सूरह - अस्सफ
कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.
(मदीनाकालीन, वचने १४)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
अल्लाहचे पावित्रगान केले आहे त्या प्रत्येक वस्तूने, जी आकाशांत आणि पृथ्वीत आहे, आणि तो प्रभुत्वसंपन्न आणि बुद्धिमान आहे. (१)
हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, तुम्ही का ती गोष्ट सांगता जी तुम्ही करीत नाही? अल्लाहच्या जवळ हे अत्यंत अप्रिय कृत्य आहे की तुम्ही सांगावी ती गोष्ट जी करीत नाही. अल्लाहला तर प्रिय ते लोक आहेत जे त्याच्या मार्गात अशाप्रकारे फळी बांधून एक दिलाने लढतात जणूकाय ते शिसे पाजलेली भिंत असावेत. (२-४)
आणि आठवा मूसा (अ.) ची ती गोष्ट जी त्याने आपल्या राष्ट्राला सांगितली होती की, “हे माझ्या राष्ट्रबांधवांनो! तुम्ही मला का इजा देता, वस्तुत: तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता की मी तुमच्याकडे पाठविलेला अल्लाहचा प्रेषित आहे?” मग जेव्हा त्यांनी वक्रता अवलंबिली तेव्हा अल्लाहनेसुद्धा त्यांची ह्रदये वक्र केली. अल्लाह अवज्ञाकारींना मार्गदर्शन करीत नसतो. आणि आठवा मरयमपुत्र ईसाची ती गोष्ट जी त्याने सांगितली होती, “हे बनीइस्राईल, मी तुमच्याकडे पाठविलेला अल्लाहचा प्रेषित आहे, सत्यता प्रमाणित करणारा आहे त्या तौरातची जी माझ्यापूर्वी आलेली ह्जर आहे आणि खुशखबर देणारा आहे एका प्रेषिताची जो माझ्यानंतर येईल, ज्याचे नाव अहमद असेल. परंतु जेव्हा तो त्यांच्याजवळ उघडउघड संकेत घेऊन आला तेव्हा ते म्हणाले, ही तर चक्क फसवेगिरी आहे. आता बरे त्या माणसापेक्षा मोठा अत्याचारी अन्य कोण असू शकेल जो अल्लाहवर खोटा आळ घेईल वास्तविकपणे त्याला इस्लाम (अल्लाहसमोर आज्ञापालनार्थ मान तुकविणे) चे आमंत्रण दिले जात आहे? अशा अत्याचार्यांना अल्लाह मार्गदर्शन करीत नसतो. हे लोक आपल्या तोंडाच्या फुंकरीने अल्लाहच्या प्रकाशाला विझंवू इच्छितात, आणि अल्लाहचा निर्णय हा आहे की तो आपल्या प्रकाशाचा पूर्णपणे फैलाव करणारच मग अश्रद्धावंतांना हे कितीही अप्रिय का असेना. तोच तर आहे ज्याने आपल्या पैगंबर (स.) ला मार्गदर्शन आणि सत्यधर्मासह पाठविले आहे जेणेकरून त्याला समस्त धर्मांवर प्रभुत्व द्यावे मग अनेकेश्वरवाद्यांना ते कितीही अप्रिय का वाटू नये. (५-९)
हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, मी दाखवू तुम्हाला तो व्यापार जो तुम्हाला यातनादायक प्रकोपापासून वाचवील? श्रद्धा ठेवा अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर आणि प्रयत्नांची पराकाष्ठा (जिहाद) करा अल्लाहच्या मार्गात आपल्या धनसंपत्ती आणि आपल्या प्राणानिशी. हेच तुमच्यासाठी उत्तम आहे जर तुम्ही समजून घेतले. अल्लाह तुमचे गुन्हे माफ करील आणि तुम्हाला अशा उद्यानात दाखल करील ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील, आणि चिरंतन निवासाच्या स्वर्गात तुम्हाला उत्तम घर प्रदान करील. हे आहे मोठे यश. आणि ती दुसरी गोष्ट जी तुम्ही इच्छिता तीसुद्धा तुम्हाला देईल. अल्लाहकडून सहाय्य आणि लवकरच प्राप्त होणारा विजय. हे पैगंबर (स.), श्रद्धावंतांना याची खुशखबर द्या. (१०-१३)
हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, अल्लाहचे सहाय्यक बना ज्याप्रकारे मरयमपुत्र ईसाने हवारींना उद्देशून सांगितले होते, “कोण आहे अल्लाहकडे (बोलविण्यात) माझा सहायक?” आणि हवारींनी उत्तर दिले होते, “आम्ही आहोत अल्लाहचे सहायक.” त्यावेळी बनीइस्राईलच्या एका गटाने श्रद्धा ठेवली आणि दुसर्या गटाने इन्कार केला. मग आम्ही श्रद्धावंतांचे त्यांच्या शत्रुविरुद्ध समर्थन केले आणि तेच विजयी ठरले. (१४)
N/A
References : N/A
Last Updated : November 18, 2013
TOP