(मक्काकालीन, वचने ३७)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
हामीऽऽम. या ग्रंथाचे अवतरण अल्लाहकडून आहे जो जबरदस्त आणि बुद्धिमान आहे. (१-२)
वस्तुस्थिती अशी आहे की, आकाशांत व पृथ्वी अगणित संकेत आहेत श्रद्धा ठेवणार्यांसाठी आणि तुमच्या स्वत:च्या निर्मितीत, आणि त्या जनावरांत ज्यांना अल्लाह (पृथ्वीवर) पसरवीत आहे, मोठे संकेत आहेत त्या लोकांसाठी जे विश्वास करणारे आहेत, आणि रात्र व दिवसांतील फरक व भिन्नतेत, आणि त्या उपजीविकेत जी अल्लाह आकाशांतून उतरवितो, तिच्याद्वारे मृत जमिनीला जिवंत करतो. आणि वार्याच्या भ्रमणांत पुष्कळसे संकेत आहेत त्या लोकांसाठी जे बुद्धीचा उपयोग करतात. हे अल्लाहचे संकेत आहेत ज्यांचे आम्ही तुमच्यासमोर ठीकठीक वर्णन करीत आहोत. आता शेवटी अल्लाह आणि त्याच्या वचनांनंतर अन्य कोणती गोष्ट आहे जिच्यावर हे लोक श्रद्धा ठेवतील. (३-४)
विनाश आहे त्या प्रत्येक खोटारडया, दुराचारी माणसासाठी, ज्याच्यासमोर अल्लाहच्या वचनांचे पठण होते आणि तो ते ऐकतो, मग पूर्ण गर्वानिशी आपल्या सत्याच्या इन्कारावर अशाप्रकारे अडून बसतो जणूकाही त्याने ते ऐकलेच नाहीत. अशा माणसाला यातनादायक प्रकोपाची शुभवार्ता ऐकवा. आमच्या संकेतांपैकी एखादी गोष्ट जेव्हा त्याला कळते तेव्हा तो तिला थट्टेचा विषय बनवितो. अशा सर्व लोकांसाठी अपमानजनक प्रकोप आहे. त्यांच्यापुढे नरक आहे. जे काही त्यांनी जगात कमविले आहे त्यापैकी कोणतीही वस्तू त्यांच्या कोणत्याही उपयोगी पडणार नाही, त्यांचे ते वालीसुद्धा त्यांच्यासाठी काही करू शकणार नाहीत: ज्यांना त्यांनी अल्लाहला सोडून आपले संरक्षक बनवून ठेवले आहे, त्यांच्यासाठी महान प्रकोप आहे. (५-१०)
हा कुरआन सर्वस्वी मार्गदर्शन आहे, आणि त्या लोकांसाठी भयंकर यातनादायक प्रकोप आहे ज्यांनी आपल्या पालनकर्त्याचे संकेत मानण्यास नकार दिला. (११)
तो अल्लाहच तर आहे ज्याने तुमच्यासाठी समुद्रास अधीन केले जेणेकरून त्याच्या हुकूमाने नौका त्याच्यात चालतील आणि तुम्ही त्याचा कृपाप्रसाद शोधावा व कृतज्ञ बनावे. त्याने पृथ्वी व आकाशांतील सर्वच वस्तू तुमच्या अधीन केल्या. सर्वकाही आपल्या जवळून, यात मोठे संकेत आहेत त्या लोकांसाठी जे गंभीरतापूर्वक विचार करणारे आहेत. (१२-१३)
हे पैगंबर (स.), श्रद्धावंतांना सांगा की जे लोक अल्लाहकडून वाईट दिवस येण्याची कसलीही संभावना मानीत नाहीत, त्यांच्या कृत्यांकडे दुर्लक्ष करा. जेणेकरून अल्लाहने खुद्द एका समुहाला त्याच्या कमाईचा बदला द्यावा. जो कोणी सत्कृत्ये करील स्वत:साठीच करील, आणि जो वाईट करील तो स्वत:च त्याचे दुष्परिणाम भोगेल. नंतर जायचे तर सर्वांना आपल्या पालनकर्त्याकडेच आहे. (१४-१५)
यापूर्वी बनीइद्राईलना आम्ही ग्रंथ व हुकूम आणि प्रेषितत्य प्रदान केले होते. त्यांना आम्ही उत्तम जीवनसायुग्रीने उपकृत केले. जगभरातील लोकांवर त्यांना श्रेष्ठत्व प्रदान केले, आणि धर्माच्या बाबतीत त्यांना स्पष्ट आदेश दिले. मग जे मतभेद त्यांच्या दरम्यान उद्भवले ते (अज्ञानामुळे नव्हे तर) ज्ञान प्राप्त झाल्यानंतर उद्भवले आणि यामुळे झाले की ते आपापसांत एक दुसर्यावर आगळीक करू इच्छित होते, अल्लाह पुनरुत्थानाच्या दिवशी त्या मामल्यांचे निर्णय देईल ज्यात ते मतभेद दर्शवीत राहिले आहेत, यानंतर आता हे पैगंबर (स.), आम्ही तुम्हाला धर्माच्या बाबतीत एका स्पष्ट राजमार्गा (शरीअत) वर कायम केले आहे. म्हणून तुम्ही त्यावर चाला आणि त्या लोकांच्या इच्छेचे अनुसरण करू नका ज्यांना ज्ञान नाही. अल्लाहच्या विरूद्ध ते तुमच्या काहीही उपयोगी पडू शकत नाहीत. अत्याचारी लोक एकमेकांचे साथीदार आहेत, ईशपरायणांचा साथीदार अल्लाह आहे. हे डोळसांचे प्रकाश आहेत सर्व लोकांसाठी आणि मार्गदर्शन आणि कृपा आहे त्या लोकांसाठी जे विश्वास करतील. (१६-२०)
काय ते लोक ज्यांनी अपकृत्ये केली आहेत, असा समज करून बसले आहेत की आम्ही त्यांना, आणि श्रद्धावंतांना व सत्कृत्ये करणार्यांना एकसमान बनवू की त्यांचे जिणे व मरणे एकसारखे व्हावे? फार वाईट हुकूम आहे जे हे लोक लावीत आहेत. अल्लाहने तर आकाशांना व पृथ्वीला सत्याधिष्ठित निर्माण केले आहे, आणि अशासाठी केले आहे की प्रत्येकाला त्याच्या कमाईचा बदला दिला जावा. लोकांवर अन्याय कदापि केला जाणार नाही. (२१-२२)
मग काय तुम्ही कधी त्या माणसाच्या स्थितीचाही विचार केला ज्याने आपल्या मनोवासनेला आपला उपास्य बनविला, आणि अल्लाहने ज्ञान असतानासुद्धा त्याला पथभ्रष्टतेत फेकून दिले, आणि त्याच्या ह्रदयावर व कानावर मोहर लावली आणि त्याच्या डोळ्यावर पडदा घातला? अल्लाहव्यतिरिक्त आता अन्य कोण आहे जो त्याला मार्गदर्शन करील? काय तुम्ही लोक कसलाही बोध घेत नाही? (२३)
हे लोक म्हणतात की, “जीवन केवळ हेच आमचे जगातील जीवन होय, येथेच आमचे मरणे व जगणे आहे, आणि कालचक्राव्यतिरिक्त कोणतीही गोष्ट नाही जी आम्हाला नष्ट करील. वास्तविक याबाबतीत यांचेजवळ कोणतेच ज्ञान नाही. हे केवळ कल्पनेच्या आघारे या गोष्टी करतात. आणि जेव्हा आमची स्पष्ट वचने यांना ऐकविली जातात. तेव्हा याच्याजवळ कोणताही युक्तिवाद याशिवाय असणार नाही की उठवून आणा आमच्या वाडवडीलांना जर तुम्ही खरे असाल. हे पैगंबर (स.), यांना सांगा, अल्लाहच तुम्हाला जीवन प्रदान करतो, मग तोच तुम्हाला मृत्यू देईल. मग तोच तुम्हाला त्या पुनरुत्थानाच्या दिवशी एकत्रित करील ज्याच्या येण्यात कोणताही संदेह नाही, परंतु बहुतेक लोक जाणत नाहीत. पृथ्वी आणि आकाशांचे राज्य अल्लाहचेच आहे, आणि त्या दिवशी पुनरूत्थानाची घटका येऊन ठेपेल त्या दिवशी मिथ्यावादी तोटयात येतील. (२४-२७)
त्यावेळी तुम्ही प्रत्येक समूहाला गुडघे टेकून पडलेले पाहाल. प्रत्येक समूहाला हाक दिली जाईल की त्याने यावे व आपली कृति-नोंद पाहावी. त्यांना सांगितले जाईल, “आज तुम्ही लोकांना त्या कृत्यांचा बदला दिला जाईल जे तुम्ही करीत राहिला होता. ही आम्ही तयार करविलेली कृति-नोंद आहे जी तुमच्यावर ठीकठीक साक्ष देत आहे, जे जे काही तुम्ही करीत होता, ते आम्ही लिहवीत जात होतो.” मग ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली होती आणि सत्कृत्ये करीत राहिले होते, त्यांना त्यांना पालनकर्ता आपल्या कृपेत दाखल करील आणि हेच उज्ज्वल यश आहे. आणि ज्या लोकांनी द्रोह केला होता (त्यांना सांगितले जाईल), “माझी वचने तुम्हाला ऐकविली जात नव्हती काय? परंतु तुम्ही गर्व केला आणि अपराधी बनून राहिलात, आणि जेव्हा सांगितले जात होते की अल्लाहचे वचन सत्याधिष्ठित आहे व पुनरुत्थानाच्या येण्यात कोणतीही शंका नाही तेव्हा तुम्ही सांगत होता की आम्हाला माहीत नाही की पुनरुत्थान काय असते, आम्ही तर काहींशी कल्पनाच तेवढी बाळगतो, खात्री आम्हाला नाही.” त्यावेळी त्यांच्यावर त्यांच्या कृत्यांचे अरिष्ट उघड होईल आणि ते त्याच गोष्टीच्या फेर्यात येतील जिची ते टिंगल-टवाळी करीत होते. आणि त्यांना सांगितले जाईल की, “आज आम्हीसुद्धा त्याचप्रमाणे तुम्हाला विसरून जातो ज्याप्रमाणे तुम्हाला विसरून जातो ज्याप्रमाणे तुम्ही या दिवसाची भेट विसरून गेला होता. तुमचे ठिकाण आता नरक आहे आणि कोणीही तुम्हाला मदत करणारा नाही. असा तुमचा शेवट यामुळे झाला की तुम्ही अल्लाहच्या संकेतांना थट्टेचा विषय बनवित होता आणि ऐहिक जीवनाने तुमची फसगत केली होती, म्हणून आज हे लोक नरकामधून काढलेही जाणार नाहीत आणि यांना सांगितलेही जाणार नाही की क्षमायाचना करून आपल्या पालनकर्त्याला प्रसन्न करा.” (२८-३५)
म्हणून प्रशंसा अल्लाहसाठीच आहे जो पृथ्वी आणि आकाशांचा स्वामी आणि सकल जगवासियांचा पालनकर्ता आहे. पृथ्वी आणि आकाशांत मोठेपणा त्याच्यासाठीच आहे आणि तोच जबरदस्त आणि बुद्धिमान आहे. (३६-३७)