(मदीनाकालीन, वचने ७८)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
लोकहो. आपल्या पालनकर्त्याच्या कोपापासून स्वत:ला वाचवा, वस्तुस्थिती अशी आहे की पुनरुत्थानाचा हादरा महा (भयंकर) गोष्ट आहे. ज्या दिवशी तुम्ही पाहाल. की प्रत्येक दूध पाजणारीला आपल्या दूध पिणार्या बाळाचा विसर पडेल. प्रत्येक गर्भवतीचा गर्भपात होईल. आणि लोक तुम्हाला नशेत दिसतील, वास्तविक पाहता त्यांनी नशा केली नसेल तर तो अल्लाहचा भयंकर प्रकोपच असेल. (१-२)
काही लोक असे आहेत जे ज्ञानाविना अल्लाहसंबंधी वाद घालतात आणि प्रत्येक उद्दाम-शैतानचे अनुकरण करू लागतात. वस्तुत: त्याच्या तर नशिवातच असे लिहिले आहे की जो त्याला मित्र बनवील त्याला तो पथभ्रष्ट करणारच आणि नरकाच्या प्रकोपाचा मार्ग दाखवील. लोकहो, जर तुम्हाला मरणोत्तर जीवनासंबंधी काही शंका असेल तर तुम्हाला माहीत असले पाहिजे की आम्ही तुम्हाला मातीपासून निर्मिले आहे, मग वीर्यापासून, मग रक्ताच्या गुठळीपासून, मग मांसाच्या आधारयुक्त आणि आकारहीन तुकडयापासून, जेणेकरून तुमच्यावर सत्य स्पष्ट करावे. आम्ही ज्या (वीर्या) ला इच्छितो एका विशिष्ट कालावधीपर्यंत गर्भाशयात थांबवून ठेवतो, मग तुम्हाला एका अर्भकाच्या रूपात काढून आणतो (मग तुमचे संगोपन करतो) जेणेकरून तुम्ही आपले तारूण्य गाठावे, आणि तुमच्यापैकी कोणी अगोदरच परत बोलाविला जातो आणि कोणी निकृष्टतम वयाकडे परतविला जातो जेणेंकरून सर्वकाही जाणून घेतल्यानंतर मग काहीही न कळण्याची अवस्था प्राप्त होते. आणि तुम्ही पाहता की जमीन कोरडी पडली आहे मग ज्याक्षणी आम्ही तिच्यावर पाऊस पाडला तेव्हा अकस्मात ती तरारून गेली व फुलली आणि तिने सर्व प्रकारच्या नयनरम्य वनस्पती उगविण्यास प्रारंभ केला. हे सर्वकाही या कारणामुळे आहे की अल्लाहच सत्य आहे, आणि तो मृतांना जीवित करतो व तो सर्व गोष्टींवर प्रभुत्व राखतो. आणि हे (या गोष्टीचे प्रमाण आहे) की पुनरुत्थानाची घटका आल्याशिवाय राहणार नाही, यामध्ये कोणत्याही शंकेला वाव नाही. आणि अल्लाह अवश्य त्या लोकांना उठवील जे कबरींमध्ये पोहचलेले आहेत. (३-७)
काही अन्य लोक असे आहेत जे कोणत्याही ज्ञान आणि मार्गदर्शन व प्रकाश प्रदान करणार्या ग्रंथाविना ताठ मान करून अल्लाहच्या बाबतीत वाद घालतात, जेणेकरून लोकांना अल्लाहच्या मार्गापासून भ्रष्ट करावे, अशा व्यक्तीसाठी जगात नामुष्की आहे आणि पुनरुत्थानाच्या दिवशी आम्ही त्याला अग्नीच्या प्रकोपाची चव चाखवू. हे आहे तुझे ते भविष्य जे तुझ्या स्वत:च्या हातांनी तुझ्याकरिता तयार केले आहे, एरव्ही अल्लाह आपल्या दासावर अन्याय करणारा नाही. (८-१०)
आणि लोकांत कोणी असाही आहे जो काठावर राहून अल्लाहची भक्ती करतो, जर लाभ झाला तर संतुष्ट होते आणि जर एखादे संकट आले तर परत फिरतो, त्याचे इहलोकही गेले व परलोकदेखील, हा आहे उघड तोटा. मग तो अल्लाहला सोडून त्यांचा धावा करतो जे त्याला नुकसानही पोहचवू शकत नाहीत व फायदाही नाही. ही आहे मार्गभ्रष्टतेची परिसीमा तो त्यांच्या धावा करतो त्यांचा तोटा त्यांच्या फायद्यापेक्षा अधिक आहे. निकृष्टतम आहे त्याचा वाली आणि अत्यंत वाईट आहे त्याचा सोबती. (याउलट) अल्लाह त्या लोकांना ज्यांनी श्रद्धा ठेवली व सत्कृत्ये केली, निश्चितच अशा स्वर्गामध्ये दाखल करील ज्यांच्याखालून कालवे वाहात असतील, अल्लाह जे काही इच्छितो ते करतो. ज्या व्यक्तीची कल्पना अशी असेल की अल्लाह इहलोकात व परलोकात त्याला काहीही मदत करणार नाही तर त्याने एखाद्या दोरीद्वारे आकाशापर्यंत पोहचून भगदाड पाडावे. मग पाहावे की त्याची युक्ती एखाद्या अशा गोष्टीला रद्द करू शकते का जी त्याला अप्रिय आहे. (११-१५)
अशाच उघड उघड गोष्टीसह आम्ही या कुरआनला अवतरित केले आहे, आणि अल्लाह ज्याला इच्छितो त्याला मार्गदर्शन करतो. (१६)
जे लोक श्रद्धावंत आहेत आणि जे यहुदी आहेत तसेच साबी, ख्रिस्ती व मजूश (अग्नीपूजक आहेत) तसेच जे अनेकेश्वरवादी आहेत त्या सर्वांच्या दरम्यान अल्लाह निर्णय करील पुनरुत्थानाच्याच्या दिवशी. प्रत्येक गोष्ट अल्लाहच्या दृष्टीत आहे. तुम्ही पहात नाही की जे काही आकाशात आहे आणि जे पृथ्वीवर आहे तसेच सूर्य, चंद्र, तारे, पर्वत आणि वृक्ष व जनावरे आणि बहुतेक तोक देखील अल्लासमोर नतमस्तक होत आहेत बरेचसे ते लोकदेखील आहेत जे प्रकोपास पात्र झाले आहेत? आणि ज्याला अल्लाहने अपमानित व लज्जित केले त्याला पुन्हा कोणी मान देणारा नाही, अल्लाह जे काही इच्छितो ते करतो. (१७-१८)
हे दोन पक्ष आहेत ज्यांच्या दरम्यान आपल्या पालनकर्त्यासंबंधी वितंडवाद आहे, यांच्यापैकी ते लोक ज्यांनी सत्य नाकारले, त्यांच्यासाठी अग्नीचा पोषाख तयार केला गेला आहे. त्यांच्या डोक्यावर उकळते पाणी टाकले जाईल ज्यामुळे त्यांची केवळ त्वचाच नव्हे तर पोटाच्या आतील भागदेखील वितळेल आणि त्यांचा समाचार घेण्यासाठी लोखंडी घण असतील. जेव्हा जेव्हा ते घाबरून नरकामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील परत त्यातच ढकलून दिले जातील की चाखा आता जळण्याच्या शिक्षेची चव. (दुसरीकडे) ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली आणि ज्यांनी सत्कृत्ये केली त्यांना अल्लाह अशा स्वर्गांमध्ये दाखल करील ज्यांच्या खालून कालवे वाहात असतील. तेथे ते सोन्याच्या कंकणांनी आणि मोत्यांनी विभूषित केले जातील. आणि त्यांचे पोषाख रेशमाचे असतील. त्यांना पवित्र गोष्ट स्वीकारण्याची सुबुद्धी प्रदान केलेली आहे आणी त्यांना स्तवनीय गुणसंपन्न ईश्वराचा मार्ग दाखविला गेला आहे. (१९-२४)
ज्या लोकांनी द्रोह केला आणि जे (आज) अल्लाहच्या मार्गापासून प्रतिबंध करीत आहेत आणि त्या आदरणीय मास्जिदच्या यात्रेत अडचण आणीत आहेत जी आम्ही सर्व लोकांसाठी बनविली आहे, ज्यात स्थानिक रहिवाशी बाहेरून येणार्यांचे हक्क समान आहेत. (त्यांचे वर्तन निश्चितच शिक्षेस पात्र आहे.) या (आदरणीय मस्जिद) मध्ये जो कोणी सत्यापासून दूर जाऊन अत्याचाराचा मार्ग अवलंबील त्याला आम्ही यातनादायक प्रकोपाची चव चाखवू. (२५)
आठवा ती वेळ जेव्हा आम्ही इब्राहीम (अ.) साठी या घरा (काबागृहा) ची जागा योजिली होती (या आदेशासह) की माझ्यासमवेत कोणासही भागीदार करू नका आणि माझ्या घराला पवित्र प्रदक्षिणा घालणार्या, उभे राहणार्या आणि झुकणार्या व नतमस्तक होणार्यांसाठी पवित्र ठेवा, आणि लोकांत हजची आम घोषणा करा की त्यांनी तुमच्यापाशी प्रत्येक लांबवरच्या ठिकाणाहून पायी व उंटावर स्वार होऊन यावे, म्हणजे त्यांनी ते फायदे पाहावेत जे येथे त्यांच्यासाठी ठेवलेले आहेत. आणि काही ठराविक दिवशी त्या जनावरांवर अल्लाहचे नाव घ्यावे बळी द्यावे (कुर्बानी करावी) जी त्याने त्यांना प्रदान केलेली आहेत, स्वत:देखील खावे आणि अडचणीत असलेल्या वंचित लोकांनासुद्धा द्यावे. मग आपली अस्वच्छता दूर करावी आणि आपले नवस फेडावे आणि या प्राचीन गृहाची प्रदक्षिणा करावी. (२६-२९)
असा होता (काबा उभारण्याचा उद्देश) आणि जो कोणी अल्लाहने स्थापिलेल्या आदराचा मान राखील तर हे त्याच्या पालनकर्त्यापाशी त्याच्या स्वत:साठीच उत्तम आहे, आणि तुमच्यासाठी पाळीव जनावरे वैध ठरविली गेलीत त्या जनावरांखेरीज जे तुम्हाला सांगितले गेले आहेत. म्हणून मूर्तीसारव्या घृणास्पद गोष्टींपासून अलिप्त राहा. खोटया गोष्टी वर्ज्य करा. एकाग्र होऊन अल्लाहचे दास बना, त्याच्याबरोबर कोणासही भागीदार बनवू नका. आणि जो कोणी अल्लाहबरोबरज अन्य कुणास सहभागी करील तर तो जणू काही आकाशावरून कोसळेल. एक तर त्याला पक्षी उचलून नेतील अथवा वारा त्याला अशा जागी नेऊन फेकील जेथे त्याच्या चिंधडया उडतील. (३०-३१)
ही आहे वस्तुस्थिती (ती समजून घ्या) आणि जो अल्लाहच्या नेमून दिलेल्या प्रतिकांचा आदर करील ही ह्रदयाची ईशपरायणता. आहे. (३२)
तुम्हाला एका ठराविक मुदतीपर्यंत त्या (बळी देण्याच्या जनावरा) पासून लाभ घेण्याला हक्क आहे, मग त्यांची (बळी देण्याची) जागा याच प्राचीन घरजवळ आहे. (३३)
प्रत्येक जनसमूहासाठी आम्ही बळी देण्यासंबंधीचा कायदा ठरवून दिला आहे जेणेकरून (त्या जनसमूहाच्या) लोकांनी त्या जनावरावर अल्लाहचे नाव घ्यावे जी त्याने त्यांना प्रदान केलेली आहेत. (या निरनिराळ्य़ा पद्धतीत उद्देश एकच आहे) तर तुमचा परमेश्वर एकच परमेश्वर आहे आणि त्याचेच तुम्ही आज्ञाधारक बनून राहा, आणि हे पैगंबर, शुभवार्ता द्या, विनम्रतेचा अवलंब करणार्यांना. ज्यांची अवस्था अशी आहे की अल्लाहचा उल्लेख ऐकताच त्याच्या ह्रदयांचा थरकाप होतो, जे काही संकट त्यांच्यावर येते त्यावर ते संयम ठेवतात. नमाज कायम करतात आणि जी काही उपजीविका आम्ही त्यांना दिली आहे त्यातून खर्च करतात. आणि (बळीच्या) उंटांना आम्ही तुमच्यासाठी अल्लाहच्या संकेतचिन्हांमध्ये सामील केले आहे. तुमच्यासाठी त्यांच्यात कल्याण आहे. म्हणून त्यांना उभे करून त्यांच्यावर अल्लाहचा नामोच्चार करा, आणि जेव्हा (बळी दिल्यावर) त्यांच्या पाठी जमिनीवर स्थिरावतील तेव्हा त्यातून स्वत: खा आणि त्यांनादेखील खाऊ घाला जे वंचित राहिले आहेत आणि त्यांनासुद्धा जे गरजवंत आहेत. या जनावरांना आम्ही अशा प्रकारे तुमच्यासाठी अधीन केले आहे की जेणेकरून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी. त्यांचे मांसही अल्लाहला पोहचत नाही आणि त्यांचे रक्तदेखील नाही परंतु त्याला तुमची निष्ठा पोहचते. त्याने यांना तुमच्यासाठी अशाप्रकारे अधीन केले आहे की जेणेकरून त्याने प्रदान केलेल्या मार्गदर्शनावर तुम्ही त्याचा महिमा वर्णावा. आणि हे पैगंबर (स.), शुभवार्ता द्या सदाचारी लोकांना. (३४-३७)
खचितच अल्लाह प्रतिकार करतो त्या लोकांच्या बाजूने ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे. निश्चितच अल्लाह कुणा अपहार करणार्या कृतघ्नाला पसत करीत नसतो. परवानगी दिली गेली युद्ध करण्याची त्या लोकांना ज्यांच्यावर अत्याचार केले गेले. कारण ते अत्याचारपीडित आहेत. आणि अल्लाह निश्चितपणे त्यांच्या मदतीला समर्थ आहे. हे ते लोक आहेत जे आपल्या घरांतून नाहक बाहेर काढले गेले, केवळ या अपराधापायी की ते म्हणत होते, “आमचा पालनकर्ता अल्लाह आहे.” जर अल्लाह लोकांना एक दुसर्याकरवी ह्टवीत नसता तर मठ, आणि चर्च व ‘सिनेगॉग’ आणि मस्जिदी ज्यांत अल्लाहचे नाव मोठया प्रमाणात घेतले जाते, सर्व उद्ध्वस्त केली गेली असती. अल्लाह जरूर त्या लोकांना सहाय्य करील जे त्याला सहाय्य करतील. अल्लाह मोठा शक्तीशाली आणि जबरदस्त आहे. हे ते लोक आहेत ज्यांना आम्ही जर पृथ्वीवर सत्ता बहाल केली तर ते नमाज कायम करतील, जकात देतील, सत्कर्माचा आदेश देतील आणि वाईटाला प्रतिबंध करतील, आणि सर्व बाबींचा अंतिम परिणाम अल्लाहच्या अखत्यारीत आहे. (३८-४१)
हे ऐगंबर (स.), जर ते (म्हणजे अश्रद्धा) तुम्हाला खोटे ठरवीत असतील तर त्यांच्यापूर्वी नूह (अ.) चे लोक व आद लोक आणि समूद लोक आणि इब्राहीम (अ.) चे लोक व लूत (अ.) यांनादेखील खोटे लेखले गेले आहे. त्या सर्व सत्याचा इन्कार करणार्यांना मी अगोदर सवड दिली, मग पकडले, आता पाहून घ्या की माझी शिक्षा कशी होती. कित्येक अपराधी वस्त्या आहेत ज्यांना आम्ही नष्ट केले आहे आणि आज त्या आपल्या छतासह पालथ्या पडलेल्या आहेत, कित्येक विहिरी निरुपयोगी आणि कित्येक महाल भग्नावशेष बनले आहेत. काय हे लोक भूतलावर वावरत नाहीत की जेणेकरून यांची ह्रदये बोध घेणारी व यांचे काम ऐकणारे बनले असते? वस्तुस्थिती अशी आहे की डोळे आंधळे नसतात तर ती ह्रदये आंधळी बनतात जी उरात स्थित आहेत. (४२-४६)
हे लोक प्रकोपासाठी घाई करीत आहेत, अल्लाह कदापि आपल्या वचनाच्याविरूद्ध करणार नाही, पण तुझ्या पालनकर्त्याजवळील एक दिवस तुमच्या गणनेतील हजार वर्षांबरोबर असतो. कित्येक वस्त्या ज्या अत्याचारी होत्या, मी त्यांना प्रथम सवड दिली, मग पकडले, आणि सर्वांना परत तर माझ्याकडेच यावयाचे आहे. (४७-४८)
हे पैगंबर (स.), सांगून टाका की, “लोकहो, मी तर तुमच्यासाठी केवळ ती व्यक्ती आहे जी (वाईट वेळ येण्यापूर्वी) स्पष्टपणे खबरदार करणारी आहे.” मग जे श्रद्धा ठेवतील व सत्कृत्ये करतील त्यांच्यासाठी क्षमा आहे व मानाची उपजीविका. आणि जे आमच्या संकेतांचे वैभव नष्ट करण्याचा प्रयत्न करतील ते नरकाचे सोबती आहेत. (४९-५१)
आणि हे पैगंबर (स.), तुमच्यापूर्वी आम्ही कोणी असा प्रेषितही पाठविला नाही न नबीदेखील (ज्याच्या बाबतीत हा मामला समोर आला नाही की) जेव्हा त्याने इच्छा केली, शैतान त्याच्या इच्छेत विघ्नकर्ता झाला नाही. अशा प्रकारे शैतान जी काही विघ्ने आणतो, अल्लाह त्यांना नाहीसे करतो, आणि आपल्या संकेतांना सुदृढ करून टाकतो. अल्लाह सर्वज्ञ आहे व बुद्धिमान. (तो यासाठी असे होऊ देतो) की जेणेकरून शैतानाने आणलेल्या अडथळ्याला उपद्रव बनवावे त्या लोकांसाठी ज्यांच्या ह्रदयांना (दांभिकतेचा) रोग जडला आहे आणि त्यांची ह्रदये खोटी आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की हे अत्याचारी लोक द्वेषांत फार दूर निघाले आहेत आणि ज्ञानाने विभूषित लोकांनी जाणून घ्यावे की हे सत्य आहे तुझ्या पालनकर्त्याकडून आणि त्यांनी यावर श्रद्धा ठेवावी व त्यांची ह्रदये याच्यासमोर नमावीत, निश्चितच अल्लाह श्रद्धावंतांना नेहमी सरळमार्ग दाखवितो. (५२-५४)
नाकारणारे तर शंकेतच पडलेले राहतील येथपावेतो की त्यांच्यावर पुनरुत्थानाची घटका अकस्मात येईल. अथवा एक अशुभ दिनाचा प्रकोप कोसळेल. त्या दिवशी राज्य अल्लाहचेच असेल, आणि तो त्यांच्या दरम्यान निर्णय करील. जे श्रद्धा बाळणारे आणि सत्कृत्ये करणारे असतील ते ऐश्वर्यसंपन्न स्वर्गात जातील आणि ज्यांनी द्रोह केला असेल व आमच्या संकेतांना खोटे ठरविले असेल त्यांच्याकरिता अपमानजनक प्रकोप असेल. आणि ज्या लोकांनी अल्लाहच्या मार्गात हिजरत (देश त्याग) केली मग ठार केले गेले अथवा मृत्यू पावले, अल्लाह त्यांना उत्तम उपजीविका देईल आणि नि:संशय अल्लाहच सर्वोत्तम उपजीविका देणारा आहे. तो त्यांना अशा ठिकाणी पोहचवील जेणेकरून ते आनंदित होतील. नि:संशय अल्लाह सर्वज्ञ व सहिष्णू आहे. हा तर आहे त्यांचा शेवट, आणि जो कोणी बदला घेईल तर एवढाच जेवढा त्याच्यावर केला गेला असेल आणि मग नंतरही त्याच्यावर आगळीक झाली तर अल्लाह त्याला अवश्य सहाय्य करील. अल्लाह माफ करणारा व क्षमाशील आहे. (५५-६०)
हे यासाठी की रात्रीतून दिवस व दिवसांतून रात्र काढणारा अल्लाहच आहे, आणि तो सर्वकाहीज ऐकणारा व पाहणारा आहे. हे यासाठी की अल्लाहच सत्य आहे आणि ते सर्व मिथ्या आहेत ज्यांचा अल्लाहला सोडून हे धावा करतात, आणि अल्लाहच वर्चस्व बाळगणारा आणि महान आहे. काय तुम्ही हे पाहात नाही की अल्लाह आकाशातून पाण्याचा वर्षाव करतो ज्यामुळे पृथ्वी हिरवीगार बनेत? वस्तुस्थिती अशी आहे की तो सूक्ष्मदर्शी व जाणणारा आहे. त्याचेच आहे जे काही आकाशांत आहे आणि जे काही पृथ्वीत आहे. नि:संदेह तोच निरपेक्ष व स्तुत्य आहे. काय तुम्ही पाहात नाही की त्याने ते सर्वकाही तुमच्या अधीन केले आहे जे पृथ्वीत आहे आणि त्यानेच नावेला नियमबद्ध केले आहे की ती त्याच्या आज्ञेने समुद्रात चालते, आणि त्यानेच आकाशाला अशाप्रकारे सांभाळले आहे की त्याच्या आज्ञोशिवाय ते जमिनीवर पडू शकत नाही? वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह लोकांसाठी फार प्रेमळ व दय़ाळू आहे. तोच आहे ज्याने तुम्हाला जीवन प्रदान केले, तोच तुम्हाला मरण देईल आणि तोच पुन्हा तुम्हाला जिवंत करील. खरे असे आहे की मनुष्य फारच, सत्य नाकारणारा आहे. (६१-६६)
प्रत्येक लोकसमुदाया (उम्मत) करिता आम्ही एक उपासनापद्धती निश्चित केली आहे, ज्याचे अनुकरण तो करतो, तर मग हे पैगंबर (स.)! त्यांनी याबाबतीत तुमच्याशी भांडण करू नये. तुम्ही आपल्या पालनकर्त्याकडे निमंत्रण द्या. नि:संशाय तुम्ही सरळ मार्गावर आहात. आणि जर ते तुमच्याशी भांडले तर सांगा की, “जे काही तुम्ही करीत आहात, अल्लाहला चांगलेच माहीत आहे. अल्लाह पुनरुत्थानाच्या दिवशी तुमच्या दरम्यान त्या सर्व गोष्टींचा निर्णय लावील ज्यांच्याशी तुम्ही मतभेद करीत राहिला आहात.” काय तुम्हाला नाही की आकाश व पृथ्वीतील प्रत्येक वस्तू अल्लाहच्या माहितीत आहे? सर्वकाही एका पुस्तकात नोंदलेले आहे. अल्लाहसाठी हे काहीही कठीण नाही. (६७-७०)
हे लोक अल्लाहला सोडून त्यांची उपासना करीत आहेत ज्यांच्यासंबंधी त्याने एखादे प्रमाणही अवतरीले नाही आणि हे स्वत:देखील त्यासंबंधी काही ज्ञानही बाळगत नाहीत. या अत्याचार्यांसाठी कोणीही सहायक नाही. आणि जेव्हा यांना आमची सुस्पष्ट वचने ऐकविली जातात तेव्हा तुम्ही पाहता की, सत्याचा इन्कार करणार्याचे चेहरे विकृत होऊ लागतात आणि असे वाटते की आता ते त्या लोकांवर तुटून पडतील जे आमची वचने यांना ऐकवितात. यांना सांगा, “मी दाखवू का तुम्हाला की याच्यापेक्षा अधिक वाईट गोष्ट कोणती आहे? आग, अल्लाहने तिचाच वायदा त्या लोकांसाठी करून ठेवला आहे जे सत्य मान्य करण्यास नकार देतील, आणि ते फारच वाईट ठिकाण आहे.” (७१-७२)
लोकहो, एक उदाहरण दिले जात आहे. लक्षपूर्वक ऐका, ज्या उपास्यांचा तुम्ही अल्लाहला सोडून धावा करता ते सर्वजण मिळून एक माशीदेखील निर्माण करू इच्छित असतील तर करू शकणार नाहीत किंबहुना जर माशीने त्यांच्याकडून एखादी वस्तू हिसकावून घेतली तर ते ती सोडवूदेखील शकत नाहीत. मदत इच्छिणारेही दुबळे आणि ज्यांच्याकडून मदत इच्छिली जाते तेही दुबळे. या लोकांनी अल्लाहची कदरच ओळखली नाही जशी त्यांनी ओळखायला हवी होती. वस्तुस्थिती अशी आहे की शक्तिमान व प्रतिष्ठावान तर अल्लाहच आहे. (७३-७४)
वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह (आपल्या आज्ञा पाठविण्यासाठी) दूतांपैकीसुद्धा संदेशवाहक निवडतो आणि मानवांपैकीसुद्धा. तो ऐकणारा व पाहणारा आहे, जे काही लोकांच्या समोर आहे तेही तो जाणतो आणि जे काही त्यांच्या पलीकडे आहे त्याचीही त्याला माहिती आहे. आणि सर्व गोष्टी त्याच्याकडेच रूजू होतात. (७५-७६)
हे श्रद्धावंतांनो, झुका व नतमस्तक व्हा. आपल्या पालनकर्त्याची भक्ती करा आणि सत्कृत्ये करा. यामुळेच अपेक्षा केली जाऊ शकते की तुम्हाला यश लाभेल, अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा करा जशी ती करायला हवी. त्याने तुम्हाला आपल्या कार्यासाठी निवडले आहे आणि धर्मामध्ये तुमच्यावर कोणतीही अडचण ठेवली नाही. दृढ व्हा आपल्या पिता इब्राहीम (अ.) च्या परंपरे (मिल्लत) वर. अल्लाहने पूर्वीसुद्धा तुमचे नाव मुस्लिम ठेवले होते आणि या (कुरआन) मध्येसुद्धा (तुमचे असेच नाव आहे) जेणेकरून पैगंबराने तुमच्यावर साक्षी राहावे आणि तुम्ही लोकांवर साक्षीदार. म्हणून नमाज कायम करा, जकाल द्या आणि अल्लाहशी दृढनिष्ठ व्हा. तो आहे तुमचा वाली, फारच चांगला आहे तो वाली आणि फारच चांगला आहे तो सहायक. (७७-७८)