सूरह - अल्लैल
कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.
(मक्काकालीन, वचने २१)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
शपथ आहे रात्रीची जेव्हा ती पसरते आणि दिवसाची जेव्हा तो प्रकाशमान होतो, आणि त्या अस्तित्वाची ज्याने नर आणि मादी निर्माण केली, वस्तुत: तुम्हा लोकांचे प्रयत्न विभिन्न प्रकारचे आहेत. तर ज्याने (ईश्वराच्या मार्गात) धन दिले आणि (ईश्वराच्या अवज्ञेपासून) दूर राहिला आणि भल्या गोष्टींना खरे मानले, त्याला आम्ही सोप्या मार्गासाठी सवलत देऊ. आणि ज्याने कंजुषपणा केला आणि (आपल्या ईश्वराशी) बेपर्वाई दाखविली आणि भल्या गोष्टींना खोटे ठरविले, त्याला आम्ही कठीण मार्गासाठी सवलत देऊ. आणि त्याची मालमत्ता शेवटी त्याच्या काय उपयोगी पडेल जेव्हा की तो नाश पावेल? (१-११)
नि:संदेह मार्ग दाखविणे आमच्यावर आहे, आणि खरे पाहता परलोक आणि इहलोक, दोन्हींचे स्वामी आम्हीच आहोत. तर मी तुम्हाला खबरदार केले आहे भडकत्या अग्नीपासून. त्यात होरपळणार नाही परंतु तो अत्यंत दुर्दैवी ज्याने खोटे ठरविले आणि तोंड फिरविले, आणि त्यापासून दूर ठेवला जाईल तो अत्यंत पापभिरू, जो निर्मल होण्यासाठी आपले धन देतो, त्याच्यावर कुणाचेही काही उपकार नाहीत. ज्याचा बदला त्याने द्यायला हवा. तो तर केवळ आपल्या उच्चतर पालनकर्त्याच्या प्रसन्नतेच्या प्राप्तीसाठी हे कार्य करतो. आणि जरूर तो (त्यावर) प्रसन्न होईल. (१२-२१)
Last Updated : November 18, 2013
TOP