मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अल्‌वाकिआ

सूरह - अल्‌वाकिआ

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ९६)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

जेव्हा ती घडणारी घटना घडून येईल तेव्हा ती घडून येण्यास नाकारणारा कोणी असणार नाही. ती उलथापालथ करणारी आपत्ती असेल. पृथ्वी त्यावेळी अकस्मात हादरून टाकली जाईल. आणि पर्वत अशाप्रकारे चूरचूर केले जातील की ते उधळलेली धूळ बनून राहतील. तुम्ही लोक त्यावेळी तीन गटात विभागले जाल, उजव्या बाजूवाले, उजव्या बाजूवाल्यां (च्या सौभाग्या) बद्दल काय सांगावे! आणि डाव्या बाजूवाले, तर डाव्या बाजूवाल्यांचे (दुर्भाग्याचे) कसले ठिकाण आणि अग्रगामी तर अग्रगामीच आहेत. तेच तर निकटवर्ती लोक आहेत, ऐश्वर्यसंपन्न स्वर्गामध्ये राहतील. पुढच्यांच्यापैकी पुष्कळ असतील आणि मागच्यांच्यापैकी थोडे मढविलेल्या आसनावर तक्के लावून समोरासमोर बसतील, त्यांच्या मैफिलीत सदोदित मुले, वाहत्या झर्‍यातील पेयाने ओतप्रोत पेले व सुरई आणि पात्रे घेऊन धावत फिरत असतील. जे प्यायल्याने त्यांचे डोकेही गरगरणार नाही व त्यांची बुद्धिही भ्रष्ट होणार नाही. आणि ते त्यांच्या पुढे विविध प्रकारची स्वादिष्ट फळे हजर करतील की हवी ती निवडावीत, आणि पक्ष्यांचे मांस हजर करतील की हवे त्या पक्ष्याला उपयोगात आणावे. आणि त्यांच्यासाठी सुंदर नेत्रांच्या अप्सरा असतील. अशा सुंदर जणू लपवून ठेवलेले मोती. हे सर्वकाही त्या कर्माचा मोबदला म्हणून त्यांना मिळेल जे ते जगात करीत राहिले होते. तेथे ते कोणतेही असभ्य शब्द अथवा पापाची गोष्ट ऐकणार नाहीत. जी काही गोष्ट होईल ती नीटनेटकी असेल. (१-२६)

आणि उजव्या बाजूवाले, उजव्या बाजूवाल्य (च्या सौभाग्या) बद्दल काय म्हणावे! ती निष्कंटक बोरी, आणि थरावर थर असलेली केळी आणि लांबपर्यंत पसरलेल्या सावल्या, आणि सदैव प्रवाहित पाणी, आणि कधीही न संपणारी व मिर्विघ्नपणे मिळणारी असंख्य फळे आणि उच्च बैठकीत असतील त्यांच्या पत्नीं आम्ही विशेष प्रकारे नव्याने निर्माण करु आणि त्यांना कुमारिका बनवू. आपल्या पतीच्या प्रिय आणि वयात समवयस्क. हे असे उजव्या बाजूवाल्यांसाठी आहे. ते पुढच्यांपैकी पुष्कळ असतील आणि मागच्यांपैकीदेखील पुष्कळ. (२७-४०)

आणि डाव्या बाजूवाले, डाव्या बाजूवाल्या (च्या दुर्भाग्या) बद्दल काय विचारावे! ते होरपळणार्‍या वार्‍याच्या तडाख्यात आणि उकळत्या पाण्या, आणि काळ्या धुराच्या छायेत असतील, जे न शीतलही असेल न आल्हाददायक. हे ते लोक असतील जे या अंतापर्यंत पोहोचण्यापूर्वी सुखवस्तू होते आणि महापापाचा आग्रह धरीत होते. म्हणत असत, “जेव्हा आम्ही मरून माती होऊन राहू आणि हाडाचे सापळे होऊन राहू तरीपण आम्ही उठवून उभे केले जाऊ काय? आणि काय आमचे वाडवडीलसुद्धा उठविले जातील जे पूर्वी होऊन गेले आहेत?” हे पैगंबर (स,). या लोकांना सांगा, नि:संशय पूर्वीचे व नंतरचे सर्व एके दिवशी अवश्य जमा केले जाणार आहेत, ज्याची वेळ निश्चित करणात आली आहे. मग हे पथभ्रष्टांनो, आणि खोटे ठरविणार्‍यांनो, तुम्ही जक्कूम (निवडुंग) च्या झाडाचे खाद्य खाणार आहात, त्यानेच तुम्ही पोट भराल आणि त्यावर उकळते पाणी, पाणढोसळणी लागलेल्या उंटाप्रमाणे प्याल. असा आहे (या डाव्या बाजूवाल्यांच्या) मेजवानीचा सरंजाम मोबदल्याच्या दिवशी. (४१-५६)

आम्ही तुम्हाला निर्माण केले आहे, मग सत्याची कबुली का देत नाही. कधी तुम्ही विचार केला की हे जे वीर्य तुम्ही टाकता त्यापासून मूल तुम्ही बनविता की ते घडविणारे आम्ही आहोत? आम्ही तुमच्या दरम्यान मरण वाटले आणि, आणि आम्ही तुमच्या दरम्यान मरण वाटले आहे, आणि आम्ही यासाठी असमर्थ नाही की तुमची रूपे बदलून टाकावीत आणि एखाद्या अशा रूपांत तुम्हाला निर्माण करावे की जे तुम्ही जाणत नाही. आपल्या पहिल्या जन्माला तर तुम्ही जाणताच, मग का बोध घेत नाही? (५७-६२)

कधी तुम्ही विचार केला की ही बीजे जी तुम्ही पेरता त्यापासून पिके आम्ही उगवितो की ती उगविणारे तुम्ही आहात? आम्ही इच्छिले तर या शेतीचा भुसा करून टाकू आणि तुम्ही तर्‍हेतर्‍हेच्या गोष्टी बनवीत बसाल की आमच्यावर तर उलट भुर्दंड वसले, किंबहुना आमचे तर भाग्यच फुटके आहे.(६३-६७)

कधी तुम्ही डोळे उघडून पाहिले, हे पाणी जे तुम्ही पिता याला तुम्ही ढगांतून वर्षविले आहे अथवा याचा वर्षाव करणारे आम्ही आहोत? आम्ही इच्छिले तर याला अशुद्ध करून टाकू, मग का तुम्ही कृतज्ञ बनत नाही? (६८-७०)

कधी तुम्ही विचार केला, हा अग्नी जो तुम्ही पेटविता, याचे झाड तुम्ही उत्पन्न केले आहे अथवा हे निर्माण करणारे आम्ही आहोत? आम्ही त्याला आठवणीचे साधन आणि गरजूंसाठी जीवनसामग्री बनविले आहे. (७१-७३)

म्हणून हे पैगंबर (स.), आपल्या महान पालनकर्त्याच्या नावाचे पावित्रगान करा. (७४)

तर नव्हे मी शपथ घेतो तार्‍यांच्या स्थानांची आणि जर तुम्ही समजून घेतले तर ही फार मोठी शपथ आहे की हा एक उच्च कोटीचा कुरआन आहे, एका सुरक्षित ग्रंथांत अंकित, ज्याला पवित्रांशिवाय कोणी स्पर्श करू शकत नाही. हा सकल जगांच्या पालनकर्त्याकडून अवतरित आहे. मग काय तुम्ही या वाणीची उपेक्षा करता, आणि या देणगीत आपला वाटा तुम्ही असा ठेवला आहे की याला तुम्ही खोटे ठरविता? (७५-८२)

आता जर तुम्ही कुणाचे आज्ञांकित नसाल आणि आपल्या या विचारांत खरे आहात, तर जेव्हा मरणार्‍याचा जीव कंठापर्यंत पोहचलेला असतो आणि तुम्ही डोळ्याने पाहत असता की तो मरत आहे तेव्हा त्याच्या निघत असलेल्या प्राणाला परत का आणत नाही? त्यावेळी तुमच्यापेक्षा त्याच्या अधिक जवळ आम्ही असतो परंतु तुम्हाला दिसत नाही. मग तो मरणारा जर निकटवर्तीयांपैकी असेल तर त्याच्यासाठी सुख आणि उत्तम उपजीविका व ऐश्वर्यसंपन्न स्वर्ग आहे. आणि जर तो उजव्या बाजूवाल्यांपैकी असेल तर त्याचे स्वागत असे होईल की सलाम आहे तुला, तू उजव्या बाजूवाल्यांपैकी आहेस आणि जर तो खोटे ठरविणार्‍या पथभ्रष्ट लोकांपैकी असेल तर त्याच्या पाहुणचारासाठी उकळते पाणी आहे आणि नरकामध्ये झोकले जाणे. (८३-९४)

हे सर्वकाही पूर्णत: सत्य आहे, म्हणून हे पैगंबर (स.), आपल्या महान पालनकर्त्याच्या नावाने पावित्र्यगान करा. (९५-९६)

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP