बृहत्संहिता - अध्याय ६
शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.
॥ अथभौमचार: ॥
भौम आपल्या उदयनक्षत्रापासून ९।८।७ या नक्षत्री वक्र होईल तर, ते उष्णसंज्ञक वक्र होते. तशा वक्रापासून पुन: उदय होईल (सूर्यमंडलातून निघेल) त्या वेळी अग्निवार्त (अग्निजीवी सुवर्णकारादिक) यांस पीडा होते ॥१॥
भौम उदयनक्षत्रापासून १०।११।१२ इतक्याव्या नक्षत्री वक्र होईल तर ते अश्रुमुख वक्र होते. अशा वक्रापासून पुन: उदयकाली मधुरादिरसांते दूषित करितो (त्या रसभक्षणाने लोकांचा नाश होतो.) व तो रोग निर्मिती करितो व वृष्टिही चांगली होते ॥२॥
भौम उदयनक्षत्रापासून १३।१४ या नक्षत्री वक्र होईल तर ते वक्र व्याल सं० होते. त्यापासून पुन: अस्तसमयी वराहादिकदंष्ट्री व सर्प व श्वापदे (वनपशु) यांपासून भय होते व सुभिक्षही होते ॥३॥
भौम उद० १५।१६ या नक्षत्री वक्र होईल तर वक्रगणि आहे तेथपर्यंत मुखरोग व भयसहित सुभिक्ष करितो ॥४॥
भौम उद० १७।१८ या नक्षत्री वक्र होईल तर ते असिमुसलनामक वक्र होय. असे झाले तर स्पष्टगतीने वक्र आहेपर्यंत प्रजेस चोरांपासून पीडा होईल व अवृष्टि व शस्त्रभय होईल ॥५॥
भौम पूर्वाफल्गुनी व उत्तराफ० यातून एकावर उदय पावून उत्तराषाढांवर वक्र होऊन रोहिणीवर अस्तंगत होईल तर त्रैलोक्यास (भूर्भुव:स्वर्लोकांस) पीडा होईल ॥६॥
भौमाचा श्रवणनक्षत्रावर उदय होऊन पुष्यावर वक्रत्व होईल तर मूर्धाभिषिक्तराजास पीडा होईल व ज्या नक्षत्री असून उदय पावेल त्या नक्षत्राचे दिशेकडील (कूर्मविभागावरून दिशा पहावी) जनसमुदायाचा नाश होईल ॥७॥
भौम मघानक्षत्राच्या मध्यभागाने (मघानक्षत्राच्या पाच तारा आहेत त्यातून) स्पष्टगतीने जाईल आणि वक्रगतीने परत येईल तर पांडयदेशचा राजा नाश पावेल व शस्त्रोद्योगने (युद्धाने) लोकांस भय होईल व अवर्षणही होईल ॥८॥
भौम मघानक्षत्राच्या योगतारेचा भेद करून विशाखांचा भेद करील तर दुर्भिक्ष होईल. रोहिणीचा भेद करून जाईल तर लोकांचा मोठा नाश होईल ॥९॥
भौम रोहिणीनक्षत्राच्या दक्षिण भागाने गमन करील तर धान्य व वृष्टि यांचा नाश होईल. भौम धूम्रवर्ण अथवा शिखायुक्त दिसेल तर पारियात्रपर्वतस्थ लोकांचा नाश करील ॥१०॥
भौम रोहिणी, श्रवण, मूल उत्तरा, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा, ज्येष्ठा; या नक्षत्री असता मेघसमुदायांचा (वृष्टीचा) नाश करणारा होतो ॥११॥
श्रवण, मघा, पुनर्वसु, मूल, हस्त, पूर्वाभाद्रपदा, अश्विनी, विशाखा, रोहिणी; या नक्षत्रांवर भौमाचे चार व उदय शुभ होते म्ह० पूर्वोक्त अशुभ फल होत नाही. ॥१२॥
विस्तीर्ण (मोठा) व स्वच्छ अशी आहे मूर्ति (तारा) ज्याची असा, पळस व अशोक यांच्या पुष्पाच्या रंगासारखा (अतिआरक्त,) स्पष्ट व तेजयुक्त आहेत किरण ज्याचे असा, तापवलेल्या तांब्यासारखी आहे प्रभा ज्याची असा व उत्तरमार्गाने जाणारा असा भौम राजांस शुभकारक व लोकांस संतोषकारक होतो ॥१३॥
॥ इतिभौमचारोनाम षष्ठोध्याय: ॥
N/A
References : N/A
Last Updated : February 18, 2015
TOP