(मदीनाकालीन, वचने १२)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
हे नबी (स.), तुम्ही का त्या वस्तूला निषिद्ध ठरविता जी अल्लाहने तुमच्यासाठी वैध केली आहे? (काय अशासाठी की) तुम्ही आपल्या पत्नीची मर्जी सांभाळू इच्छिता?-अल्लाह माफ करणारा आणि दया करणारा आहे. अल्लाहने तुम्हा लोकांसाठी आपल्या शपथांच्या बंधनांतून मुक्त होण्याची पद्धत ठरवून दिली आहे. अल्लाह तुमचा वाली आहे. आणि तो सर्वज्ञ व बुद्धिमान आहे. (१-२)
(आणि हा मामलासुद्धा लक्ष देण्याजोगा आहे) नबी (स.) यांनी एक गोष्ट आपल्या एका पत्नीशी गुप्तपणे सांगितली होती. मग जेव्हा त्या पत्नीने (अन्य कुणावर) ते गुपित उघड केले, आणि अल्लाहने नबी (स.) यांना या (गौप्यस्फोटा) ची बातमी दिली तेव्हा नबी (स.) यांनी त्यावर काही अंशी (त्या पत्नीला) खबरदार केले आणि काही अंशी त्याबाबतीत दुर्लक्ष केले. मग जेव्हा नबी (स.) नी तिला (गौप्यस्फोटाची) ही गोष्ट सांगितली तेव्हा तिने विचारले, आपणास याची बातमी कुणी दिली? नबी (स.) नी सांगितले, “मला त्याने बातमी दिली जो सर्वकाही जाणतो-आणि खूप खबर राखणारा आहे.” (३)
जर तुम्ही दोघी अल्लाहकडे तौबा-पश्चात्ताप करणार असाल (तर हे तुमच्यासाठी उत्तम आहे) कारण तुमची मने सरळ मार्गावरून ह्टली आहेत. आणि जर नबी (अ.) च्या विरोधात तुम्ही गटबाजी केली तर जाणून असा की अल्लाह त्याचा वाली आहे आणि त्यानंतर जिब्रील आणि तमाम सदाचारी श्रद्धावंत व सर्व दूत त्याचे सोबती आणि सहायक आहेत. दूर नव्हे की नबी (स.) ने तुम्हा सर्व पत्नींना तलाक दिला तर अल्लाह त्याला अशा पत्नीं तुमच्याऐवजी प्रदान करील ज्या तुमच्यापेक्षा उत्तम असतील. खर्या मुसलमान, श्रद्धावंत, आज्ञाधारक, पश्चात्ताप व्यक्त करणार्या, उपासना करणार्या आणि उपवास करणार्या, मग पतीचा स्पर्श झालेल्या असोत की कुमारिका. (४-५)
हे लोकहो! ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, वाचवा स्वत:ला आणि आपल्या कुटुंबियांना त्या अग्नीपासून जिचे इंधन मनुष्य आणि दगड असतील, त्यावर अत्यंत तापट व कठोर स्वभावी दूत नेमलेले असतील जे कधीही अल्लाहच्या आज्ञेचा भंग करीत नाहीत आणि जी काही आज्ञा त्यांना दिली जाते तिची ते अंमलबजावणी करतात. (त्यावेळी सांगितले जाईल की) हे अश्रद्धावंतांनो, आज निमित्ते पुढे करू नका. तुम्हाला तर तसाच बदला दिला जात आहे जसे तुम्ही आचरण करीत होता. (६-७)
हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, अल्लाहपुढे पश्चात्ताप करा. विशुद्ध पश्चात्ताप. दूर नव्हे की अल्लाहने तुमचे दोष दूर करावेत आणि तुम्हाला आशा स्वार्गामध्ये दाखल करावे ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील. हा तो दिवस असेल जेव्हा अल्लाह आपल्या नबी (स.) ला आणि त्या लोकांना ज्यांनी त्यांच्यासमवेत श्रद्धा ठेवली आहे, खजील करणार नाही. आणि त्यांचे तेज त्यांच्या पुढे पुढे त्यांच्या उजव्या बाजूने पळत असेल आणि ते म्हणत असतील की हे आमच्या पालनकर्ता, आमचे तेज आमच्यासाठी पूर्ण कर आणि आम्हाला क्षमा कर, तू प्रत्येक गोष्टीला समर्थ आहेस. (८)
हे नबी (स.), अश्रद्धावंतांशी व दांभिकांशी संघर्ष (जिहाद) करा आणि त्यांच्याशी कठोर व्यवहार करा. त्यांचे ठिकाण नरक आहे आणि ते फार वाईट ठिकाण आहे. (९)
अल्लाह अश्रद्धावंतांच्या संबंधात नूह (अ.) आणि लूत (अ.) च्या पत्नींना उदाहरण म्हणून प्रस्तुत करतो. त्या आमच्या दोन सदाचारी दासांच्या दांपत्यात होत्या. परंतु त्यांना आपल्या पतींशी प्रतारणा केली, आणि ते अल्लाहच्याविरूद्ध त्यांच्या काहीही उपयोगी पडू शकले नाही. दोघींना सांगितले गेले की, जा नरकाग्नीत जाणार्यांसमवेत, तुम्हीदेखील चालत्या व्हा. आणि श्रद्धावंतांच्या बाबतीत अल्लाह फिरऔनच्या पत्नीचे उदाहरण प्रस्तुत करतो जेव्हा की तिने प्रार्थना केली, “हे माझ्या पालनकर्त्या, माझ्यासाठी आपल्या येथे स्वर्गामध्ये एक घर बनव आणि मला फिरऔन व त्याच्या कृत्यापासून वाचव, आणि अत्याचारी समुहापासून मला मुक्ती दे.” आणि इमरानची मुलगी मरयम चे उदाहरण देतो जिने आपल्या शीलाचे रक्षण केले होते मग आम्ही तिच्यात आपल्याकडून आत्मा फुंकला आणि तिने आपल्या पालनकर्त्याच्या वचनांची व त्याच्या ग्रंथांची सत्यता प्रमाणित केली आणि ती आज्ञाधारक लोकांपैकी होती. (१०-१२)