सूरह - अल्कियामा
कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.
(मक्काकालीन, वचने ४०)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
नव्ये, मी शपथ घेतो पुनरुत्थानाच्या दिवसाची आणि नाही, मी शपथ घेतो निर्भत्सना करणार्या मनाची काय माणूस असे समजतो की आम्ही त्याच्या हाडांना गोळा करू शकणार नाही? का नाही? आम्ही तर त्याच्या बोटांची पेरे पेरे सुद्धा नीट बनविण्यास समर्थ आहोत, परंतु माणूस इच्छितो की पुढेसुद्धा दुष्कृत्ये करीत रहावीत. विचारतो, “शेवटी केव्हा येणार आहे बरे तो पुनरुत्थानाचा दिवस?” मग जेव्हा डोळे थिजून जातील आणि चंद्र निस्तेज होऊन जाईल आणि चंद्र सूर्य मिळू एक केले जातील आणि त्यावेळी हाच माणूस म्हणेल, “कुठे पळून जाऊ?” कदापि नाही, तेथे कोणतेही आश्रयस्थान असणार नाही. त्या दिवशी तुझ्या पालनकर्त्याच्या समोरच जाऊन थांबावे लागेल, त्या दिवशी मानवाला त्याचे सर्व पुढील व मागील केले व करविलेले दाखविले जाईल किंबहुना मानव स्वत:च स्वत:ला चांगल्या प्रकारे जाणतो. मग तो कितीही निमित्ते पुढे का करेना, हे पैगंबर (स.) या दिव्यबोधाला घाईघाईने पाठ करण्यासाठी आपल्या जीभेला चालना देऊ नका. याला पाठ करविणे व पठण करविणे आमच्यावर आहे, म्हणून जेव्हा आम्ही त्याचे पठण करीत असू त्यावेळी तुम्ही हे पठण लक्षपूर्वक ऐकत जा. मग याचा अर्थ समजावून देणेसुद्धा आमच्यावरच आहे. कदापि नाही खरी गोष्ट अशी आहे की, तुम्ही लोक त्वरित प्रप्त होणार्या गोष्टीशी (अर्थात इहलोकाशी) प्रेम ठेवता, आणि परलोक सोडून देता. त्या दिवशी काही चेहरे टवटवीत असतील आपल्या पालनकर्त्याकडे पाहात असतील. आणि काही चेहरे उदास असतील आणि समजत असतील की त्यांच्याशी कंबर खचविणारा व्यवहार होणार आहे. कदापि नाही जेव्हा प्राण कंठापर्यंत पोहोचेल आणि म्हटले जाईल की आहे का कोणी मंत्र-तंत्र करणारा, आणि मनुष्य समजून घेईल की ही जगाशी ताटातूट होण्य़ाची वेळ आहे, आणि पायात पाय अडकतील. तो दिवस असेल तुझ्या पालनकर्त्याकडे जाण्याचा. (१-३०)
परंतु त्याने ना खरे मानले आहे आणि ना नमाज अदा केली, तर खोटे ठरविले आणि पालटला आणि मग दिमाखात आपल्या घरवाल्याकडे निघाला, ही चाल तुझ्याच लायकीची आहे आणि तुलाच शोभा देते. होय, ही चाल तुझ्याच लायकीची आहे आणि तुलाच शोभा देते. (३१-३५)
काय मानवाने अस समज करून घेतला आहे की तो असाच व्यर्थ सोडून दिला जाईल? काय तो तुच्छ वीर्याचा थेंब नव्हता जो (गर्भाशयात) टपकविण्यात आला. मग तो एक गोळा बनला. मग अल्लाहने त्याचे शरीर बनविले व त्याचे अवयव व्यवस्थित केले मग त्यापासून पुरुष आणि स्त्रीचे दोन प्रकार बनविले. काय तो यासाठी समर्थ नाही की तो मृतांना जीवित करील? (३६-४०)
N/A
References : N/A
Last Updated : November 18, 2013
TOP