गर्गऋषि, ज्या उत्पाताते अत्रिऋषिकारणे सांगता झाला. त्या उत्पाताते मी सांगतो. पदार्थाच्या स्वाभाविक गुणाला विकार होणे हा त्या उत्पातांचा संक्षेप होय ॥१॥
मनुष्यांच्या अविनयाने पापसंचय होऊन त्यापासून उपद्रव होतो. त्या उपद्रवाते दिव्य, अंतरिक्ष, भौम, असे त्रिविध उत्पात सुचवितात ॥२॥
मनुष्यांच्या अविनयाने प्रतिकूल झालेले देव या उत्पाताते करतात. त्या उत्पातांच्या नाशार्थ राजाने राष्ट्रामध्ये शांति करवावी ॥३॥
ग्रह व नक्षत्रे यांना जो विकार तो दिव्य उत्पात होय. उल्का, निर्घात, महान्वायु, खळे, गंधर्वनगर, इंद्रधनुष्य ही होणे हा अंतरिक्ष उत्पात होय ॥४॥
नरस्थिरवस्तूंस झालेला भौम उत्पात होय. तो भौम उत्पात शांति केली म्हणजे शांत होतो; अंतरिक्ष शांतीने कमी होतो; दिव्यशांतीने शांत होत नाही असे कोणी ऋषि म्हणतात ॥५॥
बहुत सुवर्ण, अन्न, गाई, भूमी, यांच्या दानांनी दिव्यही उत्पात शांत होतो. तसाच शिवालयी व भूमीवर गाईच्या दोहनाने (दूध काढण्याने,) कोटिहोमांनीही दिव्य उत्पात शांति पावतो म्ह. शुभ होतो ॥६॥
दिव्य उत्पात स्वशरीर, पुत्र, भांडागार, अश्वादिवाहन, नगर, स्त्री, पुरोहित, देशांतील लोक व भृत्यवर्ग, या आठांच्याठाई राजास शुभाशुभफल देतो ॥७॥
शिवाचे लिंग, देवांच्या मूर्ती व स्थाने यांची निमित्तावाचून भंग, चलन, घर्म, रोदन, पतन, संभाषण, हसन इत्यादिक होतील तर राजा व देश यांचा नाश होतो ॥८॥
देवतोत्सवामध्ये गाडयाचा अक्ष (मध्यकाष्ठ,) चक्र, युग (जोखड,) ध्वज, यांचा भंग किंवा पतन अथवा परिवर्तन (फिरणे) मज्जन, आसक्ती (चिकटणे) ही होतील तर देश व राजा यास सुख होत नाही ॥९॥
ऋषि, धर्मदेश (जेथे स्वाभाविक कृष्णमृग फिरतात तो,) पितर, ब्रम्हादेव यांच्याठाई झालेले जे वैकृत ते पशूंस अशुभ होय ॥१०॥
बृहस्पति, शुक्र, शनैश्चर, यांपासून झालेले वैकृत उपाध्यायांस अशुभ विष्णूपासून झालेले वैकृत लोकांस अशुभ, स्कंद व विशाख (देवविशेष) यांपासून झा. वैकृत मांडलिक राजांस अशुभ होय ॥११॥
वेदव्यासापा. झा. वैकृत प्रधानास अशुभ. गणपतीस जे वैकृत ते लोकांच्या नाशार्य सांगितले ॥१२॥
देवांचे पुत्र, कन्या, स्त्रिया, सेवक यांस जे वैकृत ते अनुक्रमाने राजाच्या पुत्र, कन्या, स्त्रिया, सेवक यांस अनिष्ट होय ॥१३॥
राक्षस, पिशाच, यक्ष, नाग यांच्या पुरादि पूर्वोक्तांस जे वैकृत ते राजाच्या पुत्रादिकांस अशुभ होय या सर्व उत्पातांचे आठ महिन्यांनी शुभाशुभफल होते ॥१४॥
देववैकृत जाणून शुद्ध, तीन दिवस उपोषित व स्नान केलेला अशा उपाध्यायाने विकार झालेल्या प्रतिमेची स्नान, पुष्पे, गंध, वस्त्र, यांनीकरून पूजा करावी ॥१५॥
तसेच उपाध्यायाने मधुपर्क (दधि) भक्ष (मोदक, पोलिका, अपूपादिक) व बलि यांनीकरून यथाशास्त्र पूजन करावे. स्थालीपाक (चरू) याने तद्देवताचे यथाशास्त्र हवन करावे ॥१६॥
या पूर्वोक्त प्रकाराने देववैकृत झाले असता सात दिवस पूर्वोक्त शांति व ब्राम्हाण, देवगण (गणपतिप्रमुख) यांची पूजा व गीत, नृत्य, उत्साह यांनीकरून रात्री जागरण, हीसर्व ज्या राजांनी यथाशास्त्र केली त्यास दक्षिणादिकांनी रोधित (बंद केलेला) असा अशुभवैकृताचा पाक (फल) होत नाही ॥१७॥
॥ इतिलिंगादिवैकृतं ॥
ज्या राजाच्या देशामध्ये, अग्नि नसून ज्वाला दिसेल अथवा काष्ठयुक्त अग्नि असून प्रदीप्त (ज्वालायुक्त) होणार नाही; तर त्या राजास व त्या देशास पीडा होते ॥१८॥
उदक, माहिषादि मांस व कोणताही ओला पदार्थ यांचे ज्वलन झाले तर राजाचा वध होतो. खडगादि शस्त्र जर प्रज्वलित होईल तर भयंकर युद्ध होते. सैन्य, ग्राम, नगर यांत अग्नि नाहीसा होईल तर अग्निभय होते ॥१९॥
देवालय, गृह, तोरण (बाहेरचा दरवाजा,) ध्वज, कोठार इत्यादिक अग्नि नसून दग्ध झाली अथवा विजेने दग्ध झाली तर, सहा महिन्यानंतर निश्चयाने शत्रुचक्राचे येणे होईल ॥२०॥
अग्नीवाचून धूम उत्पन्न होईल व दिवसा धूळ व अंधकार होतील तर मोठे भय होते. निरभ्ररात्रीस नक्षत्रे दिसणार नाहीत व दिवसास दिसतील तर अशुभ होय ॥२१॥
नगर, चतुष्पाद, अंडज, मनुष्य यांस अग्नीचे प्रज्वलन, महान भय देते. शय्या, वस्त्र, केश यांच्याठाई धूम, अग्नि (ज्वाला,) अग्निकण हे पाहिले तर शय्यादिकांच्या स्वामीस मृत्यु होतो ॥२२॥
शस्त्राचे ज्वलन, गमन, शब्द, मेणांतून स्वत: बाहेर येणे, कंपन अथवा अन्य आयुधांची वैकृते होतील तर भयंकर युद्ध समीप आले असे सांगावे ॥२३॥
पूर्वोक्त अग्निवैकृत झाले तर क्षीरवृक्षाच्या समिधा, सर्षप, आज्य या द्रव्यांनी अग्निदैवत्यमंत्रांनी अग्नीमध्ये हवन करावे व ही अग्निवैकृते होतील तर ब्राम्हाणांस सुवर्णदानही करावे. याप्रकारे अग्न्यादिवैकृती शांति सांगितली ही केली असता शुभ होते ॥२४॥
॥ इत्याग्निवैकृतं ॥
वृक्षांची अकस्मात खांदी मोडली तर युद्धाचा उद्योग होतो. वृक्षाचे हसन (हसणे) झाले तर देशनाश होतो. वृक्षांनी रोदन केले तर बहुत रोग उत्पन्न होतात ॥२५॥
ज्या ऋतूंत जे वृक्ष फुलवयाचे ते वृक्ष तो ऋतु सोडून अन्यऋतूंत फुलतील तर देशनाश होतो. वृक्ष लहान (थोडया वर्षांचा) असून फार फुलेल तर बालवध होतो. वृक्षांपासून दुग्धस्राव होईल तर सर्वद्रव्यांचा नाश होतो ॥२६॥
वृक्षांपासून मद्यस्राव होईल तर अश्वादि वाहनांचा नाश होतो. रक्तस्राव होईल तर युद्ध होते. मध निघेल तर रोग होतो. तैलादिक निघेल तर दुर्भिक्षभय होते. उदक निघेल तर मोठे भय होते ॥२७॥
शुष्कवृक्षांस पल्लव येतील व रोगावाचून वृक्ष शुष्क होतील तर बल व अन्न यांचा नाश होतो. पडलेल्या वृक्षांचे स्वत:च (मनुष्यावाचून) उत्थापन (उभे राहणे) होईल तर दैवकृत भय होईल ॥२८॥
प्रधान (मोठा) वृक्षास स्वऋतूवाचून अन्यऋतूत पुष्पे, फले येतील अथवा वृक्षावर धूम किंवा ज्वाला होतील तर राजवध होतो ॥२९॥
वृक्ष चालतील किंवा भाषण करतील तर लोकांचा नाश होतो, वृक्षांच्या विकाराचे फल दहा महिन्यांनी होते ॥३०॥
ज्या वृक्षास विकार झाला असेल त्या वृक्षाची माला, सुगंधद्रव्ये, धूप, वस्त्र यांनी पूजा करून त्या वृक्षांवर छत्र ठेवून या वृक्षवैकृती रुद्रमंत्राचा जप करावा व रुद्रेभ्य:स्वाहा असा षडंगांनी होम करावा म्हणजे कल्याण होते ॥३१॥
व घृतयुक्तपायस व मध यांनी ब्राम्हाणभोजन राजाने करावे. येथे (वृक्षवैकृती) बाम्हाणास भूमि दक्षिणा द्यावी असे महर्षींनी सांगितले आहे ॥३२॥
॥ इतिवृक्षवैकृतं ॥
कमल, यव, गोधूम, कंगु इत्यादि धान्यांच्या एका देठावर दोन किंवा तीन केसरे येतील तर अथवा पुष्प व फल जुवळे होईल तर त्यांच्या स्वामीस मृत्यु होतो.
धान्यांची फारच वृद्धि (बहुत) होईल व एका वृक्षावर नाना प्रकारची फले व पुष्पे येतील तर, शत्रूंचे अकस्मात येणे होईल ॥३४॥
तिळाचे तेल अर्धे होईल अथवा तिळांचे तेलच येणार नाही. तसेच रसविरहित अन्न होईल तर मोठे भय होईल असे जाणावे ॥३५॥
विकार पावलेले जे पुष्प किंवा फल ते गावातून किंवा नगरातून बाहेर करावे आणि शांत्यर्थ सोमदैवत्य चरुहोम करावा अथवा पशूचा निर्वाप म्ह. बळि करावा ॥३६॥
धान्याच्याठाई विकार पाहून त्या धान्याचे क्षेत्रच प्रथम ब्राम्हाणास द्यावे व त्या क्षेत्रामध्येच भौमदैवत्य चरूहोम करावा. तेणेकरून त्या वैकृतापासून होणारे अशुभ होत नाही ॥३७॥
॥ इतिसस्यवैकृतं ॥
अवर्षण झाले असता दुर्भिक्ष होते. अतिवृष्टि झाली तर दुर्भिक्ष व शत्रू यांचे भय होते. वर्षाऋतूवाचून अन्यऋतूत अतिवृष्टि होईल तर रोगभय होते. अभ्र नसून अतिवृष्टि होईल तर राजाचा वध होतो ॥३८॥
शिशिरादिक ऋतु गणितागत प्रवृत्त झाले नसता, थंडी व उष्णता यांचा विपर्यास म्हणजे शिशिरऋतूत उष्णता व ग्रीष्मऋतूत थंडी, असे झाले तर, सहा महिन्यांनी राष्ट्रभय व दैवकृत रोगभयही होते ॥३९॥
वर्षाऋतूवाचून इतर ऋतूमध्ये सात दिवस अतिवृष्टि होईल तर मुख्यराजास मृत्यु होतो. रक्तवृष्टि होईल तर युद्धभय होते. मांस, अस्थि, मज्जा, घृत, तैल इत्यादिकांची वृष्टि होईल तर लोकमरण होते ॥४०॥
धान्य, सुवर्ण, वृक्षसाली, फले, पुष्पे, पाने इत्यादिकांची वृष्टि झाली तर जेथे वृष्टि होईल त्या नगराचा नाश होतो ॥४१॥
मेघावाचून उपला (गारा) वृष्टि होईल अथवा विकारयुक्त गर्दभ, उंट, अश्व, मार्जार, कोल्हे इत्यादि प्राण्यांची वृष्टि होईल अथवा अतिवृष्टि होईल अथवा अतिवृष्टि होत असता मध्ये अवर्षण होईल तर धान्यांस उपद्रव उत्पन्न होतो ॥४२॥
दूध, घृत, मध, दही, रक्त, उष्णोदक यांची वृष्टि होईल तर देशनाश जाणावा. रक्तवृष्टि झाली तर राजांचे युद्धही होते ॥४३॥
स्वच्छ सूर्य असून, छाया दिसणारा नाही अथवा छाया प्रतिकूल (पूर्वेस सूर्य असता पश्चिमेस छाया असावी ती पूर्वेकडेच) असेल, तर देशास महद्भय होईल असे जाणावे ॥४४॥
अभ्ररहित आकाशामध्ये, दिवसा किंवा रात्री पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे इंद्रधनुष्य ज्याकाळी दिसेल त्याकाळी मोठे दुर्भिक्षभय होईल ॥४५॥
सूर्य, चंद्र, पर्जन्य, वायु यांचे प्रीत्यर्थ वृष्टिविकारकाली याग (होम) करावा आणि धान्य, अन्न, गाय, सुवर्ण, यांची दक्षिणा ब्राम्हाणांस द्यावी तेणेकरून पाप (अशुभ) शांति (नाश) होते ॥४६॥
॥ इतिवृष्टिवैकृतं ॥
नद्यांचे, नगरापासून, दूर गमन होईल अथवा शुष्क न होणारी स्थले किंवार्हद (डोह,) तळी, नद्या ही शुष्क होतील तर नगर शून्य (मनुष्यरहित) होईल ॥४७॥
नद्यांतून तेल, रक्त, मांस ही पाण्यासारखी वाहतील अथवा नद्या थोडया गढूळ किंवा आल्या तिकडे परत जातील तर सहा महिन्यांनी शत्रूचे आगमन होईल असे त्या नद्या सांगतात ॥४८॥
कूपांस ज्वाला, धूम, क्वाथ (फेन,) रोदन, उदघोष (मोठाशब्द,) गायन, प्रजल्पित (बडबड) ही जर होतील तर लोकांचा नाश होतो ॥४९॥
खणल्यावाचून भूमीवर उदक उत्पन्न होईल किंवा उदकाच्या गंधाचा अथवा रसांचा विपर्यास म्ह. दुसर्याप्रकारचा गंध किंवा रस होईल अथवा उदकाधारांस विकृति (विहिरीचा तलाव इ.) होईल तर महद्भय होते. तेथेही वक्ष्यमाणशांति करावी ॥५०॥
उदकविकारी वरूणदैवत्यमंत्रांनी वरुणाची पूजा करावी व त्याच मंत्रांनी जप, अग्नीमध्ये होम, हे केले असता, अशुभाची शांति होते ॥५१॥
॥ इतिजलवैकृतं ॥
स्त्रियांस प्रसूत झालेल्या अपत्यास विकार (अन्यप्राणिसाद्दश्य) व दोन, तीन, चार इत्यादि अपत्ये एककाली होणे किंवा कमी दिवसांनी प्रसव अथवा अधिक दिवसांनी प्रसव, ही झाली तर देश व कुल यांचा क्षय होतो ॥५२॥
घोडी, उंटीण, महिषी, गाई, हत्तीण यांस जुंबळ होईल तर त्यांस मरण होते. हे प्रसूतिफल सहा महिन्यांनी होते. याच्या शांतीविषयी गर्गऋषिप्रोक्त २ श्लोक आहेत ॥५३॥
प्रसूतिवैकृत झालेल्या स्त्रिया हितेच्छूने अन्यदेशामध्ये पोचवाव्या. आणि ब्राम्हाणभोजन इच्छेप्रमाणे करावे व याविषयी शांतीही करावी ॥५४॥
घोडी, गाय इ. चतुष्पदांस प्रसूतिवैकृत होईल तर आपल्या समुदायातून अन्यभूमीवर पोचवाव्या म्हणजे कल्याण होते. असे केले नाही तर नगर, स्वामी व यूथ (कळप) यांचा नाशा होतो ॥५५॥
॥ इतिप्रसववैकृतं ॥
पशु, पक्षी यांचे, स्वजातीवाचून, अन्ययोनीच्याठाई अभिगमन (मैथुन) होईल तर ते अशुभ होय बैल बैलाचे स्तनपान करील अथवा कुत्रा वृषभाचे स्तनपान करील तर ॥५६॥
तीन महिन्यांनी शत्रुचक्र नि:संशय येईल असे जाणावे. त्या अशुभाचा नाश व्हावा म्हणून शांतीचे हे वक्ष्यमाण दोन श्लोक गर्गऋषीने सांगितले आहेत ॥५७॥
पशुवैकृती, त्या पशूंचा त्याग, अन्यदेशी गमन, ब्राम्हाणांस दान ही करावी म्हणजे शीघ्र कल्याण होते. या पशुवैकृती ब्राम्हाणसंतर्पण (पूजनादि,) जप, होम हीही करावी ॥५८॥
पुरोहिताने चरूने व पशूने (छागाने) प्रजापतीचे प्रज्ञापतिदैवत्यमंत्रांनी यजन करावे. त्यामध्ये बहुत अन्नाची दक्षिणा द्यावी ॥५९॥
॥ इतिचतुष्पदवैकृतं ॥
अश्वादि यान पुरुषादि वाहकावाचून चालेल किंवा वाहकयुक्त असून चालणार नाही अथवा चाके रूतली किंवा फुटली तर राष्ट्रभय होते ॥६०॥
ताडन केल्यावाचून वाद्याचा शब्द होईल अथवा ताडन केले असता शब्द होणार नाही किंवा अनेकप्रकारचे शब्द होतील तर शत्रू येईल अथवा राजास मुत्यु होईल ॥६१॥
आकाशामध्ये गायनाचा शब्द किंवा वाद्याचा नाद श्रवण होईल अथवा गाडा इ. चरपदार्थ हालणार नाही व वृक्षादि स्थिरपदार्थ चालेल तर मृत्यु किंवा रोग होतात. वाद्याचा शब्द विस्वर (दुसर्या प्रकारचा) होईल तर शत्रू पराजय करतील ॥६२॥
बैल, नांगरास संलग्न (चिकटणे) झाला अथवा पळी, सूप, उखळ, मुसळ इत्यादि गृहसंबंधी उपकरणे यांस विकार (अन्यस्वरूप किंवा हसन, गायन, रोदन इ.) होईल अथवा कोल्हयाच्या शब्दासारखा, पळी इत्यादिकांचा नाद होईल तर शस्त्रभय होते. या पूर्वोक्त उत्पाती ऋषिप्रोक्त वक्ष्यमाण शांति जाणावी ॥६३॥
या वायव्य उत्पाती राजाने सातूंनी वायुदेवतेचे पूजन करावे व पवित्र ब्राम्हाणांनी ‘आवायो:’ या पाच ऋचांचा जप करावा ॥६४॥
पायसाने ब्राम्हाणभोजन करावे व दक्षिणाही बहुत द्यावी. बहुत अन्न, दक्षिणा यांनीकरून मेहनतीने होमही करावे तेणेकरून शुभ होते ॥६५॥
॥ इति वायव्यवैकृतं ॥
गावातील पक्षी वनात जातील वं वनातील पक्षी गावात निर्भय प्रवेश करतील अथवा कावळे इ. दिवसा फिरणारे पक्षी रात्री फिरतील व घुभड इ. रात्री फिरणारे दिवसास फिरतील ॥६६॥
आरण्यपशु किंवा पक्षी सूर्योदयी किंवा सूर्यास्ती चक्राकारखे मंडळ करतील व जिकडे सूर्य असेल त्या दिशेकडे एकत्र जमून मोठा आक्रोशशब्द करतील तर ते भय उत्पन्न करतील ॥६७॥
कुत्रे (व श्येनपक्षी) रडल्यासारखे द्वारामध्ये शब्द करतील अथवा कोल्हे सूर्याभिमुख शब्द करतील किंवा कवडा अथवा घुबड राजगृहामध्ये प्रवेश करील ॥६८॥
प्रदोषकाली कोंबडा शब्द करील, हेमंतऋतूच्या आरंभी कोकिला शब्द करतील, श्येनादिक मांस खाणारे पक्षी आकाशामध्ये अप्रदक्षिण मंडल फिरतील तर, हे सर्व भय देणारे होतात ॥६९॥
गृह, चैत्य (मोठा वृक्ष,) तोरण, द्वार यावर पक्षिसमुदाय बसेल अथवा गृहादि पूर्वोक्तांवर मधु (मधाचे पोळे,) वारूळ, कमळ ही उत्पन्न होतील तर त्या गृहादिकांचा नाश होतो ॥७०॥
कुत्र्यांनी हाडे, मृतमनुष्याचा अवयव घरामध्ये आणला तर मृत्यु होतो व पशु, शस्त्रे ही मनुष्यासारखी बोलतील तर राजास मृत्यु होतो. या मृगपक्ष्यादि वैकृती ऋषिप्रोक्त वक्ष्यवमाण शांति आहे ॥७१॥
पूर्वोक्त मृगपक्षिविकारी दक्षिणासहित होम करावे. ‘देवा:कपोत’ या मंत्राचा पाच ब्राम्हाणांकडून जप करवावा ॥७२॥
‘सुदेवा’ या मंत्राचा जप एकब्राम्हाणाकडून करवावा. त्या ब्राम्हाणास गाई दक्षिणा द्याव्य. शाकुनसूक्ताचा जप करावा अथवा मनोमंत्राचा जप व वेदशिरस् (अथर्वशीर्ष इ.) यांचाही जप करावा ॥७३॥
॥ इतिमृगपक्षिवैकृतं ॥
इंद्रध्वज (अ. ४३,) इंद्रकील (द्वाराची खीळ,) खांब, द्वार यांचे पतन किंवा फुटणे: तसेच कपाट (दाराची दरकस,) तोरण, ध्वज याचे पतन किंवा फुटणे ही झाली तर राजास मृत्यु होतो ॥७४॥
उदयसंध्या व अस्तसंध्या यावेळी तेज असेल, अरण्यामध्ये अग्नीवांचून धूम उत्पन्न होईल, छिद्र नसून भूमीचे विदारण होईल व भूमिकंपही होईल तर भय उत्पन्न होते ॥७५॥
ज्या देशामध्ये, वेदबाहय व नास्तिक यांची भक्ति करणारा, चांगला आचार ज्याने सोडला असा, क्रोधस्वभावी, दुसर्याचा द्वेष करणारा, दुष्ट, सर्वकाल युद्धामध्ये ज्याचे चित्ता असा, राजा असेल त्या देशाचा नाश होतो ॥७६॥
जेथे मुले हातात शस्त्रे, लाकडे, दगड, घेऊन मारा, ओढा, तोडा, फोडा, असे शब्द करून, एकमेकांस प्रहार करतील तर, तेथेही शीघ्र भय होते ॥७७॥
ज्या गृही कोळसे, गेरू इत्यादिकांनी विरूपप्राणी किंवा मृतप्राणी यांची चित्रे लिहिली अथवा कोळसे इत्यादिकांनी गृहस्वामीचे विकृतचित्र लिहिले तर ते गृह शीघ्र नाश पावेल ॥७८॥
लूता (जालकार, कोळी) यांच्या तंतूच्या अवयवांनी (कोळिष्टकांनी) चित्रित, प्रात: सायसंध्यासमयी पूजित (शोभित) नाही, नित्य कलहयुक्त, कलहयुक्त, सर्वकाल उच्छिष्टस्त्रियांनी युक्त, असे जे गृह ते नाश पावते ॥७९॥
प्रत्यक्ष राक्षस पाहिले तर जवळ मरण आले असे समजावे. या सर्व उत्पातांच्या नाशार्थ गर्गऋषीने वक्ष्यमाण शांति सांगितली ॥८०॥
या उत्पाती गणशांतिप्रमुख महाशांति कराव्या व बलि द्यावे. उत्तम उत्तम भोजनार्थ अन्नेही द्यावी. आणि इंद्रणीसहवर्तमान इंद्राची पूजा करावी ॥८१॥
॥ इतिशक्रध्वजेंद्रकीलकादिवैकृतं ॥
राजाचा नाश व देशाचा नाश (शत्रूंनी देश लुटणे) हे असता व धूमकेतूचा (शेंडयेनक्षत्राचा) उदय झाला. अ., अथवा सूर्यचंद्रांचे ग्रहण झाले अ. उत्पात होतील तर त्या उत्पातांचे अशुभफल होत नाही व वक्ष्यमाण स्वऋतूतील उत्पातांचेही अशुभफल होत नाही ॥८२॥
जे ऋतुस्वभावकृत उत्पात, ज्या ऋतूमध्ये अशुभफल करीत नाहीत, ते ऋषिपुत्रकृत वक्ष्यमाण संक्षिप्त श्लोकांनी जाणावे ॥८३॥
वज्र (वीज,) अशनि (पाषाणवृष्टि किंवा उल्काभेद) (अ. ३३ श्लोक ४) भूमिकंप, संध्या (अ. ३०,) निर्घात शब्द (अ. ३९,) परिवेष (खळे,) धूलि, अरण्यामध्ये धूम, आरक्त सूर्याचे अस्त व उदय, ॥८४॥
वृक्षांपासून अन्न, रस, तैलादिस्नेह, बहुत पुष्पे व फले ही उत्पन्न होणे; गाई व वृषभ व पक्षी यांस मदवृद्धि (कामोत्पत्ति) ही चैत्र व वैशाख यांमध्ये (वसंतऋतूत) शुभ होत ॥८५॥
तारा व उल्का (अ. ३३ श्लो. ७।८) यांच्या पतनाने कलुष (गढूळ) झालेला पिंगटवर्ण आहे सूर्यमंडळ ज्यामध्ये असे, अग्नीवाचून ज्वाला, तेणेकरून शब्द, धूम, धूळ, वायु याणी आसमंतात व्याप्त असे ॥८६॥
तांबडया कमलासारखे ताम्रवर्ण, क्षृब्धसमुद्रासारखे, असे संध्यासमयी आकाश व नद्यांची उदके शुष्क होणे असे पाहून ग्रीष्मऋतूमध्ये शुभ सांगावे ॥८७॥
इंद्रधनुष्य, परीवेष (खळे,) वीज, शुष्कवृक्षांस पल्लव फुटणे, भूमीचे कंपन, परिवर्तन (फिरणे,) अन्यस्वरूप, शब्द, गमन, ही होणे; सरोवरांची वृद्धि, नद्यांचे उर्ध्वगमन. वापीकूपादिकांचे प्लवन (तरणे किंवा बूडीमारणे,) पर्वत व गृहे यांचे सरण (गमन) ही वर्षाऋतूमध्ये भयप्रद होत नाहीत ॥८८॥८९॥
अप्सरा, गंधर्व, विमान, आश्चर्य, यांचे दर्शन; गृह, नक्षत्रतारा यांचे दिवसास आकाशामध्ये दर्शन ॥९०॥
वन, पर्वत शिखरे यांच्याठाई गायन व वाद्ये यांचा शब्द होणे; धान्याची वृद्धि व उदकांची हानि (अल्पत्व) ही शरद्दतूमध्ये शुभ होत ॥९१॥
थंडी, वायु, बर्फ ही होणे; अरण्यपशु व पक्षी यांचा शब्द; राक्षस, यक्ष, भूत, प्राणी यांचे दर्शन; मनुष्यावाचून भाषण ॥९२॥
आकाश, वन, पर्वत, दिशा ही धूम व अंधकार यांनी व्याप्त होणे; सूर्याचे उदय व अस्त हे उच्चस्थानापासून होणे ही सर्व हेमंतऋतूमध्ये शुभ होते ॥९३॥
बर्फ पडणे, वायु सुटणे, विरूप व आश्चर्य याचे दर्शन, काळ्या काजळासारखे व तारा, उल्का यांच्या पतनाने चित्रित, असे आकाश होणे ॥९४॥
स्त्रिया, गाई, मेंढे, अश्व, अरण्यपशु, पक्षी यांच्याठाई नानाकारचे म्ह. बहुत गर्भ होणे; वृक्षांची पाने, अंकुर, वल्ली यास विकार होणे; हे सर्व शिशिरऋतूमध्ये शुभ होय ॥९५॥
ऋतुस्वभावज हे उत्पात त्या त्या ऋतूंमध्ये पाहिले तर शुभ होत. स्वऋतूवाचून अन्यऋतूत पाहिले तर हे उत्पात फार अशुभफल देतात ॥९६॥
उन्मत्तांच्या ज्या गाथा (प्राकृत भाषणे) ती, शिशूंची जी भाषणे ती व स्त्रिया जे भाषण करतील ते, या सर्व भाषणाचा व्यतिक्रम होत नाही म्ह० ते सत्य होते ॥९७॥
ही वाणी प्रथम देवांमध्ये होते, नंतर मनुष्यांप्रत येते. ही वाणी अप्रेरित बोलत नाही यास्तव ही सरस्वती (वाग्देवता) सत्य आहे ॥९८॥
या उत्पातांते ग्रहगणितावाचूनही जो पुरुष जाणतो तो कीर्तिमान व राजास प्रिय होतो. हे गोप्यही मुनिवचन सांगितले, जे जाणणारा मनुष्य, त्रिकालदर्शी (भूत, भविष्य, वर्तमान या तीन काळांचा जाणणारा) असा, होतो ॥९९॥
॥ इतिबहत्संहितायांउत्पातलक्षणंनामषट्चत्वारिंशोध्याय: ॥४६॥