पसरलेले, वायूने वर्तुळ झालेले, अनेक रंगांचे व अनेक आकारांचे सूर्यचंद्राचे किरण, थोडया अभ्राने युक्त अशा आकाशामध्ये दिसतात ते परिवेष होत ॥१॥
ते रक्तादिवर्ण परिवेष इंद्रादिकृत होत. म्ह. रक्तवर्ण परिवेष इंद्रकृत, नीलवर्ण यमकृत, ईषत्शुक्ल वरूणकृत, काळापांढरा निऋतिकृत, मेघवर्ण वायुकृत, कृष्णश्वेत शिवकृत, हरिद्वर्ण ब्रम्हाकृत, शुभ्रवर्ण अग्निकृत, याप्रकारे परिवेष जाणावे ॥२॥
कुबरे, मयूरकंठाच्या रंगासारखा परिवेष करितो. अन्यही इंद्रादिदेव परस्परांच्या वर्णांचा आश्रय करितात यास्तव ते परिवेष अनेकवर्ण दिसतात. जो परिवेष वारंवार नाहीसा होतो तो वायुकृत अल्पफल देणारा होय ॥३॥
संपूर्णवृत्त, निर्मल, नीलादिवर्णांचा परिवेष शिशिरादि रुतूंमध्ये कल्याण व सुभिक्षकारक होय. म्ह. नीलवर्ण शिशिरऋतूंत, विचित्रवर्ण वसंतात, शुक्लवर्ण ग्रीष्मात, तैलवर्ण वर्षाऋतूत, दुग्धवर्ण शरद्दतूत, उदकवर्ण हेमंतऋतूत, हे वर्ण हया ऋतूंत शुभ होत ॥४॥
सर्व आकाशामध्ये फिरणारा (उदयापासून अस्तापर्यंत राहणारा,) अनेकवर्ण, रक्तासारखा, रखरकीत, तुटलेला, गाडा व धनुष्य व धनुष्य व चतुष्यथ (चवाठा) यांसारखा, परिवेष अशुभ होय ॥५॥
मयूरकंठसहश परिवेष असता अतिवृष्टि होते. बहुतवर्णांचा अ० राजवध, धूम्रवर्ण अ० भय, इंद्रधनुष्यासारखा व अशोकपुष्पासारखा अ० युद्धे, ही होतात ॥६॥
शिशिरादि ऋतूंमध्ये चाषादिवर्ण (श्लो० ४० परिवेष जर एकवर्णाचा, काळा, स्निग्ध, सुर्यासारख्या अभ्रांनी व्याप्त, असा असेल तर तत्काल (त्याचदिवशी) वृष्टि होते व जो पीतवर्ण व ज्यात तप्तसूर्य असाही परिवेष तत्काल वृष्टि करितो ॥७॥
ज्या परिवेषकाली सूर्याभिमुख राहून पक्षी व अरण्यपशु रोदनशब्द करितात तो, गढूळ, उदय मध्यान्ह अस्त या तीन संध्यासमयी उत्पन्न झालेला, अतिविस्तीर्ण, असा परिवेष भयकारक होय. वीज व उल्का व त्रिविध उत्पात यांनी ताडित असा परिवेष शस्त्राने राजाचा वध करितो ॥८॥
प्रतिदिवशी दिवसरात्री आरक्त व परिवेषयुक्त सुर्यचंद्र असतील तर राजवध होतो. तसेच परिवेषयुक्त चंद्रसूर्य वारंवार राजाच्या जन्मलग्नी किंवा सप्तमस्थानी असतील तर त्या राजाचा वध होतो ॥९॥
दोन मंडलांचा परिवेष सेनापतीस भय करितो व फार शस्त्रभय करीत नाही. तीन चार इत्यादि मंडलांचा परिवेष शस्त्रभय, युवराज (राजा असता राज्यकारभार करणारा राजपुत्र) यास भय व नगराचा रोध शत्रूकडून करितो ॥१०॥
तीन चार इत्यादि मंडलांचा परिवेष झाला तर तीन दिवसांनी वृष्टि होते. ग्रह, चंद्र व नक्षत्र यांचा परिवेषाने निरोध झाला तर युद्ध होते. राजाचे जन्मलग्न व जन्मराशि यांचे स्वामी व जन्मनक्षत्र ही परिवेषाने रोधिली तर राजास अशुभ होय ॥११॥
परिवेषमंडलात शनि असेल तर क्षुद्रधान्य (कांग इ०) यांचा नाश होतो, वातयुक्त वृष्टि होते, वृक्षादि स्थावर व शेतीलोक यांचा नाश होतो ॥१२॥
परिवेषगत भौम अ० बालक, सैन्यपति, सैन्ये ही दु:खी होतात व शस्त्रभय होते. परिवेषगत बृहस्पति अ० पुरोहित, प्रधान, राजे यांस पीडा होते ॥१३॥
परिवेषगत बुध अ० प्रधान, वृक्ष, लेखक, यांची वृद्धि होते व उत्तम वृष्टिही होते ॥१४॥
परि० शुक्र अ० यायी (प्रवासी), क्षत्रिय, राजस्त्री, यांस पीडा व दुर्भिक्ष ही होतात ॥१४॥
परि० केतु अ० दुर्भिक्ष, अग्नि, मृत्यु, राजा, शस्त्र, यांपासून भय होते. परि० राहु अ० गर्भभय, रोग, राजभय, ही होतात ॥१५॥
सूर्याच्या किंवा चंद्राच्या परिवेष मध्ये दोन ताराग्रह असतील तर युद्धे होतील व तीन ग्रह असले तर दुर्भिक्ष, अवर्षण, यांचे भय होईल ॥१६॥
सूर्यचंद्रांच्या परिवेषामध्ये चार ग्रह असले तर प्रधान व उपाध्याय यांसहवर्तमान राजा मृत्युवश होतो. पांच सहा ग्रह सूर्यचंद्रपरिवेषमंडलस्थ असतील तर सर्व जगतास प्रलयासारखे दु:ख होईल ॥१७॥
चंद्रसूर्यांवांचून निराळ्याच भौमादिग्रहांस किंवा नक्षत्रांस जर परिवेष उत्पन्न होईल तर राजाचा वध होतो. केतूदय झाला तर त्याचेमात्र फल होते ताराग्रह व नक्षत्र यांचे वर सांगतलेले परिवेषफल होत नाही ॥१८॥
प्रतिपदादि चार तिथींस परिवेष दिसेल तर अनुक्रमाने ब्राम्हाण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांचा नाश होतो. पंचमीस एकजातीच्याच लोकांचा, षष्ठीस नगराचा, सप्तमीसस जामदारखान्याचा नाश होतो ॥१९॥
अष्टमीस युवराजाचा, नवमी, दशमी, एकादशी या तीन तिथींस राजाचा नाश होतो. द्वादशीस नगररोध, त्रयोदशीस सैन्यक्षोभ होतो ॥२०॥
चतुर्दशीस परिवेष होईल तर राजस्त्रियेचा व पौर्णिमेस राजाचाच नाश होतो ॥२१॥
तीनवर्णांच्या परिवेषाच्या तीन रेषा दिसतात त्यांमध्ये आतली रेषा नगरसंबंधी राजांची, बाहयरेषा यायी (मार्गस्थ) राजांची, मध्यरेषा आक्रदसारांची (दु:खितराजांची) होय ॥२२॥
ज्यांची रेषा रक्त, श्याम, रूक्ष असेल त्यांचा पराजय व ज्यांची स्निग्ध, श्वेत, प्रकाशित असेल त्यांचा जय होतो ॥२३॥
॥ इतिबृहत्संहितायांपरिवेषलक्षणंनामचतुस्त्रिंशोध्याय: ॥३४॥