(मक्काकालीन, वचने ८९)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
हामीऽऽम. शपथ आहे या स्पष्ट ग्रंथाची. की आम्ही याला अरबी भाषेत कुरआन बनविला आहे. जेणेकरून तुम्ही लोकांनी ते समजावे. आणि वास्तविकत: हा ‘उम्मूल किताब (आदि ग्रंथ) मध्ये नमूद आहे, आमच्या येथील फार उच्च दर्जाचा आणि विवेकाने ओतप्रोत ग्रंथ. आता काय आम्ही तुमच्याकडून बेजार होऊन हा उपदेश-पाठ तुमच्याकडे पाठविणे सोडून द्यावे केवळ यासाठी की तुम्ही मर्यादा बाहेर गेलेले आहात? पूर्वी होऊन गेलेल्या जनसमुहात सुद्धा अनेकदा आम्ही नबी पाठविले आहेत. कधी असे घडले नाही की एखादा नबी त्यांच्याकडे आला आणि त्यांनी त्याचा उपहास केला नाही. मग जे लोक यांच्यापेक्षा कित्येक पटीने अधिक शक्तिशाली होते, त्यांनाआम्ही नष्ट केले, पूर्वीच्या राष्ट्रांची उदाहरणे येऊन गेली आहेत. (१-८)
जर तुम्ही या लोकांना विचारले की पृथ्वी आणि आकाशांना कोणी निर्माण केले आहे तर हे स्वत: म्हणतील, “यांना त्याच जबरदस्त सर्वज्ञ अल्लाहने निर्माण केले आहे.” तोच ना ज्याने तुमच्यासाठी या पृथ्वीला पाळणा बनविला आणि यात तुमच्यासाठी रस्ते बनविले जेणेकरून तुम्हाला आपल्या अंतिम ध्येयाचा मार्ग मिळू शकेल? ज्याने एका विशिष्ट प्रमाणांत आकाशांतून पाणी उतरविले आणि त्याच्याद्वारे मृत जमिनीला चैतन्य दिले, अशा प्रकारे एके दिवशी तुम्ही जमिनीतून बाहेर काढले जाल. तोच ज्याने ही सर्व जोडपी निर्माण केली, आणि ज्याने तुमच्यासाठी नौका व जनावरांना वाहन बनविले जेणेकरून तुम्ही त्यांच्या पाठीवर स्वार व्हावे आणि जेव्हा त्यांच्यावर स्वार व्हाल तेव्हा आपल्या पालनकर्त्याचे उपकार स्मरण करावे आणि म्हणावे की, “पवित्र आहे तो ज्याने आमच्यासाठी या गोष्टी अधीन केल्या. एरव्ही आम्ही यांना ताब्यात आणण्याचे सामर्ध्य बाळगत नव्हतो. आणि एके दिवशी आम्हाला आमच्या पालनकर्त्याकडे परतावयाचे आहे.” (९-१४)
(हे सर्वकाही जाणून व मानूनसुद्धा) या लोकांनी त्याच्या दासांपैकी काहींना त्याचा अंश बनवून टाकले. वस्तूस्थिती अशी आहे की मनुष्य उघड कृतघ्न आहे. (१५)
काय अल्लाहने आपल्या निर्मितीपैकी स्वत:साठीज मुलीची निवड केली आणि तुम्हाला मुले दिलीत? आणि स्थिती अशी आहे की ज्या संततीला हे लोक त्या परमदयाळू ईश्वराशी संबंधित करतात, तिच्या जन्माची शुभवार्ता जेव्हा खुद्द यांच्यापैकी कोणाला दिली जाते तेव्हा त्यांच्या तोंडावर काळिमा पसरतो आणि तो दु:खाने भरून जातो. काय अल्लाहच्या वाटयाला ती संतती आली जी दागदागिन्यांत पोसली जाते आणि वादविवादांत आपला मुद्दा पूर्णपणे स्पष्टसुद्धा करू शकत नाही? (१६-१८)
यांनी दूतांना, जे परमदयाळू ईश्वराचे दास आहेत, स्त्रिया ठरविले, यांनी त्यांची शरीर-रचना पाहिली आहे काय? यांची ग्वाही लिहून घेतली जाईल आणि यांना त्याचा जाब द्यावा लागेल. (१९)
हे म्हणतात, “जर परमदयाळू ईश्वराने इच्छिले असते (की आम्ही त्यांची उपासना करू नये) तर आम्ही कधीही त्यांना पूजले नसते.” हे या मामल्यातील हकीगत मुळीच जाणत नाहीत. केवळ तर्क-वितर्क लढवितात. काय आम्ही यापूर्वी यांना एखादा ग्रंथ दिला होता ज्याची सनद (फरिश्त्यांच्या पूजनासाठी) हे आपल्यापाशी ठेवतात, नव्हे तर हे म्हणतात की आम्हाला आमचे वाडवडील एका पद्धतीवर आढळले आहेत आणि आम्ही त्यांच्या पाऊलखुणांवर चालत आहोत. अशाप्रकारे तुमच्या अगोदर ज्या ज्या कुणा वस्तीत आम्ही एखादा भय दाखविणारा पाठविला, त्यातील सुखवस्तू लोकांनी हेच सांगितले की आम्हाला आमचे वाडवडील एका पद्धतीवर आढळले आहेत आणि आम्ही त्यांच्याच पाऊलखुणांचे अनुसरण करीत आहोत. प्रत्येक नबीने त्यांना विचारले, काय तुम्ही त्याच वहिवाटीवर चालत राहणार, मी जरी तुम्हाला त्या मार्गापेक्षा योग्यतम मार्ग दाखवावा, ज्यावर तुम्हाला आपले वाडवडील आढळले आहेत? त्यांनी सर्व प्रेषितांना हे उत्तर दिले की ज्या धर्माकडे बोलविण्यासाठी तुम्ही पाठविला गेला आहात आम्ही त्याचे नाकारणारे आहोत. सरतेशेवटी आम्ही त्यांचा समाचार घेतला आणि पहा की खोटे ठरविणार्यांचा शेवट कसा झाला. (२०-२५)
स्मरण करा ती वेळ जेव्हा इब्राहीस (अ.) ने आपल्या पित्याला व आपल्या समाजाला सांगितले होते की, “तुम्ही ज्यांची भक्ती करता माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. माझा संबंध केवळ त्याच्याशी आहे ज्याने मला निर्माण केले. तोच मला मार्गदर्शन करील.” आणि इब्राहीस (अ.) ने हेच वचन आपल्या पाठीमागे आपल्या वंशास देऊन गेला जेणेकरून त्यांनी त्याच्याकडे रुजू व्हावे. (असे असतानासुद्धा जेव्हा हे लोक इतरांची भक्ती करू लागले तेव्हा मी यांना नष्ट केले असे नाही.) तर मी यांना आणि यांच्या वाड्वडिलांना जीवन-सामग्री देत राहिलो, येथपावेतो की यांच्याजवळ सत्य आणि स्पष्टपणे सांगणारा पैगंबर (स.) आला. परंतु जेव्हा ते सत्य त्यांच्याजवळ आले तेव्हा यांनी सांगितले की ही तर जादू आहे आणि आम्ही ही मानण्यास नकार देतो. (२६-३०)
म्हणतात, हा कुरआन दोन्ही शहरांच्या मोठया माणसांपैकी कुणावर का अवतरला गेला नाही? तुम्या पालनकर्त्याच्या कृपेची वाटणी हे लोक मागतात काय? ऐहिक जीवनात तर यांच्या उपजीविकेची साधने तर आम्ही यांच्या दरम्यान वाटली आहे. आणि यांच्यापैकी काही लोकांना काही इतर लोकांवर अनेक पटीने श्रेष्ठत्व दिले आहे जेणेकरून यांनी एकमेकाकडून सेवा घ्यावी, आणि तुझ्या पालनकर्त्याची कृपा (म्हणजे प्रेषितत्व) त्या संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहे जी (यांचे श्रीमंत) गोळा करीत आहेत. जर अशी शंका नसती की सर्व लोक एकाच वहिवाटीचे होतील तर आम्ही परमदयाळू ईश्वराचा इन्कार करणार्यांच्या घरांची छते आणि त्यांचे जिने ज्याद्वारे ते आपल्या वरच्या मजल्यावर चढतात, आणि त्यांचे दरवाजे व त्यांची आसने ज्यांच्यावर ते तक्के लावून बसतात, सर्व चांदी आणि सोन्याचे बनविले असते. ही तर केवळ ऐहिक जीवनाची सामग्री आहे. आणि मरणोत्तर जीवन तर तुझ्या पालनकर्त्यापाशी केवळ ईशपरायणांसाठी आहे. (३१-३५)
जो मनुष्य रहमान (परमदयाळू) च्या स्मरणाची उपेक्षा करतो, आम्ही त्याच्यावर एक शैतान नियुक्त करतो आणि तो त्याचा मित्र बनतो. हे शैतान असल्या लोकांना सरळ मार्गावर येण्यापासून रोखतात, आणि ते आपल्या जागी असे समजतात की आम्ही नीट चाललो आहेत. सरतेशेवटी जेव्हा हा मनुष्य आमच्या येथे पोहचेल तेव्हा आपल्या शैतानाला म्हणेल, “अरेरे! तुझ्या आणि माझ्या दरम्यान पूर्व आणि पश्चिमचे अंतर असते! तू तर अत्यंत वाईट सोबती निघालास.” त्यावेळी या लोकांना सांगितले जाईल की जेव्हा तुम्ही अन्याय केलेला आहे तेव्हा ही गोष्ट आज तुम्हाला जरादेखील लाभदायक नाही की तुम्ही आणि तुमचे शैतान प्रकोपात सामायिक आहात. आता काय हे नबी (स.), तुम्ही बहिर्यांना ऐकवाल अथवा आंधळ्या आणि उघड पथभ्रष्टतेत गुरफटलेल्या लोकांना मार्ग दाखवाल? आता तर आम्हाला यांना शिक्षा करावयाची आहे, मग आम्ही तुम्हाला जगातून बोलावून का घेऊ नये. अथवा तुम्हाला डोळ्यांनी यांचा तो शेवट दाखवावा; ज्याचे आम्ही यांना वचन दिले आहे, आम्हाला यांच्यावर पूर्ण प्रभूत्व प्राप्त आहे. काहीही झाले तरी तुम्ही तो ग्रंथ दृढतापूर्वक धरून असा जो दिव्यबोधाने तुमच्याकडे पाठविला गेला आहे, खचितच तुम्ही सरळ मार्गावर आहात. वस्तुस्थिती अशी आहे की हा ग्रंथ तुमच्यासाठी आणि तुमच्या राष्ट्रासाठी एक फार मोठा सन्मान आहे, आणि लवकरच तुम्हा लोकांना याचा जाब द्यावा लागेल. तुमच्या पूर्वी आम्ही जितके प्रेषित पाठविले होते, त्या सर्वांना विचारून पहा, काय आम्ही परमदयाळू ईश्वराशिवाय काही इतर उपास्यसुद्धा नियुक्त केले होते की त्यांची भक्ती केली जावी? (३६-४५)
आम्ही मूसा (अ.) याला आपल्या संकेतांसमवेत फिरऔन आणि त्याच्या सरदारांकडे पाट्ठविले आणि त्याने जाऊन सांगितले की मी विश्वपालनकर्त्याचा प्रेषित आहे. मग जेव्हा त्याने आमचे संकेत त्यांच्यासमोर प्रस्तुत केले तेव्हा हे थट्टा उडवू लागले. आम्ही एकावर एक असे संकेत त्यांना दाखवीत गेलो की जे पहिल्यापेक्षा वरचढ होते आणि आम्ही त्यांना प्रकोपात धरले की त्यांनी आपल्या वर्तनापासून परावृत्त व्हावे. प्रत्येक प्रकोपाच्या वेळी ते सांगत असत, हे जादूगार! आपल्या पालनकर्त्याकडून जे पद तुला प्राप्त आहे त्याच्या आधारे आमच्यासाठी त्याच्याकडे प्रार्थना कर, आम्ही जरूर सरळ मार्गावर येऊ. परंतु ज्याक्षणी आम्ही त्यांच्यावरून प्रकोप ह्टवीत असू ते आपल्या शब्दांपासून फिरत असत. एके दिवशी फिरऔनने आपल्या राष्ट्रांदरम्यान पुकारा करून सांगितले, “लोकहो, ‘मिस्र’ (इजिप्त) ची बादशाही माझी नव्हे काय, आणि हे कालवे माझ्याखालून वाहात नाहीत? तुम्हा लोकांना दिसत नाही काय? मी श्रेष्ठतर आहे की हा मनुष्य जो अपमानित आणि हीन आहे आणि आपले म्हणणेसुद्धा स्पष्ट करून सांगू शकत नाही? याच्यावर सुवर्ण कंकण का उतरविले गेले नाहीत? अथवा ईशदूतांचे एक पथक त्याच्या दिमतीला का आले नाही?” (४६-५३)
त्याने आपल्या राष्ट्राला हलके समजले आणि त्यांनी त्याचे म्हणणे मान्य केले, वास्तविकत: ते होतेच अवज्ञाकारी लोक. सरतेशेवटी जेव्हा त्यांनी आम्हाला क्रोधित केले तेव्हा आम्ही त्यांच्यावर सूड उगविला आणि त्यांना एकत्रित बुडवून टाकले. आणि नंतरच्या लोकांसाठी अग्रगामी व बोधप्रद उदाहरण बनवून सोडले. (५४-५६)
आणि ज्याक्षणी मरयम पुत्र (अ.) चे उदाहरण दिले गेले, तुमच्या लोकसमूहाने त्यावर हास्यकल्लोळ माजविला. आणि म्हणू लागले की आमचे उपास्य चांगले आहेत की तो? हे उदाहरण त्यांनी तुमच्यासमोर केवळ वितंडवादासाठी आणले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की हे आहेतच भांडखोर लोक. मरयम पुत्र (अ.) याशिवाय अन्य काहीच नव्हता की एक दास होता ज्याला आम्ही अनुग्रहित केले आणि बनीइस्राईलसाठी त्याला आमच्या सामर्थ्याचा एक नमूना बनविले. आम्ही जर इच्छिले तर तुमच्यापासून ईशदूत निर्माण करू ते पृथ्वीवर तुमचे उत्तराधिकारी होतील आणि तो (अर्थात मरयम पुत्र) वास्तविकरत: पुनरुत्थानाची एक खूण होय, म्हणून तुम्ही त्यात संशय करू नका आणि माझे म्हणणे मान्य करा, हाच सरळ मार्ग आहे, असे घडू नये की शैतानाने तुम्हाला त्यापासून रोखावे, तो तुमचा उघड शत्रू आहे. आणि जेव्हा ईसा (अ.) स्पष्ट संकेत घेऊन आला होता तेव्हा तो म्हणाला होता की, “मी तुमच्याजवळ विवेक घेऊन आलो आहे, आणि अशा कारणास्तव आलेलो आहे की तुम्हावर त्या काही गोष्टींच्या हकीगतींचा उलगडा करावा, ज्यात तुम्ही मतभेद दर्शवीत आहात. म्हणून तुम्ही अल्लाहचे भय बाळगा आणि माझे आज्ञापालन करा. वस्तुस्थिती अशी आहेकी अल्लाहच माझा पालनकर्ता आहे आणि तुमचा सुद्धा. त्याचीच तुम्ही उपासना करा, हाच सरळ मार्ग आहे.” परंतु (त्याची अशी स्पष्ट शिकवण असतानासुद्धा) लोकांनी आपापसांत मतभेद दर्शविले, तर विनाश आहे अन्याय करणार्या त्या लोकांचा यातनामय शिक्षेच्या दिवशी. (५७-६५)
काय हे लोक आता केवळ या गोष्टीच्या प्रतीक्षेत आहेत की अकस्मात यांच्यावर पुनरुत्थान यावे आणि यांना कळूसुद्धा नये? तो दिवस जेव्हा येईल तेव्हा ईशभीरूंव्यतिरिक्त इतर सर्व मित्र एकमेकाचे शत्रू बनतील. त्या दिवशी त्या लोकांना, ज्यांनी आमच्या वचनांवर श्रद्धा ठेवली होती आणि आज्ञाधारक बनून राहिले होते, सांगितले जाईल की, “हे माझ्या दासांनो, आज तुमच्यासाठी कोणतेही भय नाही तुम्हाला कोणतेही दु:ख शिवणार नाही. प्रविष्ट व्हा स्वर्गामध्ये, तुम्ही आणि तुमच्या पत्नीं, तुम्हाला आनंदित केले जाईल.” त्यांच्यासमोर सोन्याच्या थाळी आणि पेले फिरविले जातील. आणि प्रत्येक मनपसंत व आकर्षक वस्तू तेथे उपलब्ध असेल. त्यांना सांगितले जाईल, “तुम्ही आता येथे सदैव राहाल. तुम्ही या स्वर्गाचे वारस आपल्या त्या कर्मामुळे बनला आहात, जे तुम्ही जगात करीत राहिलात. तुमच्यासाठी येथे विपुल प्रमाणांत फळफळावळ उपलब्ध आहे जी तुम्ही खाल.” उरले अपराधी तर ते सदैव नरकाच्या प्रकोपात गुरफटलेले राहतील, कधीही त्यांच्या प्रकोपात घट होणार नाही आणि ते त्यात निराश पडलेले असतील. त्यांच्यावर आम्ही अन्याय केला नाही तर ते स्वत:च आपल्यावर अन्याय करीत राहिले. ते पुकारतील, “हे मालका, तुझ्या पालनकर्त्याने आम्हाला निकालात काढले तर चांगले होईल.” तो उत्तर देईल, “तुम्ही असेच पडून राहाल, आम्ही तुमच्याजवळ सत्य घेऊन आलो होतो परंतु तुमच्यापैकी पुष्कळशांना सत्यच अप्रिय होते.” (६६-७८)
या लोकांनी एखादे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे काय? बरे तर मग आम्हीसुद्धा एक निर्णय घेतो. काय यांनी असा समज करून घेतला आहे की आम्ही यांच्या गुप्त गोष्टी आणि यांच्या कानगोष्टी ऐकत नाही? आम्ही सर्वकाही ऐकत आहोत आणि आमचे दूत यांच्याजवळ नोंद घेत आहेत. (७९-८०)
यांना सांगा, “जर खरोखर रहमान (परमदयाळू) ची एखादी संतती असती तर सर्वांच्या अगोदर उपासना करणारा मीच असतो. “पवित्र आहे आकाशांचा व पृथ्वीचा शासक अर्श (राजसिंहासन) चा स्वामी, त्या सर्व गोष्टींपासून जे हे लोक त्याच्या संबंधित करतात. ठीक, यांना आपल्या मिथ्या कल्पनेत गर्क आणि आपल्या खेळांत मग्न राहू द्या, येथपावेतो की हे आपला तो दिवस पाहतील ज्याचे यांना भय दाखविले जात आहे. (८१-८३)
तोच एकटा आकाशांतही ईश्वर आहे आणि पृथ्वीवरही ईश्वर, आणि तोच बुद्धिमान आणि सर्वज्ञ आहे. फार उच्च व श्रेष्ठतर आहे तो ज्याच्या ताब्यात पृथ्वी व आकाशांचे व त्या प्रत्येक वस्तूचे राज्य आहे जे पृथ्वी व आकाशांच्या दरम्यान आढळते. आणि तोच पुनरुत्थानाच्या घटकेचे ज्ञान ठेवतो. आणि त्याच्याकडे तुम्ही सर्व परतविले जाणार आहात. (८४-८५)
त्याला सोडून हे लोक ज्यांचा धावा करतात ते कोणत्याही शिफारसीचा अधिकार बाळगत नाहीत, याव्यतिरिक्त की एखाद्या माहितीच्या आधारे सत्याची साक्ष देतील. (८६)
आणि जर तुम्ही यांना विचारले की यांना कोणी निर्माण केले आहे तर हे स्वत: म्हणतील की अल्लाहने. मग कोठून हे फसविले जात आहेत, शपथ आहे पैगंबर (स.) च्या या कथनाची की हे पालनकर्त्या, हे ते लोक होत जे मान्य करीत नाहीत. बरे, हे नबी (स.), यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि सांगा की सलाम तुम्हाला, लवकरच यांना कळून येईल. (८७-८९)