(मक्काकालीन, वचने ११०)
अल्लाहच्या नावाने, जो दयावंत व असीम कृपावंत आहे.
स्तवन अल्लाहसाठी आहे, ज्याने आपल्या भक्तांवर हा ग्रंथ अवतरला आणि त्यात काही वक्रता ठेवली नाही. यथायोग्य सरळ गोष्ट सांगणारा ग्रंथ, जेणेकरून त्याने लोकांना अल्लाहच्या कठोर प्रकोपापासून सावध करावे आणि श्रद्धा ठेवून सत्कृत्ये करणार्यांना खुशखबर द्यावी की त्यांच्याकरिता चांगला मोबदला आहे, ज्यांत ते सदैव राहतील, आणि त्या लोकांना भय दाखवावे जे सांगतात की अल्लाहने कोणा एकाला मुलगा बनविला आहे. या गोष्टीचे यांनाही काही ज्ञान नाही व त्यांच्या पूर्वजांनादेखील नव्हते, भयंकर गोष्ट आहे जी त्यांच्या तोंडातून निघते, ते निव्वळ खोटे बरळतात. (१-५)
बरे तर हे पैगंबर (स.)! तुम्ही यांच्या मागे दु:खापायी आपले प्राण गमावणार आहात, जर यांनी या शिकवणुकीवर श्रद्धा ठेवली नाही? वस्तुस्थिती अशी आहे की हा जो काही सरंजाम पृथ्वीवर आहे, याला आम्ही पृथ्वीचा शृंगार बनविला आहे जेणेकरून या लोकांची परीक्षा घ्यावी की यांच्यापैकी कोण अधिक चांगली कृत्ये करणारा आहे. सरतेशेवटी हे सर्व आम्ही एक सपाट मैदान बनवणार आहोत. (६-८)
काय तुम्ही समजत आहात की गुहा व शिलालेखवाले आमच्या एखाद्या मोठया चमत्कारिक संकेतांपैकी होते? जेव्हा ते काही नवयुवक गुहेत आश्रित झाले व त्यांनी सांगितले, “हे पालनकर्त्या! आम्हाला आपल्या विशेष कृपेने अनुग्रहीत कर आणि आमचा मामला दुरुस्त कर,” तर आम्ही त्यांना त्याच गुहेत थांबवून वर्षानुवर्षे निद्रावस्थेत ठेवले.
मग आम्ही त्यांना उठविले, जेणेकरून पहावे त्यांच्या दोन गटांपैकी कोण आपल्या अस्तित्वमुदतीची बरोबर गणना करतो. (९-१२)
आम्ही त्यांची खरी कथा तुम्हाला ऐकवितो, ते काही नवयुवक होते ज्यांनी आपल्या पालनकर्त्यावर श्रद्धा ठेवली होती आणि आम्ही त्यांना मार्गदर्शनात प्रदान केली होती. आम्ही त्यांचे मन त्यावेळी दृढ केले जेव्हा ते उभे राहिले आणि त्यांनी ही घोषणा केली की, “आमचा पालनकर्ता तर केवळ तोच आहे जो आकाशांचा व पृथ्वीचा पालनकर्ता आहे. आम्ही त्याला सोडून इतर कोणत्याच उपास्याचा धावा करणार नाही. जर आम्ही असे करू तर अगदी अनुचित गोष्ट करू.” (मग त्यांनी आपसात एकमेकाला सांगितले) “हे आमचे लोक तर सृष्टीच्या पालनकर्त्याला सोडून इतरांना उपास्य बनवून बसले आहेत, हे लोक त्यांच्या उपास्य असल्याबद्दल एखादा स्पष्ट पुरावा का आणत नाहीत? बरे त्या इसमापेक्षा मोठा अत्याचारी अन्य कोण असू शकतो जो अल्लाहवर कुभांड रचतो? आता ज्याअर्थी तुम्ही त्यांच्यापासून व त्यांच्या अल्लाहव्यतिरिक्त उपास्यांपासून अलिप्त झाला आहात तर, चला आता अमुक गुहेत जाऊन आश्रय घ्या. तुमचा पालनकर्ता तुमच्यासाठी आपल्या कृपेचे छत्र विस्तृत करील आणि तुमच्या कार्यासाठी सरंजाम उपलब्ध करून देईल.” (१३-१६)
तुम्ही त्यांना गुहेत पाहिले असते तर तुम्हाला असे दिसून आले असते की सूर्योदय होतो तेव्हा त्यांच्या गुहेला सोडून उजव्या बाजूला चढतो आणि जेव्हा अस्ताला जातो तेव्हा त्यांना चुकवून डाव्या बाजूला खाली उतरतो आणि ते गुहेत एका विस्तृत जागी पडून असतात. हा अल्लाहच्या संकेतांपैकी एक आहे, ज्याला अल्लाह मार्ग दाखवितो तोच मार्ग प्राप्त करणारा आहे आणि ज्याला अल्लाहने भटकविले त्याच्यासाठी तुम्हाला कोणताही मार्गदर्शक, वाली आढळणार नाही. तुम्ही त्यांना पाहून असे समजला असता की ते जागे आहेत, वस्तुत: झोपलेले होते. आम्ही त्यांच्या उजव्या डाव्या कुशी बदलवीत होतो आणि त्यांचा कुत्रा गुहेच्या तोंडाशी हात-पाय पसरून बसला होता. जर एखादे वेळी तुम्ही त्यांना डोकावून पाहिले असते तर उलटपावली पळत सुटला असता आणि तुमच्यावर या दरार्याने जरब बसली असती. (१७-१८)
आणि याच अजब चमत्काराने आम्ही त्यांना उठवून बसविले, जेणेकरून त्यांनी आपापसांत थोडी विचारपूस करावी. त्यांच्यापैकी एकाने विचारले, “सांगा, किती वेळ या स्थितीत राहिला?’ इतरांनी सांगितले, “कदाचित दिवसभर अथवा त्यापेक्षा काही कमी राहिलो असू.” मग ते म्हणाले, “अल्लाहच उत्तम जाणतोज्ज की आमचा किती काळ या अवस्थेत गेला. चला, आता आपल्यापैकी एखाद्याला चांदीचे हे नाणे देऊन शहरात पाठवू या आणि त्याने पाहावे की सर्वांत उत्तम जेवण कोठे मिळते. तेथून त्याने काही तरी खावयास आणवे पण त्याने जरा सावधगिरीने काम केले पाहिजे. असे होऊ नये की त्याने आपण येथे आहोत म्हणून कोणाला कळू द्यावे. जर एखादे वेळी त्या लोकांचा हात आमच्यावर पडला तर बस्स, दगडांनीच ठेचून ठार करतील. अथवा बळेच आम्हाला आपल्या धर्मात परत नेतील, आणि असे घडले तर आम्ही कधीही सफल होणार नाही. अशाप्रकारे आम्ही शहरवासियांना त्यांच्या स्थितीबद्दल माहिती दिली, जेणेकरून लोकांना कळावे, की अल्लाहचे वचन सत्य आहे आणि असे की पुनरुत्थानाची घटका नि:संशय आल्यावाचून राहणार नाही. (पण जरा कल्पना करा की जेव्हा विचार करण्यासारखी गोष्ट खरोखर अशी होती) त्यावेळी ते आपापसांत याबद्दल भांडण करीत होते की यांच्या (गुहानिवासियांच्या) बाबतीत काय केले जावे. काही लोकांनी सांगितले, “यांच्यावर एक भिंत उभारा, यांचा पालनकर्ताच यांच्या बाबतीत उत्तम जाणतो. पण जे लोक त्यांच्या बाबतीत प्रभावी होते त्यांनी सांगितले, “आम्ही तर यांच्यावर एक प्रार्थनागृह बनवू.” (९९-२१)
काही लोक म्हणतील की ते तीन होते व चौथा त्यांचा कुत्रा होता. आणखी काही इतरजण सांगतील की ते पाच होते व सहावा त्यांचा कुत्रा होता. हे सर्व व्यर्थ बडबड करीत आहेत. काही इतर लोक म्हणतात की ते सात होते आणि आठवा त्यांचा कुत्रा होता. सांगा माझा पालनकर्ताच उत्तम जाणतो की ते किती होते. थोडेच लोक त्याची खरी संख्या जाणतात. म्हणून स्थूल चर्चेपेक्षा अधिक त्यांच्या संख्येसंबंधी कुणाशी काही विचारूदेखील नका. आणि पहा. कोणत्याही गोष्टीविषयी कधीही असे म्हणत जाऊ नका की मी हे काम उद्या करून टाकीन, (तुम्ही काहीही करू शकत नाही) याखेरीज की जर अल्लाह इच्छिल, जर विस्मरणाने असली गोष्ट तोंडातून निघाली तर लगेच आपल्या पालनकर्त्याची आठवण करा आणि म्हणा, ‘आशा आहे की माझा पालनकर्ता या बाबतीत सन्मार्गाच्या अधिक जवळच्या गोष्टीकडे माझे मार्गदर्शन करील.” आणि ते आपल्या गुहेत तीनशे वर्षे राहिले आणि (काही लोक कालगणनेत) ९ वर्षे पुढे गेले आहेत. तुम्ही म्हणा, अल्लाह त्यांच्या मुक्कामाचा कालावधी अधिक जाणतो. आकाशाचे व पृथ्वीचे सर्व गुप्त अहवाल त्यालाच माहीत आहेत. किती छान आहे तो पाहणारा व ऐकणारा! पृथ्वी व आकाशातील निर्मितीची खबरदारी घेणारा, त्याच्याशिवाय अन्य कोणी नाही. आणि तो आपल्या राज्यात कोणासही भागीदार करीत नाही. (२२-२६)
हे पैगंबर (स.), तुमच्या पालनकर्त्याच्या ग्रंथातून ते काही तुमच्याकडे दिव्य बोध पाठविले गेले आहे ते (जसेच्या तसे) ऐकवा, त्याचा प्रतिपादने बदलण्याचा कोणासही अधिकार नाही. (आणि जर तुम्ही कोणासाठी त्यात फेरबदल कराल तर) त्याच्यापासून बचाव करून पळ काढण्यास कोणतेही आश्रयस्थान तुम्हाला मिळणार नाही. आणि आपल्या मनाला त्या लोकांच्या सहचर्यात संतुष्ट करा जे आपल्या पालनकर्त्याच्या प्रसन्नतेचे इच्छुक बनून सकाळ व संध्याकाळी त्याचा धावा करतात आणि त्यांच्याकडून कदापि दृष्टी वळवू नका. काय तुम्ही भौतिक शोभा पसंत करता? कोणत्याही अशा व्यक्तीची आज्ञा पाळू नका, ज्याच्या ह्रदयाला आम्ही आमच्या स्मरणापासून बेसावध केले आहे आणि ज्याने मनमानी अनुसरण अंगिकारले आहे आणि ज्याची कार्यपद्धती न्यूनाधिक्क्यावर आधारलेली आहे. स्पष्ट सांगून टाका, हे सत्य आहे तुमच्या पालनकर्त्याकडून, आता ज्याची इच्छा असेल मान्य करावे आणि ज्याची इच्छा असेल त्याने नाकारावे. आम्ही (इन्कार करणार्या) अत्याचार्यांसाठी एक अग्नी तयार ठेवला आहे ज्याच्या ज्वालांनी त्यांना वेढून घेतले आहे. तेथे जर त्यांनी पाणी मागितले तर अशा पाण्याने त्यांचे आतिथ्य केले जाईल जे तेलावरील पापुद्रयासारखे असेल आणि त्यांचे तोंड होरपळून टाकील, निकृष्ट पेय पदार्थ आणि अत्यंत वाईट विश्रांतीस्थान! उरले ते लोक जे श्रद्धावंत असतील आणि सत्कृत्ये करतील, तर निश्चितच आम्ही सत्कृत्ये करणार्या लोकांचा मोबदला वाया घालवीत नसतो. त्यांच्यासाठी सदाबहार स्वर्ग आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहात असतील. तेथे ते सुवर्ण कंकणांनी विभूषित केले जातील तलम रेशम आणि भरजरी हिरवी वस्रे ते परिधान करतील आणि उच्चासनावर लोड लाऊन बसतील. उत्तम मोबदला आणि उत्कृष्ट दर्जाचे निवासस्थान! (२७-३१)
हे पैगंबर (स.), त्यांच्यासमोर एक उदाहरण प्रस्तुत करा. दोन व्यक्ती होत्या, त्यांच्यापैकी एकाला आम्ही द्राक्षांच्या दोन बागा दिल्या आणि त्यांच्याभोवती खजुरीच्या झाडांची कुंपणे लावली आणि त्यांच्या दरम्यान शेतजमीन ठेवली. दोन्ही बागा भरपूर फळा-फुलांनी बहरल्या आणि फळधारणेस त्यांनी जरादेखील उणीव ठेवली नाही. त्या बागांत आम्ही एक कालवा प्रवाहित केला, आणि त्याला खूप नफा प्राप्त झाला. हे सर्व मिळाल्यावर एके दिवशी आपल्या शेजार्याशी बोलताना तो म्हणाला, “मी तुझ्यापेक्षा अधिक श्रीमंत आहे व तुझ्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान मनुष्यबळ राखतो.” मग तो आपल्या स्वर्गात प्रविष्ट झाला आणि स्वत:बद्दल अत्याचारी बनून म्हणू लागला, “मला वाटत नाही की ही दौलत कधी नष्ट होईल आणि पुनरुत्थानाची घटका कधी येईल, तथापि जर एखादे वेळी माझ्या पालनकर्त्याच्या ठायी मला परतविले गेले तरी यांच्यापेक्षा अधिक वैभवशाली जागा मी जरूर प्राप्त करीन.” त्याच्या शेजार्याने बोलताना त्याला सांगितले, “काय तू द्रोह करतोस त्या अस्तित्वाशी ज्याने तुला मातीने व नंतर वीर्याने निर्माण केले आणि तुला एक परिपूर्ण मानव बनविले? राहिलो मी, तर माझा पालनकर्ता तर तोच अल्लाह आहे आणि मी त्याच्याबरोबर कोणासही भागीदार करीत नाही. आणि जेव्हा तू आपल्या स्वर्गात प्रवेश करीत होतास तेव्हा तुझ्या तोंडातून असे का निघाले नाही की, ‘जशी अल्लाहची इच्छा, त्याच्याशिवाय अन्य कोणतीही शक्ती नाही!’ जर तुला मी संपत्ती व संततीत तुझ्यापेक्षा कमी आढळत आहे तर दूर नाही की माझा पालनकर्ता मला तुझ्या स्वर्गापेक्षा उत्तम प्रदान करील आणि आकाशातून तुझ्या स्वर्गावर एखादे अरिष्ट पाठवील ज्यामुळे ती सपाट मैदान बनून राहील, अथवा त्याचे पाणी जमिनीत मुरेल आणि मग ते तुला कोणत्याही प्रकारे वर काढता येणारा नाही.” सरतेशेवटी त्याचे सर्व फळ नष्ट झाले आणि तो आपल्या द्राक्षांच्या बागेला मांडवावर उलथून पडल्याचे पाहून आपण केलेल्या लागवडीबद्दल हातवारे करीत बसला आणि खेदाने म्हणू लागला की, “मी आपल्या पालनकर्त्याचा कोणी भागीदार ठरविला नसता.” -अल्लाहशिवाय त्याची मदत करणारा एकही जथा त्याच्या जवळ नव्हता.
व तो स्वत:देखील या आपत्तीचा मुकाबला करू शकला नाही. त्यावेळी कळले की कार्यसिद्धीचा अधिकार केवळ सत्यमेव अल्लाहसाठीच आहे. तो देईल तेच सर्वोत्तम इनाम व तो दाखविल तोच हितावह शेवट. (३२-४४)
आणि हे पैगंबर (स.), यांना जगातील जीवनाची हकीगत या दृष्टांताद्वारे समजावून द्या की आज आम्ही आकाशातून पर्जन्यवृष्टी केली म्हणून जमिनीची झुडुपे खूप घनदाट झाली, आणि उद्या त्याच वनस्पती भुसा बनून राहतील ज्याला वारा उडवील, अल्लाह प्रत्येक गोष्टीवर सामर्थ्यसंपन्न आहे. ही मालमत्ता व ही संतती केवळ ऐहिक जीवनाची हंगामी शोभा आहे. वास्तविक बाकी राहणारी सत्कृत्येच तुझ्या पालनकर्त्याजवळ परिणामाच्या दृष्टीने उत्तम आहेत आणि त्यांच्यापासूनच चांगल्या आशा निगडित केल्या जाऊ शकतात. त्या दिवसाची काळजी हवी, जेव्हा आम्ही पर्वतांना चालवू आणि पृथ्वी तुम्हाला पूर्णपणे विवस्त्र दिसेल आणि आम्ही सर्व माणसांना अशा प्रकारे घेऊन गोळा करू की (अगोदर व नंतरच्यापैकी) एकदेखील सुटणार नाही. आणि सर्वच्या सर्व तुमच्या पालनकर्त्याच्या ठायी ओळी ओळीत हजर केले जातील, हे पहा, आलात ना तुम्ही आमच्यापाशी त्याचप्रमाणे जसे आम्ही तुम्हाला पहिल्यांदा निर्माण केले होते. तुम्ही तर असे समजला होता की आम्ही तुमच्यासाठी वचनाची कोणतीही वेळ निश्चित केलेली नाही. आणि कर्मनोंद पुढे ठेवली जाईल. त्यावेळी तुम्ही पहाल की अपराधी लोक आपल्या जीवन पुस्तकातील नोंदीला भीत असतील आणि म्हणत असतील की, “आमचे दुर्दैव! हे कसले पुस्तक आहे की आमची लहान मोठी कोणतीही कृती अशी उरली नाही जी यामध्ये नोंदली गेली नाही. जे जे काही त्यांनी केले होते ते सर्व त्यांच्या पुढयात त्यांना आढळेल आणि तुझा पालनकर्ता कोणावर तिळमात्र अन्याय करणार नाही. (४५-४९)
स्मरण करा, जेव्हा आम्ही दूतांना सांगितले की, आदमपुढे नतमस्तक व्हा, तेव्हा ते नतमस्तक झाले परंतु इब्लीस नतमस्तक झाला नाही, तो जिनपैकी होता, म्हणून आपल्या पालनकर्त्याच्या हुकमाच्या बाहेर गेला. आता काय तुम्ही मला सोडून त्याला व त्याच्या संततीला आपला पालक बनविता? वास्तविक ते तुमचे शत्रू आहेत? फारच वाईट बदल आहे ज्यास अत्याचारी लोक अवलंबित आहेत. मी आकाश व पृथ्वी निर्माण करताना त्यांना बोलविले नव्हते आणि त्यांच्या स्वत:च्या निर्मितीतसुद्धा त्यांना सामील केले नव्हते, माझे काम हे नव्हे की भ्रष्टकर्त्यांना आपला सहायक बनवीत राहू. (५०-५१)
हे लोक काय करतील त्या दिवशी जेव्हा त्यांचा पालनकर्ता त्यांना म्हणेल की हाक मारा त्या विभूतींना ज्यांना तुम्ही माझे भागीदार समजून बसला होता. हे त्यांचा धावा करतील परंतु ते त्यांच्या मदतीला येणार नाहीत आणि आम्ही त्यांच्या दरम्यान विनाशाचा एकच खड्डा समाईक करून टाकू. सर्व अपराधी त्या दिवशी अग्नी पाहतील आणि समजून घेतील की आता त्यात त्यांचे पतन आहे आणि त्यांना त्यापासून वाचविण्यासाठी कोणतेही आश्रयस्थान मिळणार नाही. (५२-५३)
आम्ही या कुरआनात लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने समजाविले, परंतु मनुष्य फारच भांडखोर ठरला आहे. त्याच्या समोर जेव्हा मार्गदर्शन आले तेव्हा ते मान्य करणे आणि आपल्या पालनकर्त्या पुढे क्षमायाचना करण्यापासून त्यांना बरे कोणत्या गोष्टीने रोखले? याशिवाय अन्य काहीच नाही की ते प्रतीक्षेत आहेत की त्यांच्याबरोबर तसेच काही व्हावे असे पूर्वीच्या लोकसमूहाबरोबर घडले आहे अथवा असे, की त्यांनी प्रकोप समोर येताना पहावा. (५४-५५)
पैगंबरांना आम्ही या कामव्यतिरिक्त अन्य कोणत्याही उद्देशाने पाठवीत नसतो की त्यांनी शुभवार्ता आणि इशारा देण्याची जबाबदारी पार पाडावी. पण श्रद्धाहीनांची स्थिती अशी आहे की ते असत्याची शस्त्रे घेऊन सत्याला तुच्छ लेखण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांनी माझ्या वचनांना व त्यांना दिल्या गेलेल्या धमक्यांना चेष्टेचे साधन बनविले आहे. आणि त्या इसमापेक्षा अधिक अत्याचारी अन्य कोण आहे ज्याला त्याच्या पालनकर्त्याची वचने ऐकवून उपदेश केला जावा आणि त्याने त्यापासून पराङमुख व्हावे आणि त्या वाईट परिणामाला विसरावे ज्याची व्यवस्था त्याने स्वत:साठी खुद्द आपल्या हातांनी केली आहे? (ज्या लोकांनी ही पद्धत अवलंबिली आहे) त्यांच्या ह्रदयावर आम्ही आवरणे चढविली आहेत, जे त्यांना कुरआनचे म्हणणे समजू देत नाहीत आणि त्यांच्या कानांत आम्ही बधिरता आणली आहे. तुम्ही त्यांना मार्गदर्शनाकडे कितीही बोलवा, ते या स्थितीत कधीही मार्गदर्शन प्राप्त करू शकणार नाहीत. (५६-५७)
तुझा पालनकर्ता क्षमाशील व दयाळू आहे, त्याने यांच्या कृतीवर यांना पकडू इच्छिले असते तर लवकरच प्रकोप पाठविला असता परंतु यांच्यासाठी निर्णयाची एक वेळ ठरलेली आहे आणि त्यांच्यापासून वाचून पळ काढण्याचा यांना कोणताच मार्ग सापडणार नाही. (५८)
या प्रकोपग्रस्त वस्त्या तुमच्यासमोर हजर आहेत. यांनी जेव्हा अत्याचार केले तेव्हा आम्ही यांना नष्ट केले आणि यांच्यापैकी प्रत्येकाच्या विनाशासाठीज आम्हीज वेळ निश्चित करून ठेवली होती. (५९)
(जरा यांना ती हकीगत ऐकवा जी मूसा (अ.) वर ओढवली होती) जेव्हा मूसा (अ.) ने आपल्या सेवकाला सांगितले होते की, “मी माझा प्रवास पूर्ण करणार नाही जोपर्यंत दोन्ही नद्यांच्या संगमावर पोहचत नाही. अन्यथा मी एका दीर्घ काळापर्यंत चालतच राहीन. मग जेव्हा ते त्यांच्या संगमावर पोहचले तेव्हा ते आपल्या (जवळील) माशापासून गाफिल झाले आणि तो निघून अशा प्रकारे नदीत गेला जणू एखादा सुरूंग लागला असावा. पुढे जाऊन मूसा (अ.) ने आपल्या सेवकाला सांगितले. “आणा, आमची न्याहारी, आजच्या प्रवासात तर आम्ही भयंकर थकलो आहोत.” सेवकाने सांगितले, “आपण पाहिले! हे काय घडले? जेव्हा आम्ही त्या खडकाजवळ थांबलो होतो तेव्हा मला माशाची आठवण राहिली नाही आणि शैतानाने मला इतके गाफिल करून टाकले की त्याचा उल्लेख (आपल्यासमोर करण्यास) विसरलो, मासा तर चमत्कारिकरीत्या नदीत गेला.” मूसा (अ.) ने सांगितले, “याचाच तर शोध आम्ही करीत होतो.” म्हणून ते दोघे आपल्या पदचिन्हावरून परत फिरले. आणि तेथे त्यांना आमच्या दासांपैकी एक दास भेटला ज्याला आम्ही आपल्या कृपेने उपकृत केले होते आणि आपल्यातर्फे एक विशेष ज्ञान प्रदान केले होते. (६०-६५)
मूसा (अ.) ने त्याला सांगितले, “काय मी आपल्या समवेत राहू शकतो जेणेकरून आपण मलादेखील तो सुज्ञपणा शिकवावा जो आपणाला अवगत केला गेला आहे.” त्याने उत्तर दिले, “आपण माझ्या बरोबरीने धीर धरू शकणार नाही, आणि ज्या गोष्टीची माहिती आपल्याला नसेल आपण त्यावर धीर तरी कसा धरावा बरे?” मूसा (अ.) ने सांगितले, “जर अल्लाहने इच्छिले तर मी आपल्याला संयमी आढळेन आणि कोणत्याही बाबतीत मी आपली अवज्ञा करणार नाही.” त्याने सांगितले, “बरे! जर आपण माझ्याबरोबर येत आहात तर मला कोणतीही गोष्ट आपण विचारू नये, जोपर्यंत मी स्वत:च त्याचा उल्लेख आपणासमोर करीत नाही.” (६६-७०)
आता हे दोघे रवाना झाले येथपावेतो की ते एका नौकेत स्वार झाले तेव्हा त्या व्यक्तीने नौकेत छिद्र पाडले, मूसा (अ.) ने सांगितले, “आपण यात छिद्र पाडले की जेणेकरून नावेतील सर्व लोक बुडून जावेत? ही तर आपण एक भयंकर गोष्ट केली आहे.” त्याने सांगितले, “मी तुम्हाला सांगितले नव्हते की तुम्ही माझ्या सोबत धीर धरू शकणार नाही?” मूसा (अ.) ने सांगितले, “चूकभूलसाठी आपण मला धरू नका, माझ्या बाबतीत आपण कठोरता दाखवू नका.” (७१-७३)
पुन्हा ते दोघे निघाले येथपावेतो की त्यांना एक मुलगा भेटला आणि त्या व्यक्तीने त्याला ठार करून टाकले. मूसा (अ.) ने सांगितले, “आपण एका निरपराध्याचे प्राण घेतले, वस्तुत: त्याने कुणाचा खून केला नव्हता. हे कृत्य तर आपण फारच वाईट केले. ”त्याने सांगितले, “मी तुम्हाला सांगितले नव्हते की माझ्या बरोबरीने तुम्ही धीर धरू शकणार नाही?” मूसा (अ.) ने सांगितले, “यानंतर जर मी आपल्याला काही विचारले तर आपण मला बरोबर ठेऊ नका. घ्या, आता तर माझ्याकडून आपल्याला निमित्त सापडले.” (७४-७६)
मग ते पुढे निघाले येथपावेतो की एका वस्तीत पोहचले आणि तेथील लोकांपाशी जेवण मागितले. परंतु त्यांनी त्या दोघांच्या पाहूणचाराला नकार दिला, तेथे त्यांनी एक भिंत पाहिली जी ढासळू पाहात होती. त्या व्यक्तीने त्या भिंतीस पुन्हा पूर्वपदावर आणले. मूसाने सांगितले. “जर आपण इच्छिले असते तर या कामाची मजुरी घेऊ शकला असता.” त्याने सांगितले. “पुरे, आता माझे आणि तुमचे सहचर्य संपले. आता मी तुम्हाला त्या गोष्टींची हकीगत सांगतो ज्यावर तुम्ही धीर धरू शकला नाही. त्या नावेची हकीगत अशी आहे की ती काही गरीब माणसांची होती. ते दर्यामध्ये काबाडकष्ट करीत होते. मी तिला सदोष बनवले कारण पुढे एका अशा बादशाहचा मुलुख होता जो प्रत्येक नाव बळजबरीने हिरावून घेत होता. त्या मुलाची गोष्ट अशी की त्याचे आईवडील श्रद्धावंत होते, आम्हाला भय वाटले की हा मुलगा आपल्या अतिरेक व द्रोहामुळे त्यांना त्रस्त करील. म्हणून आम्ही इच्छिले की त्याच्या पालनकर्त्याने त्याच्याऐवजी त्यांना अशी संतती द्यावी जी चारित्र्यानेसुद्धा त्यांच्यापेक्षा उत्तम असावी आणि ज्याच्याकडून नातेवाईकांशी सद्वर्तनदेखील जास्त चांगले असावे आणि या भिंतीची हकीगत अशी आहे की ही दोन अनाथ मुलांची आहे. ते या शहरात राहतात. या भिंतीखाली या मुलांसाठी एक खजिना पुरलेला आहे आणि यांचा बाप एक सदाचारी मनुष्य होता. म्हणून तुमच्या पालनकर्त्याने इच्छिले की ही दोन मुले प्रौढ व्हावीत व आपला खजिना काढून घ्यावा. हे तुमच्या पालनकर्त्याच्या कृपेच्या आधारे केले गेले आहे, मी काही आपल्या स्वत:च्या अधिकारात केलेले नाही, अशी आहे हकीगत त्या गोष्टींची ज्यावर तुम्ही धीर धरू शकला नाही. (७७-८२)
आणि हे पैगंबर (स.), हे लोक तुम्हापाशी जुलकरनैन संबंधी विचारणा करतात. यांना सांगा, “मी त्याचा काही अहवाल तुम्हाला ऐकवितो. (८३)
आम्ही त्याला भूतलात सत्ताधिकार प्रदान केलेला होता आणि त्याला सर्व प्रकारचे सरंजाम व साधने प्रदान केली होती. त्याने (प्रथम पश्चिमेकडील एका मोहिमेचे) आयोजन केले, येथपावेतो की जेव्हा तो मावळतीपर्यंत पोहचला, तेव्हा त्याने काळ्या पाण्यात सूर्यास्त होताना पाहिला. आणि तेथे त्याला एक लोकसमूह आढळला. आम्ही सांगितले, “हे जुलकरनैन, तुला हे सामर्थ्यदेखील प्राप्त आहे की त्यांना त्रास द्यावा आणि हेदेखील की त्यांच्याशी सद्व्यवहार करावा.” त्याने सांगितले, “जो त्यांच्यापैकी अत्याचार करील त्याला आम्ही शिक्षा करू मग तो आपल्या पालनकर्त्याकडे परतविला जाईल. आणि तो त्याला आणखीन कठोर यातना देईल. आणि जो त्यांच्यापैकी श्रद्धा ठेवील आणि सदाचरण करील त्याच्यासाठी चांगला मोबदला आहे आणि आम्ही त्याला मवाळ आदेश देऊ.” (८३-८८)
मग त्याने (एका दुसर्या मोहिमेची) तयारी केली, येथपावेतो की तो उगवतीपर्यंत जाऊन पोहोचला तेथे त्याने पाहिले की सूर्य एका अशा जनसमूहावर उगवत आहे ज्याच्यासाठी उन्हापासून बचावाची कोणतीही व्यवस्था आम्ही कोलेली नाही. अशी स्थिती होती त्यांची, आणि जुल्करनैनजवळ जे काही होते ते आम्ही जाणत होतो. (८९-९१)
मग त्याने (आणखी एका मोहिमेचे) आयोजन केले, ‘येथपावेतो की जेव्हा दोन पर्वतांच्या दरम्यान पोहोचला तेव्हा त्याला त्यांच्यापाशी एक लोकसमूह भेटला तो महत्प्रयत्नानेच एखादी गोष्ट समजत होता. त्या लोकांनी सांगितले की, “हे जुल्करनैन, याजूज व माजूज या भूप्रदेशात उपद्रव माजवितात. तर काय आम्ही तुला या कामासाठी काही कर द्यावा की तू आमच्या आणि त्यांच्या दरम्यान एखादा तट बांधशील?” त्याने सांगितले, “जे काही माझ्या पालनकर्त्याने मला दिलेले आहे ते खूप आहे. तुम्ही फक्त मेहनतीनिशी मला सहाय्य करा, मी तुमच्या आणि त्यांच्या दरम्यान तट बांधून देतो. मला लोखंडी चादरी आणून द्या,” शेवटी जेव्हा दोन्ही डोंगरामधील पोकळी त्याने भरून काढली तेव्हा लोकांना सांगितले की आता अग्नी प्रज्वलित करा. येथपावेतो की (जेव्हा ही लोखंडी भिंत) अगदी अग्निप्रमाणे लालबूंद करून टाकली तेव्हा त्याने सांगितले, “आणा, आता मी यावर वितळलेले तांबे ओतीन.” (ही तटबंदी अशी होती की) याजूज आणि माजूज त्यावर चढून देखील येऊ शकत नव्हते आणि त्याला भगडाड पाडणे त्यांना तर अधिकच कठीण होते. जुलकरनैनने सांगितले, “हीज माझ्या पालनकर्त्याची कृपा आहे परंतु जेव्हा माझ्या पालनकर्त्याच्या अभिवचनाची घटका येईल तेव्हा तो हिला जमीनदोस्त करी आणि माझ्या पालनकर्त्याचे अभिवचन सत्याधिष्ठित आहे.” (९२-९८)
आणि त्या दिवशी आम्ही लोकांना सोडून देऊ की (समुद्राच्या लाटाप्रमाणे) एक दुसर्याशी लगट होईल आणि शिंग फुंकले जाईल. आणि आम्ही सर्व मानवांना एकत्र जमा करू. आणि तो दिवस असेल जेव्हा आम्ही नरकाला आणि तो दिवस असेल जेव्हा आम्ही नरकाला श्रद्धाहीनांसमोर आणू, जे माझ्या उपदेशापासून अंध बनले होते आणि काही ऐकण्याकरिता मुळीच तयार नव्हते. (९९-१०१)
तर काय हे लोक ज्यांनी द्रोह अवलंबिला आहे, अशी कल्पना बाळगतात की मला सोडून माझ्या दासांना आपले कार्यसाधक ठरवावे? आम्ही अशा श्रद्धाहीनांच्या पाहूणचारासाठी नरक तयार करून ठेवला आहे. (१०२)
हे पैगंबर (स.), यांना सांगा, काय आम्ही तुम्हाला सांगवे की आपल्या कृत्यामध्ये सर्वत जास्त अपयशी आणि विफल लोक कोण आहेत? जगातील जीवनात ज्यांची सर्व धावपळ सरळ मार्गापासून भ्रष्ट राहिली आणि ते समजत राहिले की ते सर्वकाही यथायोग्य करीत आहेत. हे ते लोक आहेत ज्यांनी आपल्या पालनकर्त्याची वचने मानण्यास नकार दिला आणि त्याच्या पुढे ह्जर होण्याचा विश्वास केला नाही. म्हणून त्यांची सर्व कृत्ये वाया गेली, पुनरुत्थानाच्या दिवशी आम्ही त्यांना काहीच वजन देणार नाही. त्यांचा मोबदला नरक आहे त्या द्रोहाच्या बदल्यात जे त्यांनी केले आणि त्या उपहासापायी जो ते माझ्या आयतींशी आणि माझ्या पैगंबरांशी करीत राहिले. तथापि ते लोक ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि ज्यांनी सत्कृत्ये केली त्यांच्या पाहुणचारासाठी फिरदौसच्या (स्वर्गाच्या) बागा असतील, ज्यांत ते सदैव राहतील आणि कधीही इतरत्र जाण्याची त्यांची इच्छा होणार नाही. (१०३-१०८)
हे पैगंबर (स.), सांगा की, जर समुद्र माझ्या पालनकर्त्याच्या गोष्टी लिहिण्यासाठी शाई बनला तर तो संपेल परंतु माझ्या पालनकर्त्याच्या गोष्टी संपणार नाहीत. इतकेच नव्हे तर तितकीच शाई आम्ही आणखीन आणली तर तीदेखील पुरेशी ठरणार नाही. (१०९)
हे पैगंबर (स.)! सांगा, मी तर एक मनुष्य आहे. तुम्हासारखाच, माझ्याकडे ‘दिव्यबोध’ पाठविला जातो की तुमचा परमेश्वर केवळ एकच परमेश्वर आहे. म्हणून जो कोणी आपल्या पालनकर्त्याच्या भेटीची आशा करील त्याने सत्कृत्ये करावीत आणि भक्तीमध्ये आपल्या पालनकर्त्यासमवेत इतर कोणाला भागीदार करू नये. (११०)