(मक्काकालीन, वचने ३५)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
हामीऽऽम. या ग्रंथाचे अवतरण जबरदस्त आणि बुद्धिमान अल्लाहकडून आहे. (१-२)
आम्ही पृथ्वीला व आकाशांना आणि त्या सर्व वस्तूंना ज्या त्यांच्या दरम्यान आहेत, सत्याधिष्ठित आणि एका विशिष्ट मुदतीच्या निश्चितीसह निर्माण केले आहे. परंतु हे अश्रद्धावंत लोक त्या वस्तुस्थितीपासून तोंड फिरवून आहेत ज्यापासून यांना सावध केले गेले आहे. (३)
हे पैगंबर (स.), यांना सांगा, “कधी तुम्ही डोळे उघडून पाहिले की त्या व्यक्ती आहेत तरी कोण की अल्लाहला सोडून ज्यांचा धावा तुम्ही करता? जरा मला दाखवा तर खरे की जमिनीत त्यांनी काय निर्माण केले आहे? अथवा आकाशांच्या निर्मिती व नियोजनात त्यांचा काहीज वाटा आहे? याच्यापूर्वी आलेला एखादा ग्रंथ अथवा ज्ञानाने एखादे अवशेष (या श्रद्धेच्या पुराव्यादाखल) तुमच्याजवळ असल्यास तेच घेऊन या, जर तुम्ही खरे असाल. बरे त्या माणसापेक्षा अधिक बहकलेला माणूस इतर कोण असेल जो अल्लाहला सोडून त्यांना पुकारतो जे पुनरुत्थानापर्यंत त्याला उत्तर देऊ शकत नाहीत? किंबहुना यापासूनही अनभिज्ञ आहेत की पुकारणारे त्यांना पुकारित आहेत, आणि जेव्हा सर्व माणसे एकत्र केली जातील त्यावेळी ते आपणास पुकारणार्यांचे शत्रू आणि त्यांच्या उपासनेचा ते इन्कार करणारे असतील. (४-६)
या लोकांना जेव्हा आमची स्पष्ट वचने ऐकविली जातात आणि सत्य यांच्यापुढे येते तेव्हा हे अश्रद्धावंत लोक त्यासंबंधी म्हणतात की ही तर उघड जादू आहे. काय त्यांचे म्हणणे असे आहे की प्रेषिताने हे स्वत:च रचले आहे? यांना सांगा, “जर मी हे स्वत: रचलेले असेल तर तुम्ही मला अल्लाहच्या पकडीतून जरासुद्धा वाचवू शकणार नाही, ज्या गोष्टी तुम्ही रचता अल्लाह त्या चांगल्या प्रकारे जाणतो, माझ्या आणि तुमच्या दरम्यान तोच साक्ष देण्यास पुरेसा आहे, आणि तो अत्यंत क्षमाशील व परमकृपाळू आहे.” (७-८)
यांना सांगा, “मी कोणी निराळा प्रेषित नाही, मला माहीत नाही की उद्या तुमच्याशी काय घडेल व माझ्याशी काय, मी तर केवळ त्या दिव्यबोधाचे अनुसरण करतो जे माझ्याकडे पाठविले जाते आणि मी एक स्पष्टपणे सावध करणार्याशिवाय अन्य काही नाही.” हे पैगंबर (स.) यांना सांगा, “कधी तुम्ही विचार तरी केला की जर ही वाणी अल्लाहकडूनच असली आणि तुम्ही तिचा इन्कार करून बसला तर (तुमचा शेवट कसा होईल) आणि यासारख्या एका वाणीची तर बनीइस्राईलपैकी एका साक्षीदाराने साक्षसुद्धा दिलेली आहे, त्याने श्रद्धा ठेवली आणि तुम्ही आपल्या गर्वात गुरफटून राहिलात, अशा अत्याचार्यांना अल्लाह मार्गदर्शन करीत नसतो.” (९-१०)
ज्या लोकांनी मान्य करण्यास नकार दिलेला आहे ते श्रद्धावंतांसंबंधी म्हणतात, जर या ग्रंथास मानणे काही चांगले काम असते तर हे लोक याबाबतीत आमच्यावर मात करू शकले नसते. ज्याअर्थी यांनी त्यापासून मार्गदर्शन प्राप्त केले नाही, त्याअर्थी हे आता अवश्य सांगतील की हे तर जुने थोतांड आहे. वास्तविकपणे याच्यापूर्वी मूसा (अ.) चा ग्रंथ मार्गदर्शक आणि कृपा म्हणून आलेला आहे, आणि हा ग्रंथ त्याची सत्यता प्रमाणित करणारा अरबी भाषेत आला आहे जेणेकरून अत्याचार्यांना ताकीदही द्यावी आणि सन्मार्ग स्वीकारणार्यांना शुभवार्ता द्यावी. निश्चितच ज्यांनी सांगितले की अल्लाहच आमचा पालनकर्ता आहे, मग त्यावर दृढ राहिले, त्यांच्यासाठी कोणतेही भय नाही आणि ते दु:खीही होणार नाहीत. असले लोक स्वर्गामध्ये जाणारे आहेत जेथे ते सदैव राहतील; आपल्या त्या सत्कर्माबद्दल जे ते जगात करीत राहिले आहेत. (११-१४)
आम्ही मनुष्याला आदेश दिला की त्याने आपल्या आईवडिलांशी सद्व्यवहार करावा, त्याच्या आईने कष्ट सोसून त्याला पोटात बालगले आणि कष्ट करून त्याला प्रसवले, आणि त्याचा गर्भ व त्याचे दूध सोडविण्यात तीस महिने लागले येथपावेतो की तो जेव्हा आपल्या पूर्ण शक्तीला पोहचला आणि चाळीस वर्षांचा झाला तेव्हा तो म्हणाला, “हे माझ्या पालनकर्त्या, मला सद्बुद्धी दे की मी मुझ्या त्या देणग्यांबद्दल कृतज्ञता दर्शवावी ज्या तू मला व माझ्या आईवडिलांना प्रदान केल्या आणि असे सत्कृत्य करावे ज्याने तू प्रसन्न व्हावे, आणि माझ्या संततीलासुद्धा सदाचारी बनवून मला सुख दे. मी तुझ्या पुढे पश्चात्ताप व्यक्त करतो आणि आज्ञाधारक (मुस्लिम) दासांपैकी आहे.”
अशाप्रकारच्या लोकांकडून आम्ही त्यांच्या उत्तम कृत्यांचा स्वीकार करतो आणि त्यांच्या वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. हे स्वर्गस्थ लोकांमध्ये सामील होतील, त्या खर्या वचनानुसार जे त्यांना दिले जात राहिले आहे. आणि त्या माणसाने आपल्या आईवडिलांना सांगितले, “हाय! त्रस्त करून टाकले तुम्ही, काय तुम्ही मला असली भीती दाखविता की मी मेल्यानंतर थडग्यातून काढला जाईन? वास्तविकत: माझ्यापूर्वी पुष्कळशा पिढया होऊन गेल्या आहेत (त्यांच्यापैकी तर कोणी उठून आला नाही)” आई आणि वडील अल्लाहचा धावा करीत सांगतात, “अरे अभाग्या, मान्य कर, अल्लाहचे वचन सत्य आहे.” परंतु तो म्हणतो, “या सर्व पुरातनकालीन जुनाट कथा होत.” हे लोक आहेत ज्यांच्यावर प्रकोपाचा निर्णय लागू झालेला आहे. यांच्यापूर्वी जिन्न आणि माणसांची जी टोळकी (अशाच चालीची) होऊन गेली आहेत त्यांच्यातच हेसुद्धा जाऊन सामील होतील. नि:संशय हे तोटयात राहणारे लोक होत. दोन्ही गटांपैकी प्रत्येकाचे दर्जे त्यांच्या कृत्यानुसार आहेत जेणेकरून अल्लाह त्यांच्या कर्माचा पुरेपूर बदला त्यांना देईल. त्यांच्यावर अन्याय कदापि केला जाणार नाही. मग जेव्हा हे अश्रद्ध अग्नीपुढे आणून उभे केले जातील तेव्हा यांना सांगितले जाईल, तुम्ही आपल्या वाटयाची सगळी ऐश्वर्ये जगातील आपल्या जीवनातच संपवून टाकली आहेत आणि त्यांचा आनंद उपभोगिला, आणि तो गर्व तुम्ही पृथ्वीतलावर कोणत्याही अधिकाराविना करीत राहिला आणि ज्या अवज्ञा तुम्ही केल्या त्यापायी आज तुम्हाला अपमानास्पद यातना दिली जाईल. (१५-२०)
जरा यांना ‘आद’चा भाऊ (हूद (अ.)) ची कथा ऐकवा जेव्हा त्याने ‘अहकाफ’मध्ये आपल्या राष्ट्राला सावध केले होते आणि अशाप्रकारे सावध करणारे त्याच्या अगोदरसुद्धा होऊन गेले होते व त्याच्यानंतरसुद्धा होऊन गेले होते व त्याच्यानंतरसुद्धा येत राहिले की, “अल्लाहच्या व्यतिरिक्त कोणाचीहीज भक्ती करू नका. मला तुमच्यासंबंधी एका मोठया भयंकर दिवसाच्या प्रकोपाची भीती आहे.” त्यांनी सांगितले, “काय तू यासाठी आला आहेस की आम्हाला बहकवून आमच्या उपास्यांशी फितुरी करवावी? बरे तर घेऊन ये आपला तो प्रकोप ज्याचे भय तू आम्हाला भय दाखवितोस जर खरोखर तू सच्चा आहेस.” त्याने सांगितले, “याचे ज्ञान तर अल्लाहला आहे, मी केवळ तो संदेश तुम्हापर्यंत पोहचवीत आहे जो देऊन मला पाठविले गेले आहे परंतु मी पाहात आहे की तुम्ही लोक अडाणीपणा करीत आहात.” मग जेव्हा त्यांनी त्या प्रकोपास आपल्या खोर्यांकडे येताना पाहिले तेव्हा म्हणू लागले, “हा ढग आहे जो आम्हाला तृप्त करील.”-“नव्हे, तर ही तीच गोष्ट आहे जिच्यासाठी तुम्ही घाई करीत होता, हे झंझावात आहे, ज्यात यातनादायक प्रकोप चालून येत आहे, आपल्या पालनकर्त्याच्या आज्ञेने प्रत्येक वस्तू नष्ट करून टाकील.” सरतेशेवटी त्यांची दशा अशी झाली की त्यांच्या राहण्याच्या जागेशिवाय तेथे काहीच दिसत नव्हते. अशातर्हेने आम्ही अपराध्यांना बदला देत असतो. त्यांना आम्ही ते काही दिले होते जे तुम्हा लोकांना दिलेले नाही. त्यांना आम्ही कान, डोळे व ह्रदय, सर्वकाही दिलेले होते. परंतु ते कानही त्यांच्या काही उपयोगी पडले नाही की डोळे आणि ह्रदयदेखील, कारण ते अल्लाहच्या संकेतांना नाकारीत होते, आणि त्याच गोष्टीच्या फेर्यात ते आले ज्याची ते टिंगल उडवीत होते. (२१-२६)
तुमच्या सभोवताली प्रदेशातील अनेक वस्त्यांना आम्ही नष्ट करून टाकले आहे. आम्ही आमचे संकेत पाठवून वरचेवर तर्हेतर्हेने त्यांना समजाविले कादाचित त्यांनी परावृत्त व्हावे. मग त्या व्यक्तींनी त्यांना मदत का केली नाही ज्यांना अल्लाहला सोडून त्यांनी अल्लाहशी जवळिकीचे साधन समजून उपास्य बनविले होते? किंबहुना ते तर त्यांच्याकडून हरवले गेले आणि हे होते त्यांच्या खोटया व त्या बनावटी श्रद्धांचे परिपाक ज्या त्यांनी रचल्या होत्या. (२७-२८)
(आणि तो प्रसंगसुद्धा उल्लेखनीय आहे) जेव्हा आम्ही जिन्नांच्या एका समूहाला तुमच्याकडे घेऊन आलो होतो जेणेकरून त्यांनी कुरआन ऐकावे. जेव्हा ते त्या जागी पोहचले (जेथे तुम्ही कुरआन पठण करीत होता) तेव्हा त्यांनी आपापसात सांगितले, स्तब्ध रहा. मग जेव्हा ते पठण पूर्ण झाले तेव्हा ते सावध करणारे बनून आपल्या राष्ट्राकडे परतले, त्यांना जाऊन सांगितले, “हे आमच्या अजनमूहाच्या जिन्नांनो, आम्ही एका ग्रंथाचे श्रवण केले आहे जो मूसा (अ.) च्या नंतर उतरविला गेला आहे, सत्य प्रमाणित करणारा आहे आपल्या अगोदर आलेल्या ग्रंथांचे, मार्गदर्शन करीत आहे सत्य आणि सरळ मार्गाकडे. हे आमच्या जनसमूहाच्या जिन्नांनो, अल्लाहकडे बोलाविणार्यांचे आमंत्रण स्वीकारा आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवा, अल्लाह तुमच्या अपराधांना क्षमा करील आणि तुम्हाला यातनादायक प्रकोपासून वाचवील.” आणि जो कोणी अल्लाहच्या निमंत्रकाचे म्हणणे ऐकत नसेल तो स्वत:ही भूतलावर असे सामर्थ्य बाळगत नाही की अल्लाहला असफल करतील आणि त्याचे असले समर्थक व वालीही नाहीत की जे अल्लाहपासून त्याला वाचवतील. असले लोक उघड पथभ्रष्टतेत पडलेले आहेत. (२९-३२)
आणि काय या लोकांना हे उमगत नाही की ज्या अल्लाहने ही पृथ्वी आणि आकाशांना निर्माण केले व त्यांना निर्माण करताना तो थकला नाही, तो खचितच याला समर्थ आहे की मृतांना जिवंत करील? का नाही, निश्चितच तो प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे, ज्या दिवशी हे अश्रद्धावंत अग्नीसमोर आणले जातील, तेव्हा यांना विचारले जाईल, “काय हे सत्य नाही?” हे म्हणतील, “होय, आमच्या पालनकर्त्याची शपथ (हे खरोखर सत्य आहे).” अल्लाह फर्मावील, “बरे तर आता प्रकोपाचा आस्वाद घ्या आपल्या त्या इन्कारापायी जे तुम्ही करीत राहिला होता.” (३३-३४)
मग हे पैगंबर (स.), संयम राखा ज्याप्रमाणे दृढनिश्चयी प्रेषितांनी संयम राखले आहे आणि यांच्या बाबतीत घाई करू नका, ज्या दिवशी हे लोक त्या गोष्टीस पाहतील ज्याचे भय यांना दाखविले जात आहे तेव्हा या लोकांना असे वाटेल जणू जगात दिवसाच्या एका घटकेपेक्षा अधिक राहिले नव्ह्ते. म्हणणे पोहचविले गेले, आता काय अवज्ञाकारी लोकांव्यतिरिक्त अन्य कोणी नष्ट होईल? (३५)