मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अल्‌हदीद

सूरह - अल्‌हदीद

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मदीनाकालीन, वचने २९)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

अल्लाहचे पावित्र्यागन केले आहे त्या प्रत्येक वस्तूने जी पृथ्वी व आकाशांत आहे, आणि तोच जबरदस्त व बुद्धिमान आहे. पृथ्वी व आकाशांच्या राज्यांचा स्वामी तोच आहे, जीवन प्रदान करतो व मृत्यू देतो, आणि प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे, तोच आदीही आहे आणि अंतिमसुद्धा. आणि प्रकटही आहे व अप्रकटसुद्धा. आणि त्याला प्रत्येक गोष्टीचे ज्ञान आहे. तोच आहे ज्याने आकाशांना आणि पृथ्वीला सहा दिवसांत निर्माण केले. आणि मग अर्श (राजसिंहासना) वर विराजमान झाल. त्याला ज्ञात आहे जे काही जमिनीत जाते आणि जे काही त्यातून निघत असते, आणि जे काही आकाशांतून उतरत असते आणि जे काही त्यात चढत असते. तो तुमच्यासमवेत आहे जेथे-कुठे तुम्ही आहात. जे काही कार्य तुम्ही करता; तो ते पाहत आहे. तोच पृथ्वी आणि आकाशांच्या बादशाहीचा स्वामी आहे आणि सर्व मामले निर्णयासाठी त्याच्याकडेच रुजू केले जातात. तोच रात्रीला दिवसात आणि दिवसाला रात्रीत दाखल करतो, आणि मनात लपलेली रहस्येसुद्धा जाणतो. (१-६)

श्रद्धा ठेवा अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर आणि खर्च करा त्या वस्तूंपैकी ज्यावर त्याने तुम्हाला नायब (खलिफा) नियुक्त केले आहे. जे लोक तुमच्यापैकी श्रद्धा ठेवतील व माल खर्च करतील त्यांच्यासाठी महान मोबदला आहे. तुम्हाला झाले तरी काय की तुम्ही अल्लाहवर श्रद्धा ठेवीत नाही? वस्तुत: पैगंबर तुम्हाला आपल्या पालनकर्त्यावर श्रद्धा ठेवण्याचे आमंत्रण देत आहे. आणि त्याने तुम्हांकडून प्रतिज्ञा घेतली आहे, जर खरोखर तुम्ही मानणारे असाल. तो अल्लाह्च तर आहे जो आपल्या दासावर अगदी स्पष्ट वचने अवतरीत आहे जेणेकरून तुम्हाला अंधारातून बाहेर काढून प्रकाशात आणावे, आणि वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह तुमच्यासाठी अत्यंत मायाळू आणि मेहरबान आहे. बरे कारण तरी काय आहे की तुम्ही अल्लाहच्या मार्गात खर्च करीत नाही? वस्तुत: पृथ्वी आणि आकाशांचा वारसा अल्लाहसाठीच आहे. तुमच्यापैकी जे लोक विजयानंतर खर्च व युद्ध करतील ते कधीही त्या लोकांच्या बरोबरीचे ठरू शकत नाहीत ज्यांनी विजयापूर्वी खर्च व युद्ध केले आहे. त्यांचा दर्जा नंतर खर्च व युद्ध करणार्‍यांपेक्षा मोठा आहे, जरी अल्लाहने दोघांनाही चांगली वचने दिलेली आहेत. जे काही तुम्ही करता अल्लाहला त्याची खबर आहे. (७-१०)

कोण आहे जो अल्लाहला कर्ज देईल? उत्कृष्ट कर्ज, जेणेकरून अल्लाह कित्येक पटीने वाढवून परत करील आणि त्यांच्यासाठी उत्तम मोबदला असेल, त्यादिवशी जेव्हा की तुम्ही श्रद्धावंत पुरुषांना आणि स्त्रियांना पहाल की त्यांचे तेज त्यांच्या पुढेपुढे आणि उजव्या बाजूने धावत असेल. (त्यांना सांगितले जाईल की) “स्वर्ग असतील ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील ज्यात ते सदैव राहतील. हेच आहे मोठे यश. त्या दिवशी दांभिक पुरुषांची आणि स्त्रियांची दशा अशी असेल की श्रद्धावंतांना म्हणतील, “जरा आमच्याकडे पहा जेणेकरून आम्ही तुमच्या तेजापासून काही लाभ घ्यावा,” परंतु त्यांना सांगण्यात येईल, “मागे व्हा, आपले तेज कोठे अन्यत्र शोधा.” मग त्यांच्या दरम्यान एक भिंत टाकली जाईल जिच्यात एक दार असेल, त्या दाराच्या आत कृपा असेल आणि बाहेर प्रकोप. ते श्रद्धावंतांना ओरडून ओरडून सांगतील, “काय आम्ही तुमच्यासमवेत नव्ह्तो?” श्रद्धावंत उत्तर देतील, “होय, परंतु तुम्ही स्वत:च स्वत:ला उपद्रवात झोकले, संधिसाधूपणा केला, शंकेत गुरफटलेले राहिलात आणि खोटया अपेक्षा तुम्हाला फसवीत राहिल्या, येथपावेतो की अल्लाहचा फैसला आला, आणि शेवटच्या वेळेपर्यंत तो मोठा फसवणूक करणारा तुम्हाला अल्लाहच्या बाबतीत फसवीत राहिला. म्हणून आज तुमच्याकडूनही एखादे प्रतिदान (फिदया) स्वीकारले जाणार नाही आणि त्या लोकांकडूनही नाही ज्यांनी उघडउघड द्रोह केला होता. तुमचे स्थान नरक आहे. तोच तुमची काळजी वाहणारा आहे. आणि हा अत्यंत वाईट शेवट आहे.” (११-१५)

काय श्रद्धावंतांसाठी अद्याप ती वेळ आली नाही की त्यांची ह्रदये अल्लाहच्या स्मरणाने द्रवली जातील, आणि त्याने अवतरलेल्या सत्यापुढे नमतील, आणि ते त्या लोकांप्रमाणे होऊ नयेत ज्यांना पूर्वी ग्रंथ दिला गेला होता, मग एक एक दीर्घकाळ त्यांच्यावर लोटला तर त्यांची ह्रदये कठोर बनली आणि आज ज्यांच्यापैकी बहुतेक अवज्ञाकारी बनलेले आहेत. चांगले जाणून असा की अल्लाह पृथ्वीला तिच्या मृत्यूनंतर जीवन प्रदान करतो, आम्ही तुम्हाला अगदी स्पष्टपणे संकेत दाखविले आहेत, कदाचित तुम्ही बुद्धिचा उपयोग कराल. (१६-१७)

पुरुष आणि स्त्रियांपैकी जे लोक दान करणारे आहेत व ज्यांनी अल्लाहला उत्तम कर्ज दिलेले आहे, त्यांना निश्चितच कित्येक पटीने वाढवून दिले जाईल आणि त्यांच्यासाठी उत्तम मोबदला आहे. आणि ज्या लोकांनी अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांवर श्रद्धा ठेवली आहे तेच आपल्या पालनकर्त्याजवळ (सिद्दीक) सत्यनिष्ठ आणि (शहीद) साक्षीदार असतील. त्यांच्यासाठी त्यांचा मोबदला आणि त्यांचे तेज आहे, आणि ज्या लोकांनी द्रोह केला आहे आणि आमच्या वचनांना खोटे ठरविले आहे ते नरकवासी आहेत. (१८-१९)

चांगल्याप्रकारे जाणून असा की हे दुनियेतील जीवन याशिवाय अन्य काहीच नाही की एक खेळ आणि मनोरंजन व बाह्य टापटीप आणि तुमचे आपापसात एकमेकाविरूद्ध  बडेजाव करणे आणि संपत्ती व संततीमध्ये एक दुसर्‍यावर मात करण्याचा प्रयत्न करणे होय. याची उपमा अशी होय जणू एक पाऊस पडला तर त्याने उत्पन्न होणार्‍या वनस्पतींना पाहून शेतकरी आनंदित झाले. मग तीच शेती पिकते आणि ती पिवळी पडल्याचे तुम्ही पाहता, मग ती भुसा बनून राहते. याउलट परलोक ते स्थान होय जेथे कठोर यातना आहे आनि अल्लाहची क्षमा व त्याची प्रसन्नता आहे. जगातील जीवन एका फसव्या सामग्रीशिवाय अन्य काहीच नाही. धावा, आणि एक दुसर्‍याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा आपल्या पालनकर्त्याच्या क्षमा आणि त्या स्वर्गाकडे जिचा विस्तार आकाश आणि पृथ्वीसमान आहे, जी उपलब्ध केली गेली आहे त्या लोकांसाठी ज्यांनी अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांवर श्रद्धा ठेवली आहे. हा अल्लाहचा कृपाप्रसाद आहे, ज्याला इच्छितो त्याला प्रदान करतो, आणि अल्लाह मोठा कृपानिधी आहे. (२०-२१)

कोणतीही विपत्ती अशी नाही जी पृथ्वीवर अथवा तुमच्या स्वत:वर कोसळत असते आणि आम्ही तिला निर्माण करण्यापूर्वी एका ग्रंथात (अर्थात विधी-लेखात) लिहिलेली नसते. असे करणे अल्लाहसाठी अत्यंत सोपे काम आहे. (हे सर्वकाही अशासाठी आहे) जेणेकरून जी काही हानी तुम्हाला होईल त्यावर तुम्ही विषण्ण होऊ नये आणि जे काही अल्लाह तुम्हाला प्रदान करील त्यावर तुम्ही फुगून जाऊ नये. जे आपल्या स्वत:ला फार मोठे समजतात आणि घमेंड दाखवितात, जे स्वत: कंजुषपणा करतात आणि दुसर्‍यांना कंजुषपणा करण्यास प्रोत्साहित करतात. आता जर कोणी तोंड फिरवीत असला तर अल्लाह निरपेक्ष आणि स्तुत्य गुण-संपन्न आहे. (२२-२४)

आम्ही आपल्या प्रेषितांना अगदी स्पष्ट संकेतचिन्हे व सूचनेसहित पाठविले, आणि त्यांच्याबरोबर ग्रंथ आणि तुळा उतरविली जेणेकरून लोकांनी न्यायाधिष्ठित व्हावे, आणि लोखंड उतरविले ज्यात मोठे बळ आहे आणि लोकांसाठी फायदे आहेत, हे अशासाठी केले गेले आहे की अल्लाहला माहीत व्हावे की कोण न पाहता त्याला व त्याच्या पैगंबरांना मदत करतो. निश्चितच अल्लाह मोठा बलवान आणि जबरदस्त आहे. (२५)

आम्ही नूह (अ.) आणि इब्राहीम (अ.) ना पाठविले आणि त्या दोघांच्या वंशात प्रेषितत्व आणि ग्रंथ ठेवले. मग त्यांच्या संततीपैकी काहींनी मार्गदर्शन स्वीकारले आणि बरेचसे अवज्ञाकारी बनले. त्यांच्यानंतर आम्ही लागोपाठ आपले प्रेषित पाठविले, आणि त्या सर्वांनंतर मरयम पुत्र ईसा (अ.) ला पाठविले आणि त्याला इंजील प्रदान केली, आणि ज्या लोकांनी त्याचे अनुयायित्व स्वीकारले त्यांच्या ह्रदयांत आम्ही करुणा आणि दया घातली, आणि वैराग्य, त्यांनी स्वत:च काढले, आम्ही ते त्यांच्यासाठी कर्तव्य म्हणून ठरविले नव्ह्ते, परंतु अल्लाहच्या प्रसन्नतेच्या शोधात त्यांनी स्वत:च ही बिदअत (कुप्रथा) काढली आणि मग त्यावर कायम राहण्याचे जे कर्तव्य होते त्यांनी ते पूर्ण केले नाही. त्यांच्यापैकी ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली होती त्यांचा मोबदला आम्ही त्यांना प्रदान केला, परंतु त्यांच्यापैकी बहुतेकजण अवज्ञाकारी आहेत. (२६-२७)

हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे. अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगा आणि त्याचे पैगंबर (मुहम्मद (स.)) यांच्यावर श्रद्धा ठेवा, अल्लाह तुम्हाला आपल्या कृपेचा दुहेरी वाटा प्रदान करील, आणि तुम्हाला असे तेज प्रदान करील ज्याच्या प्रकाशात तुम्ही चालाल, आणि तुमचे अपराध माफ करील, अल्लाह मोठा क्षमा करणारा आणि मेहरबान आहे. (तुम्ही असे वर्तन अवलंबिले पाहिजे) जेणेकरून ग्रंथधारकांना हे कळावे की अल्लाहच्या कृपेवर त्यांची काही मक्तेदारी नाही. आणि असे की अल्लाहची कृपा त्याच्या स्वत:च्याच हातात आहे, ज्याला इच्छितो त्याला प्रदान करतो, आणि तो महान कृपानिधी आहे. (२८-२९)


Last Updated : November 18, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP