(मक्काकालीन, वचने ५४)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
स्तुती त्या अल्लाहसाठी आहे जी आकाश आणि पृथ्वीतील प्रत्येक वस्तूंचा मालक आहे आणी पारलौकिक जीवनामध्येही त्याच्यासाठीच स्तुती आहे. तो बुद्धिमान आणि माहितगार आहे, जे काही जमिनीत जाते आणि जे काही तिच्यातून निघते अणि जे काही आकाशातून उतरले आणि जे काही त्याच्यात चढते, प्रत्येक वस्तूला तो जाणतो, तो परमकृपाळू आणि क्षमाशील आहे. (१-२)
सत्य नाकारणारे म्हणतात की काय कारण आहे की प्रलय आमच्यावर येत नाही! सांगा, “शपथ आहे परोक्ष-ज्ञानी माझ्या पालनकर्त्याची, ती तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यापासून कणमात्र कोणतीही वस्तू आकाशातही लपलेली नाही व जमिनीतदेखील नाही, कणापेक्षा मोठीही नाही व त्यापेक्षा लहानदेखील नाही. सर्वकाही एका स्पष्ट दप्तरात नमूद आहे.” आणि हा प्रलय यासाठी येईल की मोबदला द्यावा अल्लाहने त्या लोकांना ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे आणि अत्कर्म करीत राहिले आहेत. त्यांच्यासाठी क्षमा आहे आणि मानाची उपजीविका. आणि ज्या लोकांनी आमच्या संकेतांना खोटे ठरविण्यासाठी जोर लावला आहे, त्यांच्यासाठी अत्यंत वाईट प्रकारचा यातनादायक प्रकोप आहे. हे पैगंबर (स.), ज्ञान राखणारे चांगलेच जाणतात की जो काही तुमच्या पालनकर्त्याकडून तुमच्यावर अवतरला गेला आहे. तो पूर्णपणे सत्य आहे आणि प्रभुत्वसंपन्न व स्तुत्य ईश्वराचा मार्ग दाखवितो. (३-६)
सत्य नाकारणारे लोकांना सांगतात, “आम्ही तुम्हाला दाखवावा असा मनुष्य जो बातमी देतो की जेव्हा तुमच्या शरीराचा कण न् कण विखुरला गेला असेल तेव्हा तुम्ही नव्याने निर्माण केले जाल? न जाणो हा मनुष्य अल्लाहच्या नावावर कुभांड रचतो अथवा याला वेड लागले आहे.” नाही! किंबहुना जे लोक परलोकाला मानीत नाहीत ते प्रकोपात गुरफटले जाणार आहेत व तेच वाईट प्रकारे बहकलेले आहेत. काय यांनी कधी त्या आकाशाला व पृथ्वीला पाहिले नाही ज्याने यांना पुढून व मागून वेढले आहे? आम्ही इच्छिले तर यांना जमिनीत धसवू अथवा आकाशाचे काही तुकडे यांच्यावर कोसळवू. वास्तविक पाहला यात एक संकेत आहे त्या प्रत्येक दासाकरिता जो ईश्वराकडे रुजू होणारा असेल. (७-९)
आम्ही दाऊद (अ.) ला आपल्याकडून मोठा कृपाप्रसाद प्रदान केला होता. (आम्ही आज्ञा दिली की) हे पर्वतानो, त्याच्यासोबत नामस्मरण करा (आणि हीच आज्ञा आम्ही) पक्षांना दिली. आम्ही लोखंडाला त्याच्यासाठी मऊ केले, या आदेशानिशी की चिलखत बनव व त्यांच्या कडया ठीक अंदाजावर ठेव, (हे दाऊदची संतान) सत्कर्म करा, जे काही तुम्ही करता ते मी पाहात आहे. (१०-११)
आणि सुलैमान (अ.) करिता आम्ही वार्याला अधीन केले. सकाळच्या वेळेस त्याचे वाहणे एका महिन्याच्या मार्गापर्यंत आणि संध्याकाळच्या वेळी त्याचे वाहणे एक महिन्याच्या मार्गापर्यंत. आम्ही त्याच्याकरिता वितळलेल्या तांब्याचा झरा प्रवाहित केला आणि असे जिन्नांना त्याच्या अधीन केले जे आपल्या पालनकर्त्याच्या आज्ञेने त्याच्यापुढे काम करीत असत. त्यांच्यापैकी जो कोणी आमच्या आज्ञेपुढे शिरजोरी दाखवीत असे, त्याला आम्ही भडकत्या अग्नीची चव चाखवीत होतो. ते त्याच्याकरिता बनवीत असत जे काही तो इच्छित असे, उत्तुंग इमारती, चित्र, मोठमोठया हौदासमान पराती आणि आपल्या जागेवरून न हटणार्या भारदस्त डेगा-हे दाऊदची संतान, कर्म करा कृतज्ञतेच्या भावनेने, माझ्या दासांमध्ये थोडेच लोक कृतज्ञ आहेत. (१२-१३)
मग जेव्हा सुलैमान (अ.) वर आम्ही मृत्यूचा निर्णय लागू केला तेव्हा जिन्नांना त्याच्या मृत्यूची माहिती देणारी कोणतीही गोष्ट त्या वाळवी खेरीज नव्हती, जी त्याच्याकाठीला खातहोती. अशाप्रकारे जेव्हा सुलैमान (अ.) खाली कोसळला तेव्हा जिन्नांवर ही गोष्ट उघड झाली की जर ते परोक्ष जाणणारे असते तर ते (जिन्न) या अपमानजनक प्रकोपात गुरफटून राहिले नसते. (१४)
‘सबा’करिता खुद्द त्यांच्या निवासस्थानातच एक संकेत उपस्थित होता, दोन उद्याने उजव्या व डाव्या बाजूस. खा आपल्या पालनकर्त्याने दिलेली उपजीविका आणि कृतज्ञ बनून राहा त्याचे, प्रदेश आहे उत्कृष्ट व स्वच्छ आणि पालनकर्ता आहे क्षमाशील. परंतु ते पराडमुख झाले. सरतेशेवटी आम्ही त्यांच्यावर भयंकर महापूर पाठविला. आणि त्यांच्या पूर्वीच्या दोन उद्यानांच्या जागी आणखीन दोन उद्याने दिली ज्यात कडू व बेचव फळे व झाऊची झाडे होती व काही अल्पशी बोरी. हा होता त्यांच्या द्रोहाचा बदला जो आम्ही त्यांना दिला आणि कृतघ्न माणसाखेरीज असा बदला आम्ही इतर कोणाला देत नाही. आणि आम्ही त्यांच्या व त्या वस्त्यांच्या दरम्यान ज्यांना आम्ही समृद्धी प्रदान केली होती, उठावदार वस्त्या वसविल्या होत्या आणि त्यांच्यात प्रवासाचे टप्पे नियोजित केले होते. संचार करा या मार्गावर रात्र व दिवस पूर्ण सुरक्षेने. परंतु त्यांनी सांगितले, “हे आमच्या पालनकर्त्या, आमच्या प्रवासाच्या टप्प्यामध्ये वाढ कर. त्यांनी स्वत:च आपल्यावर अत्याचार केला. सरतेशेवटी आम्ही त्यांना कथा बनवून सोडले. आणि त्यांना पुरेपूर नष्ट करून टाकले. निश्चितच यात संकेत आहेत त्या प्रत्येक माणसाकरिता जो मोठा संयमी व कृतज्ञ असेल. त्यांच्या संबंधाने ‘इब्लीस’ (शैतान) ला आपली कल्पना खरीच आढळली आणि त्यांनी त्याचेच अनुकरण केले, एका अल्पशा गटाला वगळता जो श्रद्धावंत होता. इब्लीसला त्यांच्यावर कोणताही अधिकार प्राप्त नव्हता. परंतु जे काही घडले ते अशासाठी घडले की आम्ही हे पाहू इच्छित होतो की कोण मरणोत्तर जीवनाला मानणारा आहे आणि कोण त्याच्याबद्दल शंकेत पडलेला आहे. तुझा पालनकर्ता प्रत्येक गोष्टीची देखरेख करणारा आहे. (१५-२१)
(हे पैगंबर (स,), या अनेकेश्वरवादींना) सांगा की, “पुकारून पहा तुम्ही आपल्या त्या उपास्यांना ज्यांना तुम्ही अल्लाहला सोडून आपले उपास्य समजून बसला आहात. ते आकाशातही कोणत्या कणमात्र वस्तुचे मालक नाहीत आणि जमिनीवरसुद्धा नाहीत. ते आकाश आणि जमिनीच्या मालकीतही भागीदार नाहीत. त्यांच्यापैकी कोणी अल्लाहचा सहायकदेखील नाही. आणि अल्लाहच्या हुजुरात एखादी शिफारसदेखील कुणाला लाभदायक ठरू शकणार नाही केवळ त्या व्यक्तीखेरीज ज्यासाठी अल्लाहने शिफारसीची परवानगी दिलेली असेल. येथपावेतो की जेव्हा लोकांच्या मनांतील भीड चेपेल, तेव्हा ते (शिफारस करणार्यांना) विचारतील की तुमच्या पालनकर्त्याने काय उत्तर दिले? ते म्हणतील की योग्य उत्तर मिळाले आहे आणि तो महान आणि उच्चतर आहे.” (२२-२३)
(हे पैगंबर (स.)) यांना विचारा, “कोण तुम्हाला आकाश व जमिनीपासून अन्न देतो?” सांगा, “अल्लाह. आता अनिवार्यपणे आमच्या व तुमच्यापैकी कोणी तरी एकच सरळ मार्गावर आहे अथवा उघड पथभ्रष्टतेत गुरफटला आहे.” यांना सांगा, “जो अपराध आम्ही केला असेल त्याची कोणतीही विचारणा तुमच्याकडे होणार नाही आणि जे काही तुम्ही करीत आहात त्याची कोणतीही विचारणा आम्हास केली जाणार नाही.” “सांगा, “आमचा पालनकर्ता आम्हाला एकत्र करील, मग आमच्या दरम्यान यथायोग्य निर्णय लावील. तो असा जबरदस्त शासक आहे जो सर्वकाही जाणतो.” यांना सांगा, “जरा मला दाखवा त्या कोण विभूती आहेत ज्यांना तुम्ही त्यांच्यासमवेत भागीदार म्हणून लावलेले आहे?” मुळेच नाही. जबरदस्त व बुद्धिमान तर केवळ तो अल्लाहच आहे. (२४-२७)
आणि (हे पैगंबर (स.)), आम्ही तुम्हाला अखिल मानवजातीसाठी शुभवार्ता देणारा आणि सावधान करणारा बनवून पाठविले आहे, परंतु बहुतेक लोक जाणत नाहीत. (२८)
हे लोक तुम्हाला सांगतात की, “ते (मरणोत्तर जीवनाचे) वचन केव्हा पूर्ण होईल जर तुम्ही खरे आहात?” सांगा, “तुमच्याकरिता एका अशा दिवसाचा क्षण निश्चित आहे ज्याच्या येण्यात एक घटकाभर तुम्ही उशीरही करू शकत नाही अथवा एक घटकाभर अगोदरही त्यास आणू शकत नाही.” (२९-३०)
हे अश्रद्धावंत म्हणतात की, “आम्ही कदापि या कुरआनला मानणार नाही आणि या अगोदर आलेल्या कोणत्या ग्रंथालाही मान्य करणार नाही.” तुम्ही पहाल यांची दशा त्यावेळी जेव्हा हे अन्यायी आपल्या पालनकर्त्याच्या पुढे उभे राहतील. त्यावेळेस हे एकदुसर्यावर दोषारोप करतील. हे लोक जगात दुर्बल समजले गेले होते ते घमेंडी लोकांना सांगतील, “जर तुम्ही नसता तर आम्ही श्रद्धावंत बनलो असतो.” ते घमेंडी लोक दुर्बल लोकांना उत्तर देतील, “काय आम्ही तुम्हाला त्या मार्गदर्शनापासून रोखले होते जे तुमच्यापाशी आले होते? नाही, किंबहुना तुम्ही स्वत:च अपराधी होता.” ते दुर्बल लोक त्या घमेंडी लोकांना सांगतील, “नाही. किंबहुना ती रात्र दिवसाची कारस्थाने होती, जेव्हा तुम्ही आम्हाला सांगत होता की आम्ही अल्लाहचा इन्कार करावा आणि इतरांना त्याचा समकक्ष ठरवावा.” सरतेशेवटी जेव्हा हे लोक प्रकोप पाहतील तेव्हा आपल्या मनात पश्चात्ताप करतील, आणि आम्ही या इन्कार करंणार्यांच्या गळ्यात जोखड घालू-काय लोकांना याखेरीज इतर कोणता बदला दिला जावू शकतो की जशी कृत्ये त्यांची होती तसा मोबदला त्यांना मिळेल? (३१-३३)
कधी असे घडले नाही की आम्ही एखाद्या वस्तीत एक सावध करणारा पाठविला आणि त्या वस्तीच्या सुखवस्तु लोकांनी हे म्हटले नाही की, “जो संदेश तुम्ही घेऊन आलात तो आम्ही मानत नाही.” त्यांनी सदैव असेच म्हटले की, “आम्ही तुमच्यापेक्षा अधिक संपत्ती व संतती बाळगतो आणि आम्ही कदापि शिक्षा भोगणार नाही.” हे पैगंबर (स.) यांना सांगा, माझा पालनकर्ता ज्याला इच्छितो विपुल उपजीविका देतो आणि ज्याला इच्छितो बेताची प्रदान करतो परंतु बहुतेक लोक याची वस्तुस्थिती जाणत नाहीत. ही तुमची संपत्ती आणि तुमची संतती नाही जी तुम्हाला आमच्या जवळ करीत असेल. होय परंतु जे श्रद्धा ठेवतील आणि सत्कृत्ये करतील. हेच लोक आहेत ज्यांच्याकरिता त्यांच्या कृत्यांचा दुप्पट मोबदला आहे, आणि ते उंच व उत्तुंग इमारतीत समाधानाने राहतील. उरले ते लोक जे आमच्या संकेतांना खोटे ठरविण्यासाठी धावपळ करीत असतील तर ते प्रकोपात गुरफटले जातील. (३४-३८)
हे पैगंबर (स.)! यांना सांगा, माझा पालनकर्ता आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो विपुल उपजीविका देतो आणि ज्याला इच्छितो बेताची देतो. जे काही तुम्ही खर्च करता त्याच्या जागी तोच तुम्हाला आणखीन देतो. तो सर्व उपजीविका देणार्यांपेक्षा अधिक चांगली उपजीविका देणारा आहे. (३९)
आणि ज्या दिवशी तो अखिल मानवांना एकत्र करील मग दूतांना विचारील, “काय हे लोक तुमचीच उपासना करीत होते?” तर ते उत्तर देतील, “पवित्र आहे आपले अस्तित्व, आमचा संबंध तर आपल्याशी आहे, या लोकांशी नाही. खरे पाहता हे आमची नव्हे तर जिन्नांची उपासना करीत होते. यांच्यापैकी बहुतेक त्यांच्यावरच श्रद्धा ठेवलेले होते. (त्या वेळेस आम्ही म्हणू की), आज तुमच्यापैकी कोणी कोणाला लाभही पोहचवू शकत नाही अथवा नुकसान. आणि अत्याचार्यांना आम्ही सांगू की आता चाखा त्या नरकाच्या प्रकोपाची चव, ज्याला तुम्ही खोटे ठरवीत होता. (४०-४२)
या लोकांना जेव्हा आमचे स्पष्ट संकेत ऐकविले जातात तेव्हा हे सांगतात, “हा मनुष्य तर केवळ हेच इच्छितो की, तुम्हाला त्या उपास्यापासून पराङमुख करावे ज्यांची उपासना तुमचे वाडवडील करीत आले आहेत.” आणि सांगतात की, “हा (कुरआन) केवळ एक थोतांड आहे रचलेला.” या अश्रद्धावंतांसमोर जेव्हा सत्य आले, तेव्हा यांनी सांगून टाकले की, “ही तर उघड जादू आहे.” वास्तविक पाहता आम्ही या लोकांना पूर्वीही कोणताच ग्रंथ दिला नव्हताच की ज्याला ते वाचत होते आणि तुमच्यापूर्वी यांच्याकडे कोणी सावध करणाराही पाठविला नव्हता. यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनी खोटे ठरविले आहे जे काही आम्ही त्यांना दिले होते, त्याच्या एक शतांशापर्यंत हे पोहचलेले नाहीत. परंतु जेव्हा त्यांनी माझ्या प्रेषितांना खोटे लेखले तर पहा की माझी शिक्षा किती कठोर होती. (४३-४५)
हे पैगंबर (स.)! यांना सांगा की, “मी तुम्हाला केवळ एका गोष्टीचा उपदेश देतो. अल्लाहकरिता तुम्ही एकएकटे व दोनदोन मिळून विचार विनिमय करा, तुमच्या सोबत्यात कोणती गोष्ट आहे जी वेडेपणाची आहे? तो तर एका भयंकर प्रकोपाच्या आगमनापूर्वी तुम्हाला सावध करणारा आहे.” यांना सांगा, “जर मी तुमच्याकडे काही मोबदला मागितला असेल तर तो तुम्हालाच लखलाभ असो. माझा मोबदला तर अल्लाहकडे आहे आणि तो प्रत्येक वस्तूवर साक्षी आहे.” यांना सांगा, “माझा पालनकर्ता (माझ्यावर) सत्याचे अवतरण करतो आणि तो सर्व अदृश्य सत्ये जाणणारा आहे.” सांगा, “सत्याचे आगमन झाले आणि आता मिथ्यासाठी काहीच होऊ शकत नाही.” सांगा, “जर मी पथभ्रष्ट झालो असेन तर माझ्या पथभ्रष्टतेचे अरिष्ट माझ्यावर आहे आणि जर मी सरळमार्गावर असेन तर त्या दिव्यबोधामुळे आहे जो माझा पालनकर्ता माझ्यावर अवतरीत असतो. तो सर्वकाही ऐकतो आणि जवळच आहे.” (४६-५०)
तुम्ही पाहाल या लोकांना, त्यावेळी जेव्हा हे लोक भयभीत फिरत असतील, आणि वाचून कोठे जावू शकणार नाहीत किंबहुना जवळूनच पकडले जातील, त्यावेळेस हे सांगतील की आम्ही त्यावर श्रद्धा ठेवली. वस्तुत: आता लांब गेलेली वस्तू कोठे हाती लागू शकते! यापूर्वी यानी द्रोह केलेला होता आणि शोध न घेताच मोठमोठ तर्कवितर्क लढवीत होते. त्यावेळेस हे ज्या वस्तुची अभिलाषा बाळगत असतील त्यापासून वंचित केले जातील ज्याप्रकारे यांचे समविचारी पुढे गेलेले वंचित झाले असतील. हे मोठया मार्गभ्रष्ट करणार्या शंकेत गुरफटले होते. (५१-५४)