बकर्याचे शुभाशुभलक्षण सांगतो. ८।९।१० दातांचे बकरे शुभ होत. ते घरात बाळ्गावे. सात दातांचे बाळगू नयेत ॥१॥
पांढर्या बकर्याच्या उजव्या बाजूस मध्यभागी काळे मंडल (वर्णुळाकृति) शुभ होत. ऋष्य म्ह० मृगवि० त्यासारख्या नीलरंगाचे, काळे व लोहितवर्ण अशा बकर्यांच्याही उजव्या‘ बाजूस पांढरे मंडल शुभसूचक होय ॥२॥
बकर्यांच्या कंठाच्या ठाई स्तनासारखा जो लोंबतो तो मणि जाणावा. तो एक मणि शुभसूचक व दोन तीन मणि कंठाच्या ठाई ज्यांच्या असतील ते अतिशुभफल देणारे होत ॥३॥
मुंड (शिंगांनी रहित) बकरे, कोणत्याही रंगाचे असोत ते सर्व शुभ होत. सर्व पांढरे, सर्वांग काळे, अर्धे काळे, अर्धे पांढरे, अर्धे कपिल (पिंगट) ज अर्धे काळे असे बकरेही शुभ होत ॥४॥
जो बकरा कळपाच्या पुढे जातो तो व प्रथम (सर्वाचे आदी) उदक पितो तो, व ज्याच्या मस्तकावर टिक्किका (टिकले) असतात तो, हे सर्व शुभ होत. असा बकरा कुट्टक सं० होय ॥५॥
बिंदुयुक्त कंठ किंवा मस्तक ज्याचे असा, तिलपिष्टतुल्य (श्वेतकृष्णमिश्रित) वर्ण, तांबडया डोळ्यांचा जो बकरा तो शुभ. पांढरा असून काळ्या पायांचा शुभ. अथवा काळा असून पांढर्या पायाम्चा जो बकरा तो शुभ होय. हा कुटिलसंज्ञक होय ॥६॥
जो बकरा काळ्या आंडाचा, श्रेतवर्ण, मध्यभागी काळा पट्टा व जो हळू हळू शब्द करुन चरतो तोही शुभ होय. तो जटिल सं० ॥७॥
नीलवर्ण मस्तकावरील केश व पाय ज्याचे असा बोकड शुभ. अथवा पूर्वभागी (मस्तकाकडे अर्धा) पांढरा व मागे नीलवर्ण तोही शुभ होय. तो वामन सं० छाग होय. याविषयी गर्गऋषीने श्लोकही सांगितला आहे तो पुढे सांगतो ॥८॥
कुट्टक, कुटिल, जटिल, वामन, या चार नावाचे बकरे लक्ष्मीचे पुत्र होत, ते दरिद्री मनुष्याकडे राहात नाहीत ॥९॥
गाढवासारख्या शब्दाचे, वाकडे व अत्युष्ण आहे पुच्छ ज्यांचे असे, वाईट नखांचे, विवर्ण (अशुभवर्ण,) छिन्नकर्ण (तोडल्यासारखे कर्ण,) ह्त्तीसारख्या मस्तकाचे, तालु व जिव्हा ही काळी ज्यांची, असे बकरे अशुभ होत ॥१०॥
पूर्वोक्त प्रशस्त (शुभ) वर्ण, १,२,३, आणि (गलस्तन) यांनी युक्त, मुंड (शृंगरहित) व तांबडया डोळ्यांचे असेजे बकरे ते मनुष्यांच्या घरात सौख्ये, यश, लक्ष्मी याते करतात ॥११॥
॥ इतिश्रीवराहमिहिरकृतौबृहत्संहितायांछागलक्षणंनामपंचषष्टितमोध्याय: ॥६५॥