मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय ६०

बृहत्संहिता - अध्याय ६०

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


उत्तर किंवा पूर्व या दिशांस ज्ञात्यांनी अधिवासन (मूर्तीची स्थापनाच्या पूर्व दिवशी पूजा इ० करणे) याचा मंडप, चार तोरणांनीयुक्त व प्रशस्त (यज्ञिय) वृक्षांच्या पल्लवांनी आच्छादित असा करावा ॥१॥

मंडपाच्या पूर्वदिशेकडे चित्रवर्ण माला व पताका सांगितल्या, आग्नेयीस तांबडया, दक्षिणेस व निऋतीस काळ्या ॥२॥

पश्चिमेस पांढर्‍या, वायव्येस थोडया पांढर्‍या, उत्तरेस चित्रवर्ण, ईशानीस पीतवर्ण अशा माला व पताका कराव्या ॥३॥

काष्ठाची अथवा मृत्तिकेची प्रतिमा आयुष्य, लक्ष्मी, बल, जय देते. हीरकादि मणिमय प्रतिमा लोककल्याण करिते. सुवर्णाची प्र० पुष्टी करिते ॥४॥

रुप्याची प्र० कीर्ती करिते तांब्याची प्र० प्रजावृद्धि करिते. पाषाणाची प्रतिमा अथवा लिंम मोठया (बहुत) भूमीचा लाभ करिते ॥५॥

शंकूने (शस्त्राचे टोकीने) उपहत (दुखावलेली) प्रतिमा मुख्यपुरुष कुल यांचा नाश करिते. श्वभ्रा (खळगा) ने उपहत जी प्रतिमा ती सार्वकाळ रोग व उपद्रव करिते ॥६॥

मंडपामध्ये भूमि सारवून वाळू व दर्भ आस्तरण (हे घालून) भद्रासन (राजासन) यावर मस्तक करून उशीवर पाय अशी प्रतिमा ठेवावी ॥७॥

प्लक्ष (पाईर,) पिंपळ, उंबर, शिरस, वड, या वृक्षांच्या पल्लवांनी युक्त तापवलेले जल व मांगल्यसंज्ञक दर्भादि सर्वौषधि (जया, जयंती, जीवपुत्रा, पुनर्नवाणुक्रांता, अभया, विश्वेश्वरी,  सहा, सहदेवा, पूर्णकोशा, शतावरी अ० ४८ ३९।४० पहा) यांनीकरून, गज व वृक्षभ यांनी उकरलेली; पर्वत, वारूळ, नदीसंगमाचे तीर, कमलयुक्त तळे यांच्या मृत्तिका, पंचगव्य, तीर्थजले, यानी करून; सुवर्ण व रत्नांनीयुक्त सुगंधिजलांनी ॥८॥९॥

पूर्वेकडे मस्तक करून घाव घालावे. त्यावेळी नानाप्रकारच्या वाद्यांचे व पुण्याहवाचनाचे व वेदांचे शब्दघोष होत असावे ॥१०॥

पूर्वदिशेस इंद्रदैवत्य मंत्रांचा व आग्नेयीस अग्निदैवत्य मंत्रांचा जप श्रेष्ठब्राम्हाणांनी करावा; व त्या ब्राम्हाणांची दक्षिणादिकांनी पूजा करावी ॥११॥

ज्या देवाची स्थापना करावयाची तल्लिंगक मंत्रांनी अग्नीत ब्राम्हाणांनी हवन करावे. त्यावेळी अग्नीची निमित्ते मी पूर्वी (अ० ४३ श्लो० ३२) इंद्रध्वज उभारतेवेळी जी सांगितली ती येथेही पहावी ॥१२॥

धूमाने व्याप्त, ज्वालांनी डावा फिरणार, वारंवार स्फुलिंग (ठिणग्या) करणार असा अग्नि शुभ नव्हे. तसाच हवनकर्त्या पुरोहिताच्या स्मरणाचा नाश किंवा मागे सरणे अशुभ सांगितले ॥१३॥

स्नान घातलेली, नव्यावस्त्राने युक्त, उत्तम अलंकृत, पुष्पे, गंध, धूप इत्यादिकांनी पूजित, अशी प्रतिमा चांगली बिछाना घातलेला अशा शय्येच्याठाई प्रतिष्ठापकाने स्थापन करावी ॥१४॥

त्या निजलेल्या प्रतिमेते उत्तम नृत्य व गायनपूर्वक जागरकानी करून, उत्तमप्रकारे अधिवासन पूर्वी करून नंतर ज्योतिष्याने उक्तमुहूर्ती त्या प्रतिमेचे स्थापन करावे ॥१५॥

त्या प्रतिमेची पुष्पे, वस्त्रे, गंधादि यांनी पूजा करून शंख व वाद्ये यांचा शब्द होत असता, अधिवासनमंडपातून निघून देवालयाच्या उजवीकडून ती प्रतिमा प्रतिष्ठापकाने गाभार्‍यात न्यावी ॥१६॥

नंतर पुष्कळ बळि करून सभ्य ब्राम्हाण यांची पूजा करून बैठकीच्या खळग्यात सुवणखंड घालून त्या खळग्यात प्रतिमा स्थापन करावी ॥१७॥

त्यावेळी स्थापनकर्ता ब्राम्हाण, दैवज्ञ, ब्राम्हण, कसबी (सुतार इ०) यांची विशेष पूजा करावी. असे प्रतिमास्थापन केले म्हणजे तो यजमान कल्याणांचा भोक्त यालोकी व परलोकी स्वर्गवास करणारा असा होतो ॥१८॥

विष्णूचे संस्थापक भागवत,  सूर्याचे मगसंज्ञक ब्राम्हाण, शिवाचे भस्मधारणकर्ते (पाशुपत,) ब्राम्हायादि मातृगणांचे मातृमंडलवेत्ते, ब्रम्हायाचे ब्राम्हाण, सर्व हिताचे (बुद्धाचे) सांतमन जे शाक्य (रक्तवस्त्राधारी) ते, जिनांचे नग्न (क्षपणिक) संस्थापक जाणावे. ज्या देवाचा ज्यांनी आश्रय स्वकीयशास्त्राने केला त्यांनी त्या देवाची क्रिया (स्थापनादिकर्म) करावी ॥१९॥

उत्तरायणी, शुक्लपक्षी, शिशिरऋतूंत बृहस्पतीच्या गृह, होरा, द्रेष्काण, नवमांश, द्वादशांश, त्रिशांश, या षडवर्गी चंद्र असता, स्थिरलग्नी, स्थिरांशी लग्नापासून ५।९।१।४।७।१० या स्थानी शुभग्रह व ३।६।१०।११ या स्थानी, पापग्रह असता, ध्रुव (तीन उतरा व रोहिणी,) मृदु (मृग, रेवती, चित्रा, अनुराधा,) श्रवण, पुष्य, स्वाती, या नक्षत्री; भौमावाचून ६ वारी, कर्त्यास शुभकर अशा दिवशी देवांची प्रतिष्ठा (स्थापन) शुभ होय ॥२०॥२१॥

हे प्रतिष्ठापन, संक्षेपाने सर्व देवांचे एकच, लोकांस कल्याणकारक असे मी केले. ही अधिवासन व प्रतिष्ठाने, सावित्रशास्त्री सर्व देवांची भिन्नभिन्न व विस्तृत सांगितली आहेत ॥२२॥


॥ इतिबृहत्संहितायांप्रतिष्ठापनंनामषष्टितमोध्याय: ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP