(मक्काकालीन, वचने ५४)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
हामीऽऽम, ही परमदयाळू व परमकृपाळू ईश्वराकडून अवतरलेली वस्तू आहे, एक असा ग्रंथ जिची संकेतवचने खूप उघड करून सांगितली गेली आहेत, अरबी भाषेतील कुरआन, त्या लोकांसाठी जे ज्ञान बाळगतात,
खुशखबरी देणारा व भय दाखविणारा. (१-४-)
परंतु या लोकांपैकी बहुतेकांनी त्याकडून तोंड फिरविले अणि ते ऐकून घेत नाहीत. म्हणतात, “ज्या गोष्टीकडे तू आम्हाला बोलवीत आहेस; त्याच्यासाठी आमच्या ह्रदयांवर आवरणे चढलेली आहेत, आमचे कान बधीर झाले आहेत, आणि आमच्या व तुझ्या दरम्यान एक पडदा आड आहे. तू आपले काम कर, आम्ही आपले काम करीत राहू.” (-४-५)
हे पैगंबर (स.), यांना सांगा, “मी तर एक मनुष्य आहे तुम्हासारखा. मला दिव्यबोधाद्वारे सांगण्यात येते की तुमचा उपास्य तर केवळ एकच उपास्य (अल्लाह) आहे, म्हणून तुम्ही सरळ त्याच्याकडेच रोख ठेवा, आणि त्याच्याकडे क्षमायाचना करा. विनाश आहे त्या अनेकेश्वरवाद्यांसाठी, जे जकात देत नाहीत आणि परलोकाचा इन्कार करणारे आहेत. उरले ते लोक ज्यांनी मान्य केले आणि सत्कृत्ये केली, त्यांच्यासाठी निश्चितपणे असा मोबदला आहे ज्याचा क्रम कधीही खंडित होणार नाही. (६-८)
हे पैगंबर (स.), यांना सांगा, काय तुम्ही त्या ईश्वराशी द्रोह करता आणि दुसर्यांना त्याचा तुल्यबळ ठरविता ज्याने पृथ्वीला दोन दिवसांत बनवून टाकले? तोच तर सर्व जगवासियांचा पालनकर्ता आहे. त्याने (पृथ्वीला अस्तित्वात आणत्यानंतर) वरून तिच्यावर पर्वत रोवले आणि तिच्यात समृद्धी ठेवली आणि तिच्यात सर्व मागणार्यांसाठी प्रत्येकाच्या मागणी व गरजेप्रमाणे योग्य अंदाजाने अन्नधान्याची साधने उपलब्ध करून दिली. ही सर्व कामे चार दिवसांत उरकली. मग त्याने आकाशाकडे लक्ष दिले जे त्यावेळी केवळ धुरासामन होते. त्याने आकाश व पृथ्वीला सांगितले, “आस्तित्वात या, मग तुमची इच्छा असो वा नसो.” दोघांनी सांगितले, “आम्ही आलो आज्ञाधारकांप्रमाणे.” तेव्हा त्याने दोन दिवसांच्या आत सात आकाश बनवून टाकले, आणि प्रत्येक आकाशांत त्याचा कायदा दिव्यबोध केला. आणि दुनियेच्या आकाशाला आम्ही दिव्यांनी सुशोभित केले व त्याला खूप सुरक्षित केले. हे सर्वकाही एका जबरदस्त ज्ञानी अस्तित्वाची योजना आहे. (९-१२)
आता जर हे लोक तोंड फिरवीत असतील तर यांना सांगा, मी तुम्हाला त्याच प्रकारच्या एका अकस्मात कोसळणार्या प्रकोपाचे भय दाखविले जसा आद व समूदवर कोसळला होता. जेव्हा प्रेषित त्यांच्याजवळ पुढून व पाठीमागून सर्व बाजूंनी आले आणि त्यांना समजाविले की अल्लाहशिवाय कोणाचीही भक्ती करू नका तेव्हा त्यांनी सांगितले, “आमच्या पालनकर्त्याने इच्छिले असते तर दूत पाठविले असते, म्हणून आम्ही त्या गोष्टीला मानीत नाही ज्यासाठी तुम्ही पाठविले गेले आहात.” (१३-१४)
आदची स्थिती अशी होती की ते पृथ्वीमध्ये कोणत्याही अधिकाराशिवाय मोठे बनून बसले. आणि म्हणू लागले, “कोण आहे आमच्यापेक्षा जास्त बलवान.” त्यांना हे सुचले नाही की ज्या अल्लाहने त्यांना निर्माण केले आहे, तो त्यांच्यापेक्षा अधिक बलवान आहे? हे आमच्या संकेतांचा इन्कार करीत राहिले, सरतेशेवटी आम्ही काही अशुभ दिवसांत भयंकर वादळी वारे त्यांच्यावर पाठविले, जेणेकरून त्यांना ऐहिक जीवनातच अपमान व नामुष्कीच्या प्रकोपाचा आस्वाद द्यावा, आणि परलोकाचा प्रकोप तर त्याहूनही जास्त अपमानजनक आहे, तेथे कोणीही त्यांना मदत करणारा नसेल. (१५-१६)
उरले समूद तर त्यांच्यासमोर आम्ही सरळमार्ग प्रस्तुत केला परंतु त्यांनी मार्गाला पाहण्याऐजवी अंध बनून राहणेच पसंत केले. सरतेशेवटी त्यांच्या कर्तृत्वामुळे अपमानजनक प्रकोप त्यांच्यावर कोसळला. आणि आम्ही त्या लोकांना वाचविले ज्यांनी ईमान आणले होते आणि पथभ्रष्टता व दुराचारापासून अलिप्त राहत होते. (१७-१८)
आणि जरा त्यावेळेची कल्पना करा जेव्हा अल्लाहचे हे शत्रू नरकाग्नीकडे जाण्यासाठी घेऊन आणले जातील. यांच्यापुढे गेलेल्यांना नंतर येणार्यांच्या आगमनापर्यंत रोखून धरले जाईल. मग जेव्हा सर्वजण तेथे पोहचतील तेव्हा त्यांचे कान व त्यांचे डोळे आणि त्यांच्या शरीराची त्वचा त्यांच्यावर साक्ष देतील की ते जगात काय काय करीत राहिले आहेत. ते आपल्या शरीराच्या त्वचांना म्हणतील, “तुम्ही आमच्याविरूद्ध साक्ष का दिली?” त्या उत्तर देतील, “आम्हाला त्याच अल्लाहने वाणी दिली आहे ज्याने प्रत्येक वस्तूला बोलके केले आहे. त्यानेच तुम्हाला पहिल्यांदा निर्माण केले होते आणि आता त्याच्याकडेच तुम्ही परत आणले जात आहात. तुम्ही जगात अपराध करतेवेळी जेव्हा लपत होता तेव्हा तुम्हाला याचा विचार नव्हता की कधी तुमचे स्वत:चे कान आणि तुमचे डोळे व तुमच्या शरीराच्या त्वचा तुम्हावर साक्ष देतील किंबहुना तुम्ही तर असे समजला होता की तुमच्या पुष्कळशा कृत्यांची अल्लाहलासुद्धा खबर नाही. तुमची हीच धारणा जी तुम्ही आपल्या पालनकर्त्यासंबंधी केली होती, तिनेच तुम्हाला बुडविले आणि तिच्याचमुळे तुम्ही तोटयात आला.” अशा स्थितीत ते सहन करो (अथवा न करो); अग्नीच त्यांचे ठिकाण असेल आणि जर रुजू होण्याची संधी इच्छितील तर कोणतीही संधी त्यांना दिली जाणार नाही. आम्ही त्यांच्यावर असले सोबती नियुक्त केले होते, जे त्यांना पुढे व मागे प्रत्येक वस्तू शोभिवंत बनवून दाखवीत होते. सरतेशेवटी त्यांच्यावरसुद्धा तोच प्रकोपाच निर्णय लागू झाल्याशिवाय राहिला नाही जो त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या जिन्न आणि माणसाच्या समूहावर लागू झाला होता, निश्चितच ते तोटयात राहणारे होते. (१९-२५)
हे सत्याचा इन्कार करणारे म्हणतात, “या कुरआनला कदापि ऐकू नका आणि जेव्हा हा ऐकविला जाईल तेव्हा त्यात व्यत्यय आणा, कदाचित अशाप्रकारे तुम्ही वर्चस्व मिळवाल.” या सत्य नाकारणार्यांना आम्ही कठोर शिक्षेचा आस्वाद देणारच आणि ज्या अत्यंत वाईट कारवाया हे करीत राहिले आहेत, त्यांचा पुरेपूर बदला यांना देऊ. तो नरक आहे जो अल्लाहच्या शत्रूंना बदल्यात मिळेल. त्यातच सदासर्वदा त्यांचे वास्तव्य राहील. ही शिक्षा आहे त्या अपराधाची की ते आमच्या संकेतांचा इन्कार करीत राहिले.
तेथे हे अश्रद्धावंत म्हणतील की, “हे आमच्या पालनकर्त्या, आम्हाला दाखव जरा त्या जिन्नांना व माणसांना ज्यांनी आम्हाला मार्गभ्रष्ट केले होते, आम्ही त्यांना पायाखाली तुडवून टाकू जेणेकरून ते खूप फटफजीत व अपमानित होतील.” (२६-२९)
ज्या लोकांनी सांगितले की, अल्लाह आमचा पालनकर्ता आहे आणि मग ते त्यावर दृढ राहिले, निश्चितच त्यांच्याव्र दूत उतरत असतात आणि त्यांना म्हणतात की, “भिऊही नका व दु:खदेखील करू नका आणि खूश व्हा त्या स्वर्गाच्या खुशखबरीने जिचे वचन तुम्हाला दिले गेले आहे. आम्ही या जगाच्या जीवनातसुद्धा तुमचे सोबती आहोत आणि परलोकातसुद्धा. तेथे जी काही इच्छा कराल तुम्हाला मिळेल आणि प्रत्येक गोष्ट जिची तुम्ही मनिषा बाळगाल, ती तुमची होईल, असा आहे मेजवानीसरंजामत्या अस्तित्वाकडून जो क्षमाशील व दयावान आहे.” (३०-३२)
आणि त्या माणसाच्या वचनापेक्षा चांगले वचन अन्य कोणाचे असेल ज्याने अल्लाहकडे बोलाविले आणि सत्कर्म केले आणि म्हटले की मी ‘मुस्लिम’ (आज्ञाधारी) आहे. (३३)
आणि हे पैगंबर (स.), भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईद्वारे निरसन करा जी अत्युत्तम असेल. तुम्ही पाहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते, तो जिवलग मित्र बनला आहे. हा गुण लाभत असतो त्या लोकाना जे संयम बाळगतात, आणि हे स्थान प्राप्त होत असते त्या लोकांना जे मोठे भाग्यवान असतात. आणि जर शैतानकडून एखादी चेतवणूक होत असल्याचे तुम्हाला वाटत असेल तर अल्लाहचा आश्रय मागा. तो सर्वकाही ऐकतो व जाणतो. (३४-३६)
अल्लाहच्या संकेतांपैकी आहेत ही रात्र आणि दिवस व सूर्य आणि चंद्र. सूर्य आणि चंद्रापुढे नतमस्तक होऊ नका, त्या अल्लाहपुढे नतमस्तक व्हा ज्याने यांना निर्माण केले आहे, जर खरोखरीच तुम्ही त्याची उपासना करणारे आहात. परंतु जर हे लोक गर्वात येऊन आपल्याच गोष्टीवर अडून बसले तर पर्वा नाही. जे दूत तुझ्या पालनकर्त्याच्या जवळ आहेत ते रात्रंदिवस त्याचे पावित्र्यगान करीत आहेत आणि कधीही थकत नाहीत. (३७-३८)
आणि अल्लाहच्या संकेतांपैकी एक हेही आहे की, जमीन ओसाड पडलेली आहे, मग आम्ही तिच्यावर पाण्याचा पर्षाव करताच अकस्मातपणे ती तजेलदार होते आणि फुलते. निश्चितच जो ईश्वर मृत जमिनीला जीवित करतो, तो मृतांनादेखील जीवन प्रदान करणारा आहे. निश्चितपणे तो प्रत्येक वस्तूवर प्रभुत्व राखतो. (३९)
जे लोक आमच्या संकेतचिन्हांना उलट अर्थ देतात, ते आम्हापासून काही लपलेले नाहीत. स्वत:च विचार करा की तो मनुष्य अधिक चांगला आहे जो अग्नीत टाकला जाणार आहे अथवा तो, जो पुनरुत्थानाच्या दिवशी अभय़ स्थितीत ह्जर होईल? करीत राहा जसे काही तुम्हाला वाटेल तसे, तुमच्या सर्व कारवाया अल्लाह पाहात आहे. हे ते लोक आहेत ज्यांच्यासमोर उपदेशवाणी आली तर यांनी ती मानण्यास नकार दिला, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हा एक जबरदस्त ग्रंथ आहे, असत्य समोरूनही याच्यावर येऊ शकत नाही आणि पाठीमागूनसुद्धा. ही एका बुद्धिमान व स्तुत्यकडून अवतरलेली वस्तू आहे. (४०-४२)
हे पैगंबर (स.), तुम्हाला जे काही सांगितले जात आहे त्यापैकी कोणतीही अशी गोष्ट नाही जी तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या प्रेषितांना सांगितली गेलेली नाही. नि:संदेह तुमचा पालनकर्ता मोठा क्षमाशील आहे, आणि याचबरोबर भयंकर यातनादायक शिक्षा देणारासुद्धा आहे. (४३)
जर आम्ही याला अरबी व्यतिरिक्त भाषेचा कुरआन बनवून पाठविले असते तर हे लोक म्हणाले असते, “यांची वचने स्पष्ट करून का सांगितली गेली नाहीत? काय अजब गोष्ट आहे की वाणी तर अरबेतर आहे आणि श्रोती अरबी.” यांना सांगा, हा कुरआन तर श्रद्धावंतांसाठी मार्गदर्शन व आरोग्यदायी आहे, परंतु जे लोक श्रद्धावंत नाहीत त्यांच्यासाठी कानाचा बहिरेपणा आणि डोळ्यांचे अंधत्व आहे. त्यांची स्थिती तर अशी आहे जणू त्यांना दुरून हांक दिली जात असेल. यापूर्वी मूसा (अ.) ला आम्ही ग्रंथ दिला होता व त्याच्याबाबतीतसुद्धा हेच मतभेद निर्माण झाले होते. जर तुझ्या पालनकर्त्याने अगोदरच एक गोष्ट ठरवून टाकलेली नसती तर या मतभेद करणार्यांच्या दरम्यान निर्णय लावला गेला असता. आणि वस्तुस्थिती अशी आहे की हे लोक त्याच्याकडून अत्यंत शंकेत गुरफटलेले असल्याने अस्वस्थ झाले आहेत. (४४-४५)
जो कोणी सत्कर्म करील स्वत:साठीच चांगले करील, जो दुष्कर्म करील त्याचे अरिष्ट त्याच्यावरच येईल, आणि तुझा पालनकर्ता दासांसाठी अत्याचारी नाही. (४६)
त्या घटनेचे ज्ञान अल्लाहकडेच रुजू होते, तोच त्या सर्व फळांना जाणतो जे आपल्या मोहोरांतून निघतात, त्यालाच माहीत आहे की कोणती मादी गर्भवती झाली आहे आणि कोण बाळंत झाली आहे. मग त्या दिवशी तो या लोकांना हांक देईल की कोठे आहेत ते माझे भागीदार? हे म्हणतील, “आम्ही सांगितले आहे. आज आमच्यापैकी कोणी याची साक्ष देणार नाही.” त्यावेळी ते सर्व उपास्य यांच्याकडून हरवले जातील ज्यांचा हे त्यापूर्वी धावा करीत होते. आणि हे लोक समजून घेतील की यांच्यासाठी आता कोणतेही आश्रयस्थान नाही. (४७-४८)
मनुष्य कधीही आपल्या भल्यासाठी प्रार्थना करताना थकत नाही, आणि जेव्हा त्याच्यावर एखादे अरिष्ट येते तेव्हा तो निराश आणि हताश होतो, परंतु संकटकाळ निघून जाताक्षणीच जेव्हा आम्ही त्याला आमच्या कृपेचा आस्वाद देतो तेव्हा तो म्हणतो. “मी यालाच पात्र आहे. आणि मला नाही वाटत की पुनरुत्थान कधी येईल. परंतु जर खरोखरीच मी माझ्या पालनकर्त्याकडे परतविला गेलो तर तेथे सुद्धा मौजमजा करीन.” वास्तविकत: द्रोह करणार्यांना आम्ही खचितच हे दाखविल्याशिवाय राहणार नाही की ते काय करून आले आहेत आणि त्यांना आम्ही मोठया घृणास्पद प्रकोपाचा आस्वाद देऊ. (४९-५०)
माणसाला जेव्हा आम्ही देणगी देतो तेव्हा तो तोंड फिरवितो आणि ऐटीत येतो. आणि जेव्हा त्याला एखादे संकट स्पर्श करते तेव्हा तो लांबलचक प्रार्थना करू लागतो. (५१)
हे पैगंबर (स.) यांना सांगा, कधी तुम्ही असाही विचार केला की जर खरोखरच हा कुरआन अल्लाहकडूनच असला आणि तुम्ही याचा इन्कार करीत राहिला तर त्या माणसापेक्षा मोठा पथभ्रष्ट अन्य कोण बरे असेल जो याच्या विरोधात दूरवर निघून गेला असेल? (५२)
लवकरच आम्ही यांना आमचे संकेत बाह्यजगतातही दाखवू आणि त्यांच्या अंतरंगातसुद्धा, येथपावेतो की यांच्यावर ही गोष्ट उघड होईल की हा कुरआन खरोखरीच सत्याधिष्ठित आहे. काय ही गोष्ट पुरेशी नाही की तुझा पालनकर्ता प्रत्येक गोष्टीचा साक्षी आहे? जाणून असा, हे लोक आपल्या पालनकर्त्याच्या भेटीसंबंधी शंका बाळगतात. ऐकून असा, तो प्रत्येक वस्तूला वेढून आहे. (५३-५४)