वायूने अवरुद्ध, अनेक रंगांचे सूर्यकिरण, मेगयुक्त आकाशामध्ये धनुष्याकार दिसतात; ते इंद्रधनुष्य होय ॥१॥
अनंतनामक नागराजाच्या कुलातील सर्पांच्या नि:श्वासापासून इंद्रधनुष्य उत्पन्न होते; असे कोणी काश्यपादि आचार्य म्हणतात. ते इंद्रधनुष्य शत्रूंवर गमन करणार्या राजांस सन्मुख असेल तर, पराजयकारक होते ॥२॥
ते इंद्रधनुष्य अखंड, भूमीस लागलेले, तेजस्वी, सुकांति, दाट, नानाप्रकारच्या रंगांनी युक्त, एकाखाली एक असे दुसरे मार्गस्थराजाच्या पृष्ठभागी राहिलेले, असे असेल तर ते शुभ व उदकही देते ॥३॥
इंद्रधनुष्य विदिशेस उत्पन्न होईल तर त्या दिशेच्या राजाचा नाश करिते. अभ्र नसून, इंद्रधनुष्य होईल तर, मृत्यु होईल. पाटल, पीत, नील हे वर्ण असतील तर, अनुक्रमाने शस्त्र, अग्नि, दुर्भिक्ष यांचे भय होते ॥४॥
इंद्रधनुष्य जलामध्ये दिसेल तर अवर्षण, भूमीवर दि० तर धान्यनाश, वृक्षावर दि० तर रोगभय, वल्मीक (वारूळ) यावर दिसेल तर शस्त्रभय, रात्री दिसेल तर प्रधानवध ही होतात ॥५॥
पाऊस नसता पूर्वेकडे इंद्रधनुष्य दिसेल तर वृष्टि होईल; वृष्टि होत असता दिसेल तर, वृष्टि बंद होईंल; पश्चिमेकडे इंद्रधनुश्य दिसेल तर वृष्टि होते ॥६॥
इंद्रधनुष्य रात्री पूर्वेकडे दिसेल तर, राजास पीडा होते. दक्षिणेस दि० तर सेनापतीचा नाश होतो. पश्चिमेकडे दि० तर श्रेष्ठपुरुषाचा नाश होतो. उत्तरेकडे दिसेल तर, प्रधानाचा नाश होतो ॥७॥
इंद्रधनुष्य रात्री श्वेत, रक्त, पीत, कृष्ण या चार वर्णांचे दिसेल तर अनुक्रमाने ब्राम्हाणादि चार वर्णांस पीडा करिते व ज्या दिशेकडे दिसते त्या दिशेकडील मुख्य राजाचा शीघ्र नाश होतो ॥८॥
॥ इतिबृहत्संहितायांइंद्रायुधलक्षणंनामपंचत्रिंशोध्याय: ॥३५॥