अर्कचारामध्ये सुर्याचे जे शुभाशुभफल सांगितले ते सर्व १५ दिवसांनी होते. चंद्राचे एक महिन्याने होते मंगळाचे फल तद्वक्रमुष्णमुदये इ० ग्रंथाने (अ० ६ श्लो० १) सांगितले. बुधाच्या शुभाशुभाचे फल तो द्दष्टीस पडत आहे तेथपर्यंत होते. गुरूचे एक वर्षाणे होते. शुक्राचा सहा महिन्यांनी पाक (फल) होतो. शनीचा एक वर्षाने होतो. राहूचा ६ महिन्यांनी होतो. सूर्यग्रहणाचा वर्षाने होतो. त्वाष्ट व कीलक या केतूंचा तत्काल (त्याच दिवशी) पाक होतो. धूमकेतूचा ३ महिन्यांनी होतो. श्वेतकेतूचा ७ दिवसांनी पाक होतो. खळे, इंद्रधनुष्य, संध्याभ्रसूचन यांचा ७ दिवसांनी पाक होतो ॥१॥२॥३॥
शीत व उष्ण यांचा विपर्यास (शीतकाली उष्णता व उष्णकाली शीतता; अथवा स्वभावाने शीत पदार्थ उष्ण होणे इ०,) अकाली फले व पुष्पे येणे, दिकदाह, स्थिर व चर पदार्थांचे अन्यत्व (वृक्षादि स्थिरपदार्थ चर होणे इ०,) प्रसवविकार यांचे शुभाशुभफल सहा महिन्यांनी होते ॥४॥
कर्त्याने केले नसताही होणे, भूमिकंप, प्राप्त उत्सासहाचे अकरण, फार अशोभ, शुष्क न होणार्यांचा शोष, नदी इत्यादिकांचा प्रवाह दुसरीकडे जाणे, यांचे फल ६ महिन्यांनी येते ॥५॥
स्तंभ, कुसूल (कोठार,) प्रतिमा यांचे भाषण, रोदन, कंपन, घर्म ही व कलह, इंद्रधनुष्य, निर्घात यांचा पाक ३ महिन्यांनी होतो. (इंद्रधनुष्याचा, पूर्वी ७ दिवसांनी सांगितला तो न झाला तर तीन महिन्यांनी होतो) ॥६॥
किडे, उंदीर, माशा, सर्प हे बहुत होणे, पशु व पक्षी यांचा रोदनशब्द, मृत्पिंड (ढिपळ) उदकांत तरणे, या सर्वांचा पाक ३ महिन्यांनी होतो ॥७॥
कुत्र्यांची अरण्यामध्ये प्रसूति, वन्यपशूंचा गावांत प्रवेश, मधपोळे धरणे, तोरण, इंद्रयष्टि यांचा पाक एक वर्षाने अथवा काही अधिक दिवसांनीही होतो ॥८॥
कोल्हे, गृध्र, यांचे संघांचे फल १० दिवसांनी; वाद्याच्या शब्दाचे फल तत्काल, ओरडणे, वारूळ, भूमिविदारण यांचे फल १५ दिवसांनी होते ॥९॥
अग्नि नसता पेटणे, घृत, तेल, मांस, रक्तादिक यांची वृष्टि; यांचे त्या दिवशीच फल. जनवाद (लोकापवाद) याचे फल दीड महिन्याने होते ॥१०॥
छत्र, चिति, यज्ञस्तंभ, अग्नि बीजे यांचे विकाराचे फल साडेतीन महिन्यांनी होते. छत्र व तोरण यांचे फल महिन्यानेहोते. असे कोणी ऋषि म्हणतात ॥११॥
फार द्वेषी प्राण्यांचा परस्पर स्नेह, भूतांचा आकाशामध्ये शब्द, मांजर व मुंगस यांचा उंदराबरोबर संग या वैकृतांचे फल महिन्याने होते ॥१२॥
गंधर्वनगराचे फल एक महिन्याने होते. रसविकार,सुवर्णविकार, ध्वजभंग, गृहविकार, धुरळा व धूर यांनी व्याप्त दिशा, यांचे फल एक महिन्याने होते ॥१३॥
अश्विन्यादि नक्षत्रांच्या योगतारांना उपसर्ग झाला तर त्याचे फल ९ इ० मासांनी होते. अश्विनी ९, भरणी १, कृत्तिका ८, रोहिणी १०, मृग १ आर्द्रा ६, पुनर्वसु ३, पुष्य ३, इतक्या महिन्यांनी फलपाक होतो. आश्लेषांचे फल त्या दिवशीच होते ॥१४॥
मघादिनक्षत्रांच्या योगतारांला उपसर्ग झाला तर त्याचा पाक एक महिना इत्यादिकाने होतो. म्ह० मघा १, पुर्वा ६, उत्तरा ६, ह्स्त ३, चित्रा अर्धमास (१५ दि०,) स्वाती ८, विशाका ३, अनुराधा ६, ज्येष्ठा १, मूळ १, पूर्वाषाढा ४ उत्तराषाढा ४ इतक्या महिन्यांनी फलपाक होतो. अभिजित्तारांचा त्यादिवशी फलपाक होतो ॥१५॥
श्रवणादिनक्षत्रांचा पाक सप्तादिमासांनी होतो. म्ह० श्रवण ७, धनिष्ठा ८, शततारका दीडमास, पूर्वाभाद्रपदा ३, उत्तराभा० ३, रेवती ५ इतक्या महिन्यांनी फलपाक होतो ॥१६॥
ज्या अद्भुताचा जो फलपाकाचा काल सांगितला त्याकाली तो पाक होणार नाही तर दुप्पट काली फलपाक होईल (शुभाशुभफल येईल;) परंतु जर ब्राम्हाणांनी यथाशास्त्र शांतीने अथवा सुवर्ण, रत्न, गो. या दानानी ते अद्भुत शमविले नाही; (जर शमविले तर शांत होईल) ॥१७॥
॥ इतिश्रीवराहमिहिरकृतौबृहत्संहितायांपा काध्यायोनामसप्तनवतितमोध्याय: ॥९७॥