून ते लोक त्याला सोडून निघून गेले. त्यांच्या पाठीमागे तो गुपचूप त्यांच्या देवळात शिरला आणि म्हणाला. “आपण का खात नाही? झाले तरी काय़ आपण बोलतसुद्धा नाही?” त्यानंतर तो त्यांच्यावर तुटून पडला आणि उजव्या हाताने खूप आघात केले. (परत येऊन) ते लोक धावत धावत त्याच्याजवळ आले. त्याने सांगितले, “तुम्ही स्वत:चं घडविलेल्या वस्तूंना पूजता काय? वास्तविकपणे अल्लाहनेच तुम्हालाही निर्माण केले आहे आणि या वस्तूंनादेखील ज्या तुम्ही बनविता.” त्यांनी आपापसात सांगितले, “याच्यासाठी एक अग्नीखाई तयार करा आणि याला धगधगत्या आगीच्या ढिगार्यात फेकून द्या.” त्यांनी त्याच्याविरूद्ध एक कार्यवाही करू इच्छिली होती, परंतु आम्ही त्यांचेच पतन केले. (८८-९८)
इब्राहीम (अ.) ने सांगितले, “मी आपल्या पालनकर्त्याकडे जात आहे, तोच माझे मार्गदर्शन करील. हे पालनकर्त्या, मला एक पुत्र प्रदान कर जो सदाचार्यांपैकी असेल.” (या प्रार्थनेच्या उत्तरात) आम्ही त्याला एक सहनशील पुत्राची शुभवार्ता दिली. तो मुलगा जेव्हा त्याच्यासमोर धावपळ करण्याच्या वयात आला तेव्हा (एके दिवशी) इब्राहीम (अ.) ने त्याला सांगितले. “हे माझ्या मुला, मी स्वप्नांत पाहतो की मी तुला बळी देत आहे. आता तू सांगा तुझा काय विचार आहे?” त्याने सांगितले, “हे पित्या, जी काही आज्ञा आपणास दिली जात आहे तसेच करा, अल्लाहने इच्छिले तर आपणास मी धैर्यशील आढळेन.” सरतेशेवटी जेव्हा या दोघांनी आज्ञापालनात मान तुकविली आणि इब्राहीम (अ.) ने पुत्राला पालथे केले, आणि आम्ही पुकारले, “हे इब्राहीम, तू स्वप्न साकार केलेस. आम्ही सत्कर्म करणार्यांना असाच मोबदला देत असतो. निश्चितच ही एक उगड परीक्ष होती.” आम्ही एक मोठे बलिदान प्रतिदानात देऊन त्या मुलाची सुटका केली. आणि त्याची प्रशंसा व गुणगान भावी पिढयांत सदैव ठेवले. सलाम आहे इब्राहीम (अ.) वर. आम्ही सत्कर्म करणार्यांना असाच मोबदला देत असतो. निश्चितच तो आमच्या श्रद्धावंत दासांपैकी होता. आणि आम्ही त्याला इसहाक (अ.) ची शुभवार्ता दिली, सदाचारीपैकी एक पैगंबर. आणि त्याला व इसहाक (अ.) ला समृद्धी दिली. आता त्या दोघांच्या वंशापैकी कोणी परोपकारी आहे तर कोणी आपल्या स्वत:वर स्पष्ट अत्याचार करणारा आहे. (९९-११३)
आणि आम्ही मूसा (अ.) व हारून (अ.) यांच्यावर उपकार केले. त्यांना व त्यांच्या लोकसमूहाला मोठया यातनेतून मुक्त केले. त्यांना सहाय्य प्रदान केले की ज्यामूळे तेच विजयी ठरले, त्यांना अगदी स्पष्ट ग्रंथ प्रदान केले, त्यांना सन्मार्ग दाखविला, आणि नंतरच्या पिढयांत त्यांचे इष्ट स्मरण बाकी ठेवले. सलाम आहे मूसा (अ.) व हाऊन (अ.) वर. आम्ही सत्कर्म करणार्यांना असाच मोबदला देत असतो, वास्तविकत: ते आमच्या ‘मुअमिन’ (श्रद्धावंत) दासांपैकी होते. (११४-११२)
आणि इलियास (अ.) देखील निश्चितच प्रेषितांपैकी होता. स्मरण करा जेव्हा त्याने आपल्या लोकसमूहाला सांगितले होते. “तुम्ही भीत नाही का? काय तुम्ही ‘बअल’ (सामी जमातीचा तथाकथित उपास्य) चा धावा करता. आणि जो तुमच्या पूर्वजांचा व भावी पिढयांचा पालनकर्ता आहे त्या सर्वोत्तम निर्माणकर्त्या अल्लाहला सोडून देता?” परंतु त्यांनी त्याला खोटे ठरविले, म्हणून आता ते निश्चितच शिक्षेसाठी हजर केले जाणार आहेत, अल्लाहच्या त्या दासांखेरीज ज्यांना विशेष राखले गेले होते. आणि इलियास (अ.) चे सुस्मरण आम्ही नंतरच्या पिढयांत बाकी ठेवले. सलाम आहे इलियास (अ.) वर. आम्ही सत्कर्म करणार्यांना असाच मोबदला देत असतो. खरोखरच तो आमच्या श्रद्धावंत दासांपैकी होता. (१२३-१३२)
आणि लूत (अ.) ही त्याच लोकांपैकी होता ज्यांना प्रेषित म्हणून पाठविले गेले आहे. स्मरण करा जेव्हा आम्ही त्याची व त्याच्या सर्व कुटुंबियांची सुटका केली, एका वृद्धेखेंरीज जी पाठीमागे राहणार्यापैकी होती. मग उरलेल्या सर्वांना आम्ही उद्ध्वस्त करून टाकले. आज तुम्ही रात्रंदिवस त्यांच्या उद्ध्वस्त अवशेषांवरून जात असता, काय तुम्हाला सुबुद्धी येत नाही? (११३-१३८)
आणि खचितच य़ूनुस (अ.) सुद्धा प्रेषितांपैकी होता. स्मरण करा जेव्हा त्याने एका भरलेल्या जहाजाकडे पळ काढला, मग फासे टाकण्यात सामील झाला आणि त्यात मात खाल्ली. सरतेशेवटी माशाने त्याला गिळंकृत केले आणि तो निर्भर्त्सित होता. आता जर तो पावित्र्यगान करणार्यांपैकी नसता तर पुनरुत्थानाच्या दिवसापर्यंत तो माशाच्या पोटांतच राहिला असता. सरतेशेवटी आम्ही त्याला अत्यंत दुर्दशेत एका खडकाळ जमिनीवर फेकून दिले आणि त्यावर एक वृक्षलता उगविली. यानंतर आम्ही त्याला एक लक्ष अथवा त्यापेक्षा जास्त लोकांकडे पाठविले. त्यांनी श्रद्धा ठेवली आणि आम्ही एका विशिष्ट वेळेपर्यंत त्यांना राहू दिले. (१३९-१४८)
मग जरा या लोकांना विचारा, काय (यांच्या मनाला ही गोष्ट पटते) की तुमच्या पालनकर्त्यासाठी तर असाव्यात मुली आणि यांच्यासाठी असावीत मुले? काय खरोखरच आम्ही दूतांना स्त्रियाच बनविले आहे आणि हे ‘आंखो देखी’ गोष्ट सांगत आहेत? चांगले ऐकून घ्या, वास्तविकपणे हे लोक आपल्या मनाने ही गोष्ट म्हणत आहेत की अल्लाह संतती बाळगतो आणि प्रत्यक्षात हे खोटारडे आहेत. काय अल्लाहने पुत्राऐवजी मुली आपल्यासाठी पसंत केल्या? तुम्हाला झाले तरी काय, कसले निर्णय लावता? काय तुम्ही शुद्धीवर येत नाही?.
अथवा तुमच्याजवळ आपल्या या गोष्टीसंबंधी एखादे स्पष्ट प्रमाण असेल तर आणा तो आपला ग्रंथ जर तुम्ही खरे असाल. (१४९-१५७)
यांनी अल्लाह आणि दूतांच्या दरम्यान वंश-संबंध जोडलेले आहे. वास्तविकत: दूत चांगल्याप्रकारे जाणतात की हे लोक अपराधी म्हणून हजर होणार आहेत. (आणि ते म्हणतात की,) “अल्लाह त्या गुणांपासून मुक्त आहे जे त्याच्या निर्मळ दासांखेरीज इतर लोक त्याच्याशी जोडतात. तर तुम्ही आणि तुमचे हे उपास्य अल्लाहपासून कोणालाही भरकटवू शकत नाहीत परंतु केवळ त्याला जो नरकाच्या भडकणार्या आगीत होरपळणार असेल. आणि आमची स्थिती तर अशी आहे की आमच्यापैकी प्रत्येकाचे एक स्थान निश्चित आहे. आणि आम्ही पंक्तीबद्ध सेवक आहोत आणि पावित्र्यगान करणारे आहेत.” (१५८-१६६)
हे लोक पूर्वी तर सांगत असत, आमच्यापाशी ते ‘स्मरण’ असते जे पूर्वीच्या लोकांना मिळाले होते, तर आम्ही अल्लाहचे निवडक दास असतो. परंतु (जेव्हा ते आले) तेव्हा यांनी त्याचा इन्कार केला. आता लवकरच यांना (या वर्तनाची परिणती) माहीत होईल. आपल्या पाठविलेल्या दासांना आम्ही पूर्वीच वचन दिले आहे, की निश्चितच त्यांना मदत दिली जाईल. आणि आमचेच सैन्य विजयी ठरेल. तर हे पैगंबर (स.)! यांना जंरा काही अवधीकरीता यांच्या स्थितीवर सोडून द्या. आणि पहा, लवकरच हे स्वत: देखील पाहतील. काय हे आमच्या प्रकोपासाठी घाई करीत आहेत? जेव्हा तो त्यांच्या प्रांगणांत कोसळेल तेव्हा तो दिवस अशा लोकांकरिता फारच वाईट असेल ज्यांना ताकीद दिलेली आहे.
तर जरा यांना काही अवधीसाठी सोडून द्या. आणि पहा, लवकरच हे स्वत:देखील पाहतील. (१६७-१७९)
पवित्र आहे तुझा पालनकर्ता, गौरवाचा स्वामी, त्या सर्व गोष्टींपासून ज्या हे लोक बनवीत आहेत. आणि सलाम आहे प्रेषितांवर, आणि सर्व स्तुती सकल जगांच्या पालनकर्त्या अल्लाहकरिताच आहे. (१८०-१८२)