चंद्रसूर्य हेच आहेत नेत्र ज्याचे असा, कमलनयनी भगवान नारायण नेत्र उघडीत असता, अश्व, हत्ती, मनुष्य यास नीराजनादि अथवा नीरांजन (उदकाचे अंजन म्हणजे स्पर्श) विधि करावा ॥१॥
कार्तिकशुक्लपक्षी, द्वादशी, अष्टमी, पौर्णिमा या तिथीस अथवा आश्विनशुद्ध पक्षी या तिथीस नीराजनसंज्ञक शांति करावी ॥२॥
नगराच्या ईशानीस शुद्धभूमीच्याकाठाई यज्ञवृक्षाचे सोळा हात उंच व दहा हात रुंद असे तोरण करावे ॥३॥
सर्ज (सालवृक्ष,) उंबर, ककुम्भ (अर्जुनसादडा) या वृक्षांचे, वेळूंनी निशित जे मत्स्य, ध्वज, चक्रे यांनी सुशोभित आहे द्वार ज्याचे, असे शांति करण्याकरिता गृह बांधावे ॥४॥
प्रतिसर (कुंकुमरंजित सूत्र अथवा पीतवर्ण सूत्र) याने बिबा, साळी, कोळीजन, गौरसर्षप, हे बांधून शांतिगृहामध्ये नेलेल्या अश्वांच्या पुष्टयर्थ कंठामध्ये ही माळ बांधावी ॥५॥
सूर्य, वरुण, विश्वदेव, ब्रम्हा, इंद्र, विष्णु यांच्या मंत्रांनी, सात दिवस शांतिगृहामध्ये ठेविलेल्या अश्वांची शांति करावी ॥६॥
या पूजित अश्वांस अशुभ शब्द बोलू नये व ताडनही करू नये. मांगलिक शब्दांनी व शंख, वाद्य यांचे शब्द व गीतशब्द यांनीकरून ते अश्व भयरहित करावे ॥७॥
अष्टमदिवशी त्या पूर्वोक्त तोरणाचे दक्षिणेस उदङमुख गृह करून, ते दर्भ व वल्कले याही वेष्टित करून, त्याच्या पुढे वेदीमध्ये अग्निस्थापन करावे ॥८॥
चंदन, कोष्ठकोळिजन, मंजिष्ठ, हरताळ, मनशीळ, गवला, वेखंड, दांती, गुलवेल, काळीकापशी, हळद, सुवर्णपुष्प, नरवेल ॥९॥
पांढरीगोकर्णी, पूर्णकोशा, पुनर्नवा, त्रायमाण, वाघांटीची वेल, पिवळी जुई, कुइली, शतावरी, सोमवल्ली ॥१०॥
हया औषधि कलशामध्ये घालून, तो मध्ये ठेवून मध, पायस, गहू हे पदार्थ ज्यामध्ये बहुत अशा नानाप्रकारच्या भक्ष्यपदार्थांचा यथाविधि बलि द्यावा.
खैर, पळस, उंबर, शिवण, अश्वरत्थ, यांच्या समिधा असाव्या. सोने किंवा रुपे यांची स्रुचि, ऐश्वर्येच्छु राजाने करावी ॥१२॥
अश्व, वैद्य, दैवज्ञ यांनी सहित श्रीमान राजाने व्याघ्रचर्मावर अग्निसमीप पूर्वाभिमुख बसावे ॥१३॥
यात्रा, ग्रहयज्ञ, इंद्रध्वज यांच्याठाई जे वेदी, पुरोहित व अग्नि यांचे लक्षण सांगितले आहे ते दैवज्ञाने येथेही पहावे ॥१४॥
कृतदीक्ष, स्नापित, ताम्रोष्ठतालुवदनादि लक्षणयुक्त अश्व व हत्ती यांची अहत म्ह० कोरे व श्वेतवस्त्र, गंध, माला, धूप इत्यादिकानी पूजा करून ॥१५॥
गृहतोरणाच्या जवळ वाणीने सांत्वन करून (चुचकारित) हळुहळू आणावा. त्यावेळी वाद्ये, शंख, मंगलशब्द यांनी दिशा पूर्ण कराव्या ॥१६॥
तो आणलेला घोडा व हत्ती उजवा पाय उचलून उभा राहील तर, तो राजा यत्नावाचून शत्रूते शीघ्र जिंकील ॥१७॥
तो घोडा व हत्ती त्रास पावेल तर राजास शुभ नव्हे. त्या हत्ती व घोडयांचे परिशेषलक्षण, यात्रेमध्ये सांगितले आहे ते येथे यथायुक्ति पहावे ॥१८॥
पुरोहिताने अन्नाचा पिंड अभिमंत्रण करून घोडयाचे तोंडाजवळ न्यावा; त्या पिंडास घोडा हुंगील किंवा भक्षण करील तर तो घोडा राजास जय करणारा होतो. हुंगणार नाही व भक्षणही करणार नाही तर राजाचा पराजय होईल ॥१९॥
पूर्वी औषधिमिश्रित स्थापितकुं भजलामध्ये उंबराची खांदी भिजवून शांतिकपौष्टिकमंत्रांनी अश्व, राजा, हत्ती, सेना यास स्पर्श करावा ॥२०॥
ही शांति राज्यवृद्धीकारणे करून, पुन: आभिचारिक आथर्वणमंत्रांनी मृन्मय शत्रुमूर्ति, ब्राम्हाणाने उरस्थली काष्ठाचे शुलाने भेदन करावी ॥२१॥
पुरोहिताने लगाम अभिमंत्रून घोडयास द्यावी, नंतर राजाने वर बसून, नीराजित (आरती केलेला) होत्साता त्याणे सैन्यसहित ईशानीकडे जावे ॥२२॥
मृदंग, शंख यांच्या शब्दांनी आनंदित जे हत्ती, त्यांचा गळ्णारा जो मद, त्याच्या सुगंधाने सुगंधित वायुयुक्त; मस्तकांतील मुकुटमण्यांच्या समुदायाने चंचल प्रभांनी शरद्दतूंतील प्रज्वलित सूर्यासारखा ॥२३॥
इतस्तत: पडणार्या हंसपंक्तींनी जसा पर्वत शोभतो तसा श्वेतचवर्यांनी शोभणारा, गंधयुक्त वाहणार्या वायूंनी कंपित आहेत सुंदर माला व वस्त्रे ज्याची असा ॥२४॥
बहुतवर्णांचे मणि व हिरे यांनी भूषित व मुकुट, कुंडले, बाहुभूषणे यांनीकरून भूषित; नानाप्रकारच्या रत्नकिरणांनी शोभित इंद्रधनुष्याच्या तेजाते धारण करणारा ॥२५॥
आकाशाप्रत उड्डाण करणार्या अश्वांनी व भूमीते विदारण करणार्या हत्तींनी, जिंकिले आहेत शत्रू ज्यानी अशा देवांसारख्या मनुष्यांनी वेष्टित इंद्रासारखा राजा शत्रूवर गमन करो ॥२६॥
अथवा हिरे, मौक्तिके यांनी भूषित, श्वेतपुष्पमाला, मुकुट, विलेपन, वस्त्र यांनी युक्त, छत्रयुक्त, हत्तीवर बसलेला जसा मेघमंडलावर चंद्राचे खाली शुक्र दिसतो तसा दिसणारा राजा गमन करो ॥२७॥
आनंदयुक्त आहेत मनुष्य (शिपाई,) अश्व, हत्ती ज्याचे असे, स्वच्छ आयुधांच्या किरणांनी देदीप्यमान, निर्विकार (उत्पातरहित,) शत्रुपक्षास भयंकर दिसणारे, असे ज्या राजाचे सैन्य तो राजा शीघ्र पृथ्वीते जिंकील (विजयी होईल) ॥२८॥
॥ इतिबृहत्संहितायांनीराजनविधिर्नामचतुश्चत्वारिंशोध्याय: ॥४४॥